'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
कैफी आणि मी
मुखपृष्ठ
|
|
पुस्तक हाती आल्याआल्या सहज म्हणून समोर आले ते एक पान उलटले आणि वाचू लागलो. तिथे होते उर्दूत विविध रंगांची नावे ~ उदा. जाफरानी (केशरी), कासनी (गुलाबी), प्याजी (कांद्याच्या पातीचा), कत्थई (काथ्या), ऊदा (जांभळा), तुरई (भडक पिवळा), सुर्मई (राखाडी), शफ्तालू (मरुन), उन्नाबी (तपकिरी), सन्दली (चंदनी). हरखूनच गेलो. शिवाय सब्जी, मोतिया, आस्मानी, बैंगनी ही काहीशी परिचित नावे. ही उर्दू भाषेची नजाकत आणि अशा हैद्राबादी वातावरणात वाढत चाललेली १९४०-४५ मध्येही बुरखा घालण्यास स्पष्ट नकार देणारी एक बंडखोर तरीही कवि मनाची मुस्लिम युवती....शौकत खानम....कैफी आझमीची प्रेयसी आणि नंतर पत्नी, शबानाची आई. आत्मचरित्राचे नाव "याद के रहगुजर", मराठीत "कैफी आणि मी".
डॉ.अमर्त्य सेन या पुस्तकाबद्दल म्हणतात "हे पुस्तक खूप सुंदर आहे एवढंच म्हणणं म्हणजे त्या पुस्तकाचं महत्व कमी लेखण्यासारखं आहे." तर इन्द्रकुमार गुजराल लिहितात "हातात घेतल्यावर पूर्ण वाचल्याशिवाय तुम्ही ती खाली ठेवूच शकणार नाही, अशी कहाणी". खरंय. आत्मकथेतील भाषा इतकी आपुलकीची वाटते की जणू काही खुद्द शौकत आझमी स्वतः समोर बसून आपल्या बहुरंगी आयुष्यातील रंगांची उधळण आपल्यावर करीत आहेत. कुठेही भाषेचा डामडौल नाही, आहे तो एक प्रसन्न करणारा गप्पागोष्टी करणाच्या पद्धतीचा सहजाविष्कार (जयश्री देसाई यांची शबानाशी खास मैत्री असल्याने त्यांच्या अनुमतीनेच शौकत यांच्या या पुस्तकाचे मराठीत रुपांतर केले आहे.)
मूळ उर्दूतील नंतर इंग्रजीत प्रकाशित झाल्यावर द.आशियाई विभागांसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून याची अमेरिकेतील तब्बल चौदा विद्यापीठानी संदर्भ ग्रंथ म्हणून निवड केली आहे. त्याला कदाचित हेही कारण असेल की व्यक्तिगततेच्या मर्यादा ओलांडून त्या काळातील सामाजिक-राजकीय वातावरणाची मांडणी एका स्त्रीच्या नजरेतून इथे मांडण्यात आली आहे आणि तेही अत्यंत सहजतेने.
आपल्या आत्मकथेचा प्रारंभ हैद्राबाद येथील घरगुती वातावरणापासून सुरू करण्याचे कारणही त्याच घरी १९४० च्या दशकातील प्रख्यात शायर जाफरी, मजाज [या मजाजवर तर एक वेगळा लेख होऊ शकेल], मख्दूम, मजरूह, साहिर, जाँ निस्सर अख्तर आणि अर्थातच या सर्वांपेक्षा वेगळा असलेला कमालीचा देखणा कैफी (या पुस्तकात कैफीच्या तारुण्यातील फोटो पाहून तर त्याच्यासमोर दिलीप देव राज हे त्या काळातील नायक फिके वाटू लागतात) यांचा वावर मैफिलीच्या निमित्ताने खानम यांच्या वाड्यावर असायचा. वडिल अबकारी खात्यात इन्स्पेक्टर आणि अत्यंत पुरोगामी विचाराचे. मुलीनी इंग्रजी शिक्षण घेतलेच पाहिजे अशा त्या काळच्या बंडखोर वाटू शकणार्या विचाराचे ते असल्याने त्यांच्या विचाराचा प्रभाव शौकत आणि अन्य मुलांवर पडला नसला तर नवलच. मग याच वैचारिक भूमिकेतून पुरोगामी विचारांच्या कविसमवेत तिची उठबस अगदी १५ व्या वर्षापासून झाली आणि त्यात अग्रस्थानी 'कैफी'.
एक आठवड्याच्या मुशायर्याच्या दरम्यान शौकतचे कैफीवर आणि कैफीचे शौकतवर 'दिलोजान से मुहब्बत'. मुंबईला परतताना त्या गर्दीतही कैफीने तिला एक कविता दिली. त्यातील पहिल्या दोन ओळी
"शिगुफ्ती का लताफत का शाहकर हो तुम
फकत बहार नही हासिले-भार हो तुम"
(फुललेल्या कोम्लतेचा सर्वोत्तम आविष्कार आहेस तू
फक्त बहार नाही तर सर्व ऋतूंचा, अर्क आहेस तू)
वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळेच्या प्रथेनुसार एकीकडे शौकतचेही दुसर्याच एका नातेवाईक मुलाशी निकाह निश्चित झाला होता तर दुसरीकडे कैफीच्या ज्येष्ठांनी त्यांचे लग्न मुंबईत मुक्रर केले होते. आणि हे दोघे तर साहित्यप्रेमाने वेडे झाले होते.
