||दिवाळी २०१०||

ग्रंथालयात भटकंती - जाँ-पॉल सार्त्र
चिंतातुर जंतू

  जाँ-पॉल सार्त्र हा विसाव्या शतकातला प्रसिद्ध फ्रेंच लेखक आणि तत्त्वज्ञ पुस्तकांच्या विश्वातच जन्मला होता. त्याच्या  आजोबांनी पुस्तकाचा  आदर करण्याचं बाळकडूच त्याला दिलं होतं. एक दिवस त्याची आई आन-मारी हिनं त्याला पुस्तकातून वाचून दाखवलं. या बोलणार्‍या पुस्तकानं छोट्या जाँ-पॉलला आकर्षित केलं आणि वाचायला शिकण्याची प्रबळ इच्छा त्याच्या मनात निर्माण केली. 'शब्द' (Les Mots) या पुस्तकात सार्त्रनं आपल्या अनेक अनुभवांचं वर्णन केलं आहे आणि शब्दांच्या सान्निध्यात आपल्या अस्तित्वाचा आपल्याला कसा शोध लागला याबद्दल लिहिलं आहे. या पुस्तकातल्या काही निवडक उतार्‍याचं मूळ फ्रेंचमधून भाषांतर या लेखात केलं आहे.
माझ्या आयुष्याची सुरुवात पुस्तकांच्या गराड्यात झाली आणि माझ्या आयुष्याचा शेवटही निश्चितच पुस्तकांच्या सहवासात होईल. माझ्या आजोबांच्या कचेरीत ती सर्वत्र होती. ऑक्टोबरमध्ये शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीची एक वेळ वगळता वर्षभरात त्यांच्यावरची धूळही झटकायची नाही असा दंडक होता. मला अजून वाचता येत नव्हतं, तरीही त्या रचलेल्या ठोकळ्यांवर माझी भक्ती जडली होती. सरळ वा तिरकी, ग्रंथालयात विटांच्या लांब ओळींप्रमाणे रचलेली अथवा रस्त्याच्या कडेनं उभारलेल्या दिमाखदार स्तंभांच्या रांगांप्रमाणे मांडलेली अशी ती पुस्तकं. माझ्या कुटुंबाची भरभराट त्यांच्यावर अवलंबून होती हे मला जाणवलं. ती सर्व एकसारखीच दिसत. मी एका छोट्याशा कोपर्‍यात दंगा करत असे आणि ही घोटीव, पुरातन स्मारकं माझ्या अवतीभोवती असत. त्यांनी मला जन्माला येताना पाहिलं होतं आणि ती मला मरतानाही पाहणार होती. त्यांचं शाश्वत अस्तित्व मला माझ्या भूतकाळाप्रमाणेच शांत भविष्यकाळाचं आश्वासन देत होतं. त्यांची धूळ लागून माझा हात पावन व्हावा म्हणून मी त्यांना चोरून स्पर्श करत असे, पण त्यांचं काय करावं हे मला कळत नसे. माझे आजोबा एरवी इतके धांदरट होते की त्यांच्या हातमोज्याची बटणंसुध्दा माझी आई लावून देत असे; मात्र हा सांस्कृतिक ठेवा ते सफाईदारपणे, एखाद्या पूजकाच्या श्रद्धेनं हाताळत. अर्थ न कळताही दर दिवशी मी या सोहळ्याला उपस्थित असे. हजारोवेळा मी त्यांना हरवलेल्या मनःस्थितीत खुर्चीतून उठताना पाहिलंय. आपल्या टेबलाला वळसा घालून दोन ढांगांत ते खोली ओलांडत. जराही न घुटमळता, निवड करायला क्षणाचाही अवधी न घेता हवा तो खंड उचलत. खुर्चीकडे परत येता येता अंगठा आणि तर्जनी वापरून पानं चाळत, आणि बसेपर्यंत वहाणेप्रमाणे पुस्तकाचा करकरीत आवाज करून ते हव्या त्या पानावर सटकन उघडत. शिंपल्यांप्रमाणे उघडणार्‍या ह्या पेट्या निरखायला कधीकधी मी जवळ जात असे आणि त्यांच्या आतल्या अवयवांचं अनावृत्त दर्शन मला होई. फिकुटलेली, बुरसलेली, किंचित फुगलेली पानं, त्यावर शाई पिणार्‍या काळ्या केशवाहिन्यांचं जाळं आणि त्यांना येणारा अळंब्यांचा वास.

मला अजून वाचता येत नव्हतं तरी माझ्याकडे 'माझी' पुस्तकं असावीत, असा हट्ट करण्याची माझी मिजास होती. माझ्या आजोबांनी आपल्या खट प्रकाशकांकडून 'ले कोन्त' हे कवी मॉरीस बूशोरचं पुस्तक मागून घेतलं होतं. लहान मुलांची आवड लक्षात घेऊन लोककथांना त्यानुसार त्या पुस्तकात स्वरूप दिलं होतं. बूशोर हा लहान मुलांची नजर जपलेला लेखक होता असं आजोबा म्हणत. त्या पुस्तकावर हक्क सांगण्याचा समारंभ लगेच करण्याची माझी इच्छा होती. मी ते दोन छोटे खंड घेतले, त्यांना हुंगलं, कुरवाळलं, बेफिकिरीनं 'हव्या त्या' पानावर उघडलं, अगदी करकर आवाज करून, पण सर्व फुकट. ती मला वश झाली असं काही मला वाटेना. मी त्यांना बाहुल्यांसारखं वागवून पाहिलं, त्यांना आंदुळलं, त्यांचे पापे घेतले, त्यांना मारही दिला, पण नाहीच. शेवटी अश्रूभरल्या डोळ्यांनी मी त्यांना आईच्या गुडघ्यांवर बसवलं. तिनं तिच्या कामातून लक्ष काढून वर पाहिलं, "मी तुला काय वाचून दाखवू बेटा? परीकथा?" मी अविश्वासानं विचारलं, 'पर्‍या? त्या याच्या आत आहेत?'

आन-मारीनं मला तिच्या पुढ्यात माझ्या छोट्या खुर्चीवर बसवलं. ती स्वतः बसली, पापण्या खाली वळवल्या आणि झोपी गेली. तिच्या पुतळ्यागत चेहर्‍यामधून एक अनोळखी आवाज येऊ लागला. मी बावचळलो. कोण बोलत होतं? काय? आणि कुणाला? माझी आई तिथून गायब झाली होती. एक स्मित नाही की गट्टीची एक खूण नाही; मी तडीपार झालो होतो. शिवाय मला तिची भाषाही ओळखू येत नव्हती. हा आत्मविश्वास तिच्यात कुठून आला? एका क्षणात मला कळून चुकलं की बोलत होतं ते पुस्तक होतं. त्यातून येणार्‍या वाक्यांनी मला धडकी भरली. शब्दांच्या आणि वाक्यांच्या अवयवांनी बुजबुजलेले ते सहस्रपादच होते. गाणारी, सानुनासिक, विरामांनी आणि श्वासांमध्ये तुटलेली, अपरिचित शब्दांनी समृद्ध अशी ती वाक्यं होती. त्यांना स्वत:ची आणि स्वतःच्या वळणाची भुरळ पडली होती; मी त्यांच्या खिजगणतीतही नव्हतो. कधीकधी मला समजू शकण्याआधीच ती नाहीशी होत, तर कधीकधी मला आधीच त्यांचा अर्थ समजत असे आणि एखाद्या स्वल्पविरामाचीही सवलत मला न देता, ती आपल्या रुबाबात पूर्ण होत.

मला स्वतःपासून वेगळं करणारी ही कळ हळूहळू मला आनंद देऊ लागली. उत्स्फूर्तपणे रचलेल्या कथांपेक्षा पूर्वरचित कथा मला अधिक पसंत पडू लागल्या. शब्दांच्या नेमक्या, अचूक क्रमाबद्दल मी संवेदनक्षम बनलो. प्रत्येक वेळी नव्यानं वाचताना ते परत येत, नेहमी तेच शब्द आणि त्याच क्रमानं. मी त्यांची वाट पाहू लागलो.

मग मला माझ्या आईची असूया वाटू लागली आणि तिची भूमिका स्वतः घेण्याचा मी निश्चय केला. 'एका चिन्यावर चीनमध्ये आलेली संकटे' हे ज्यूल वर्नचं पुस्तक मी पळवलं आणि ते घेऊन एका अडगळीच्या खोलीत गेलो. तिथं एका पलंगावर रेलून मी वाचायचा आव आणला. एकही ओळ न गाळता माझे डोळे त्या काळ्या रेषांवरून फिरत होते. अगदी प्रत्येक अक्षराचा काळजीपूर्वक उच्चार करत मोठ्या आवाजात मी स्वतःलाच गोष्ट सांगत होतो. घरातल्या मंडळींनी मला पकडलं, किंबहुना मी मला पकडू दिलं. सगळे आनंदानं चित्कारले, आणि मला अक्षरओळख करून देण्याची वेळ आली आहे असा निर्णय झाला. धर्माची दीक्षा घेताना वाटतो तसा उत्साह मला वाटत होता. स्वतःला खाजगी शिकवणी देण्यापर्यंत माझी मजल गेली. 'साँ फामीय' हे एक्तोर मालोचं पुस्तक घेऊन मी माझ्या पलंगावर चढून बसलो. ते पुस्तक मला तोंडपाठ होतं. त्यामुळे काही भाग पाठ म्हणत, काही अक्षरांचा अर्थ लावत मी एकामागून एक त्या पुस्तकाची पानं पार करत गेलो. शेवटचं पान उलटलं तेव्हा मला वाचता येऊ लागलं होतं.
मी आनंदानं वेडा झालो. दोन पानांमध्ये सुकवून ठेवलेले, माझ्या आजोबांच्या नजरेनं जिवंत होणारे, त्यांना ऐकू येणारे पण मला ऐकू येत नसलेले ते आवाज आता माझे होते! मी त्यांना ऐकणार होतो, त्यांच्या धीरगंभीर वक्तव्यानं मी ओतप्रोत होणार होतो. मला सर्व काही माहीत होणार होतं. मला ग्रंथालयात भटकंती करायला सोडून दिलं गेलं आणि मी मानवी ज्ञानसंग्रहावर चढाई केली. त्यातूनच मी घडलो.
- जाँ-पॉल सार्त्र (१९०५-१९८०)