पुढे मग त्यांची ती सलग ५५ वर्षाची साथ. अप्रतिमरित्या शब्दबद्ध झाला आहे सारा प्रवास या पुस्तकात ~ "कैफी आणि मी". कैफी आझमी, शबाना आझमी, जावई जावेद अख्तर, मुलगा बाबा आझमी आणि त्याची पत्नी तन्वी (उषा किरणची कन्या) यांच्याविषयी आपण कुठेना कुठे केव्हाना केव्हातरी वाचलेले असते; पण या सर्वांच्या कलागुणांचा एक स्त्रोत म्हणून हे जेव्हा "शौकत आझमी' ना श्रेय देतात त्यावेळी साहजिकच या व्यक्तीविषयी आपल्याला फार कमी माहिती आहे याची खात्री पटते. अशावेळी हे आत्मचरित्र समोर आल्यावर होणार्या आनंदाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
अशोक पाटील
अरे वा! वाचलं
अरे वा! वाचलं पाहिजे!
स्त्रिया आणि त्यांची बंडखोरी हा एक पुस्तक लेखनातीलच नव्हे तर सार्या माध्यमांतील वेगळा जेनर ठरू लागला आहे. बंडखोर वृत्ती तशीच पण तरीहि एकेकीचा (/ च्या बंडखोरीचा) रंग वेगळा!
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
हे पुस्तक मी पण वाचलं गेल्या
हे पुस्तक मी पण वाचलं गेल्या वर्षी (२०१०) आणि खूप आवडले.
पुस्तक काही महिन्यांपूर्वी ......
वाचले तेव्हा काही रंगांची नावे वाचली परंतु अर्थ कळले नव्हता. आता साधारण कल्पना आली, धन्यवाद. भारतातील साठच्या दशकातील समाजवादी चळवळीतल्या काही व्यक्तींचे सुरेख दर्शन पुस्तकातून होते. समाजवादाचे अमेरिकेस वावडे असल्यामुळे अमेरिकनांची नजर या पुस्तकावर आश्चर्य वाटायला नको. पण हा संदर्भ कौतुकापेक्षा सावधगिरीपोटीच घेतला असावा. त्यांनी कौतुक केले म्हणून पुस्तक मोठे झाले असेही नाही. ते उत्तम आहेच.
मला खास आवडला तो या समाजवादी मंडळीनी स्वार्थापलीकडे जाऊन केलेला समाजाचा विचार, स्वत:च्या विचाराशी असलेला त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यानुसारचे त्यांचे वागणे तसेच त्यांचे एकमेकांतले आपुलकीचे भावबंध. आपले दुर्दैव असे की अशी माणसे राजकारणात यशस्वी झाली नाहीत आणि आता तर अस्तंगतच झालेली दिसतात. पुस्तकात वर्णन केलेल्या विविध रंजक घटनांतल्या कथानकांमागे दिसत राहातात विविध व्यक्तीतले भावबंध, त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानाशी प्रतारणा न करता त्यांनी जपलेल्या निष्ठा.
सुधीर कांदळकर
सुधीर कांदळकर
समाजवादी विचार
धन्यवाद सुधीर.
तुमच्या प्रतिसादातील "या समाजवादी मंडळीनी स्वार्थापलीकडे जाऊन केलेला समाजाचा विचार" ही ओळ मला फार भावली. सर्वसाधारणपणे अशा विचाराच्या लोकांनी आपल्या वैयक्तिक सुखासमाधानासाठी करिअरचा मध्यममार्गी मार्ग कधीच धरलेला दिसून येत नाही. दुर्दैवाने घाणेरड्या राजकारणाने बरबटलेल्या या देशात अशा लोकांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोण 'राजकारणासाठी कार्य करतात' असाच आहे.
एका मोठ्या हैद्राबादी वाड्यात सुखात वाढलेली १७-१८ वर्षाची 'मोती' (शौकत) या समाजवादी विचारधारेत कैफीचा हात धरण्यासाठी मुंबईत आली आणि दोन मुले झाल्यानंतरही "कम्युन" मध्ये वाट्याला आलेल्या एकाच खोलीत (त्यातही सार्वजनिक संडास आणि न्हाणीघर) आनंदाने संसार करते, समाजवादाच्या विचाराने भारलेला कैफी जी काही मोडकीतोडकी कमाई करायचा ती सारी त्याच वस्तीतील मजुरांसाठी वा तत्सम कामासाठी परत जात असल्याने, खोलीत फक्त "संसारासाठी भांडी" म्हणजे चहाचा एक मग आणि एक ग्लास" बस्स ! कसलीही तक्रार करीत नाही. शबानाला म्युनिसिपालटीच्या शाळेत घालते, बसला पैसे नाहीत म्हणून नवर्याकडे मागत नाही. शबानानंतर जन्माला आलेला 'बाबा' (मुलगा). त्याचा जन्म सरकारी इस्पितळात. त्यासाठी रजिस्ट्रेशन केले. पण प्रसुतीच्यावेळी टॅक्सी भाड्याला पैसे नाहीत म्हणून कैफीनी गल्लीतील पानवाल्याकडून पाच रुपये उसने आणणे, असे अनेक प्रसंग.
हैद्राबादहून लेकीचा 'मुंबईतील संसार' पाहायला आलेल्या आई, मावशी आणि काकाला घरात जागा नाही म्हणून चौपाटीच्या वाळूत रात्रभर मुक्कामाल पाठविणार्या शौकतला त्याबद्दल वाईट तर वाटते, पण दुसरीकडे या मुंबईत रोजच असे लाखो लोक जगतात हे माहीत असल्याने त्याचे वैषम्यही वाटत नाही. तिच्या दृष्टीने कैफीचा तिथला कार्यकर्त्यांचा सारा परिवार म्हणजे 'कॉम्रेड' ज्याचा तिने अर्थ लावला "सच्चा माणूस".
पृथ्वीराज कपूर यांचे 'पृथ्वी थिएटर' चे युनिटदेखील अशा समाजवादी विचारी लोकांचीच नित्याची जागा जिथे शौकतचे नाट्यविश्व बहरले होते. तेथील नाट्यप्रयोगाला 'तिकीट' नसायचे. प्रयोग संपला की खुद्द पृथ्वीराज कपूर एक झोळी घेऊन 'Exit' वर उभे राहत आणि मग बाहेर पडणार्या प्रेक्षकाने त्याला वाटेल तितके पैसे त्या झोळीत टाकावेत. नाही टाकले तरी तक्रार नाही. झोळीत जमा झालेला पैसा पृथ्वीराजजी आत येऊन कामगार कल्याण निधीत जमा करीत.
अशा वातावरणाने शौकत आणि कैफी भारले गेले नसतील तरच आश्चर्य.
फार प्रभावी आहे हे पुस्तक.
अशोक पाटील
सुंदर परिक्षण
अशोक काका,
तुमच्या रसिक वृत्तीने कलेचे जेवढे कोन तुम्ही टिपून आम्हा वाचकांना देत आहात त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. या पुस्तकाबद्दल कित्येकदा ऐकले-वाचले होते. पण कधी घेण्याचा मोह मात्र झाला नव्हता. तुमच्या परिक्षणाने मात्र माझ्यावर ही जादू केली आहे. आजच बुकगंगाकडे या पुस्तकाची ऑर्डर नोंदवली आहे.
खूप भावलेले परिक्षण ... 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
परिक्षणाचा मुद्दा
धन्यवाद सागर,
तू तर पुस्तकवेडाच असल्याने साहजिकच तुला परीक्षणावरून हे पुस्तक भावले यात नवल नाही. मी जरी नुसते असे लिहिले असते "कैफी आणि मी हे एक चांगले पुस्तक आहे" तरीही तू घेतले असतेच. असो.
खरं सांगायचे झाल्यास मी केवळ पुस्तकाची प्राथमिक ओळख करून दिली असून ते नित्याच्या भाषेतील परीक्षण नव्हे. पुस्तकाच्या इतक्या प्रेमात मी पडलो आहे की अशा बाबतीत एखाद्या निरिक्षणकर्त्याकडे/समीक्षकाकडे आवश्यक असणारी अलिप्तता मी या पुस्तकाबाबत दाखवू शकत नसल्याने खर्यान अर्थाने परिक्षणही करू शकत नाही.
पुस्तक वाचल्यानंतर तुलाही हे पटेल.
अशोक पाटील
खरे आहे.
अशोक काका तुम्ही म्हणता तसेच असेल.
मी हे पुस्तक वाचून माझी प्रतिक्रिया अवश्य तुम्हाला कळवेन.
तुम्ही जशी अलिप्तता दाखवू शकत नाही तसेच माझ्याही बाबतीत थोडेसे आहे.
मी पुस्तकात भावनिकरित्या पूर्णपणे गुंतलो की जे त्या पुस्तकाबद्दल लिहितो ते अलिप्तपणे लिहूच शकत नाही.
अलिप्तता दाखवून लिहिणे म्हणजे त्या कलाकृतीवर एक प्रकारे अन्यायच होतो अशी माझी भावना आहे.
त्यामुळे या पुस्तकाचे समीक्षणात्मक परिक्षण नाही तरी वाचन अनुभव मात्र मी नक्कीच लिहिन. 
अवांतरः
मी जरी नुसते असे लिहिले असते "कैफी आणि मी हे एक चांगले पुस्तक आहे" तरीही तू घेतले असतेच.
हे मात्र अगदी १००% खरे आहे. 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/





उत्तम परिचय अशोक काका.
उत्तम परिचय अशोक काका.