अनुक्रमणिका

अनुभव

कवितासंग्रहाचे परिचय

लेखकांचे परिचय

मुलाखत

पुस्तक परिचय

प्रतिक्रियां

सुंदर

सुंदर अनुवाद. ले मू फ्रेंचमधून वाचायचे आहे पण अजून तेवढी प्रगती झालेली नाही. सार्त्रचा तत्वज्ञानात आढळणारा काहीसे रूक्ष चेहेरा इथे बालसुलभ कुतूहलामुळे बराच वेगळा वाटतो.

--
Behind every great man there is a woman... rolling her eyes. ~ Jim Carrey
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com/

नितांतसुंदर ...

मला फ्रेंच येत नाहीं. याचा मराठी वा इंग्रजी अनुवादहि मीं वाचलेला नाहीं. त्याच्या आईच्या वाचनाचें वर्णन म्हणजे एक रत्नजडित काव्यशिल्प वाटलें. तुम्हीं तें उत्कृष्टपणें साकार केलें आहे असें वाटतें. सुंदर! माझ्याहि मनाच्या कोपर्‍यांतल्या, बालपणीं प्रथमच वाचलेल्या परीकथांच्या मुग्ध स्मृतींनीं अचानक टुण्णकन बाहेर उडी मारली. धन्यवाद.

दूरदर्शनवर पंधरावीस वर्षांपूर्वीं एकदां साबुन की टिकिया नांवाची गोष्ट दाखवली होती. ती आणि कुलभूषण खरवंदाचा अभिनय अजूनहि मनांत घर करून आहे. सार्त्रची आहेसें अंधुकसें आठवतें. कदाचित चूकहि असूं शकेल.

सुधीर कांदळकर

सुधीर कांदळकर

मराठीत सार्त्र

मराठीत सार्त्र आणण्याचा अजून एक प्रयत्न :
श्री ना पेंडसे रूपांतरित नाटक "डॉक्टर हुद्दार" = सार्त्रचे "डर्टी हँड्स्"

शब्दचे मराठी भाषांतर

मला अत्यंत आवडलेल्या पुस्तकांपैके हे एक पुस्तक (आणि सार्त्रेचे एका बैठकीत वाचून संपवलेले एकमेव पुस्तक. त्याच्या बिइंग अँड नथिंगनेसची पन्नास पानेसुद्धा गेल्या ६ वर्षात झालेली नाहीत. What is literatureला एक वर्ष लागले. The age of reason ला हातच नाही लावला अजून). वयाच्या आठव्या-दहाव्या वर्षापर्यंतचा काळ ह्या पुस्तकात येतो. विचारांची बैठक कशी बसत जाते, एका लहान मुलाची जाणीव/ जगाशी त्या जाणीवेचे परस्परसंबंध कसे घडतात हे केवळ सार्त्रच ह्या प्रकारे लिहू शकतो.

आपण भाषांतरही चांगले केले आहे. आपल्याला फ्रेंच येत असल्याने फारच मोठा खजिना आपल्या हाताशी आहे. त्याबद्दल तुमची असुया वाटते.

शब्दचे मराठी भाषांतर माझ्या आठवणीप्रमाणे पद्मगंधा प्रकाशनाने केले आहे आणि अनुवादक कोणी दिवेकर आडणावाची व्यक्ति आहे. हा अनुवाद सध्या बाजारात उपलब्ध आहे. (पुण्याच्य पाथफाइंडरमध्ये नक्कीच आहे).

भाषांतर

भाषांतर आवडले. फॉर्मॅटिव्ह इयर्स मधले सर्वांचेच अनुभव रोमांचकारक. इथे तर प्रत्यक्ष सार्त्र. उत्तम लेख.
धन्यवाद.

प्रश्न : भाषांतर मूळ फ्रेंचमधून केले आहे काय ? असल्यास शिसानविवि ! Smile

अवांतर : "शब्द"चे मराठी भाषांतर कुणी केले आहे ? प्रकाशन कुठले ? या बाबत काही माहिती मिळेल का ?

धन्यवाद!

धन्यवाद. भाषांतर मूळ फ्रेंचमधून केलेलं आहे. काही वर्षांपूर्वी शांताराम पारपिल्लेवारांनी 'शब्द' मराठीत केल्याचं अंधुक स्मरतं आहे. प्रकाशन बहुधा मेहता किंवा राजहंसचं असावं. त्यांनी फ्रेंचमधून केलं की इंग्रजीमधून ते मात्र माहीत नाही.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

प्रतिसाद द्या

प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.