||दिवाळी २०१०||

कृतज्ञ!
श्रावण मोडक

कृतज्ञ!

खरं तर, हे लिहितोय, कारण असं काही कुणी लिहिलं नसेल, यासाठी नव्हे; तर असं लिहिणं म्हणजेच व्यक्त होणं महत्त्वाचं असल्यानं.
पुस्तक आणि माणसाचं जगणं म्हटलं की, असं अनेक प्रकारचं लेखन समोर येत असतं. माझ्याच नव्हे, तुमच्याही. तरीही हे लिहायचं आहे. आता हे सारं लिहिताना मी साहित्य, वाङ्मय किंवा तत्सम कसलाही विचार केलेला नाही (माझ्या एरवीच्या लेखनातही तो असत नाहीच म्हणा). त्यामुळं यातली पुस्तकांची जंत्री महत्त्वाची नाहीच. ही पुस्तकं वाङ्मयीन किंवा साहित्यिकदृष्ट्या किती मोठी किंवा महान हेही महत्त्वाचं नाही. त्या विषयावरच्या प्रबंध, शोधनिबंधांची वगैरे इथं चर्चा होणार नाही. हे सारं लेखन आहे ते साध्या-सोप्या पुस्तकांविषयीचं. एरवी त्या मोठ्या पुस्तकांविषयी खूपच समीक्षा झालेली असतेही. तीत आता भर टाकण्यात काय हशील? मी लिहितोय ते केवळ एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.
---
मला तरी व्यक्तिशः माहीत नाही, की पुस्तक या प्रकाराचा शोध कधी लागला असावा. त्यात आता रसही राहिलेला नाही. कारण आता ती माहिती म्हणजे माझ्या लेखी फक्त तपशील आहे. पुस्तकं आली, त्यांनी जगणं व्यापून टाकलं वगैरे सारं आता घडून गेलं आहे. त्यामुळं त्या पुस्तकाचा शोध वगैरे तपशीलच. म्हणजे अगदी पोथीपर्यंत मागं जाता येतं, त्यापलीकडं शिलालेखांपर्यंत जाता येतं. पण त्यांच्या ऐतिहासिकतेच्या आणि व्याख्यांच्या चर्चेत हाती काय लागणार? कदाचित आणखी एका पुस्तकाची सामग्री. पुढं पुन्हा आपलं आपल्याला पुस्तकांतच सामावून जावं लागणार हे नक्की. तेव्हा त्यात न पडलेलंच बरं.
---
मला आठवतं त्यानुसार, अंकलिपी हेच बहुधा अनेकांच्या दृष्टीनं पहिलं पुस्तक असावं. त्याआधी फारतर स्तोत्रांचं पुस्तक. ते चौदा पॉईंट (खिळ्यांच्या जमान्यातलं, किंवा आत्ताचं सोळा पॉईंट) आकाराच्या अक्षरातलं पुस्तक. मग अंकलिपी असावी. त्यानंतर येत असावीत ती बालकथांची पुस्तकं. तीही बहुदा चौदा पॉईंट अक्षरांची. अंकलिपी नसेल तर? जगण्यात पुस्तकांचं स्थान काय याचा विचार सुरू केला आणि पहिलं पुस्तक कुठलं इथं जाऊन पोचलो. ती अंकलिपीच आठवली. मग त्याचवेळी जगण्यातील पुस्तकांच्या अभावाचा विचार डोक्यात शिरला अन् अंकलिपी नसती तर, या प्रश्नापाशी येऊन थांबलो. थांबलो, कारण अंकलिपीचा आज ठाऊक असलेला उपयोग म्हणजे पाढे वगैरे आणि अक्षरओळख यापुरताच मर्यादित राहिला आहे. त्या वयात अंकलिपीचं स्थान काय असावं आपल्या अनुभवांमध्ये? विचार करूच शकलो नाही. कारण आता ते लहानपण राहिलं नाही.

अंकलिपी नसती तर? काही नाही. अक्षरं, आकडे, बेरजा-वजाबाक्या शिकलो असतोच नक्की. फक्त माध्यम वेगळं राहिलं असतं. नक्की? क्षणात मी वेगळ्या ठिकाणी पोचलो होतो. तेव्हा मी बाविशीचा होतो. महाराष्ट्रातील आदिवासींसाठी त्यांच्या भाषेत पाठ्यपुस्तकं तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला होता. त्यासाठी अर्थसंकल्पात काही तरतूद झाली होती. माझ्या हाती कागदपत्रं होती. पण... पण असा होता की या निर्णयाची गरज काय, हे आधी मला समजलं पाहिजे. म्हणजे शिक्षणाचं माध्यम मातृभाषेत असावं इथंपर्यंत मला पटत होतंच. पण त्यापुढं कारणमीमांसा त्या निर्णयामागं होती. मग ती समजून घेणं आलं. 'ग' गणपतीचा हे आपण शिकलो होतो हे आठवत गेलं आणि भिलोरी, पावरी ही मातृभाषा असणार्‍या त्या मुलांची (आणि मुलींचीही) अक्षरओळख करून घेताना काय पंचाईत होत असावी हे ध्यानी येत गेलं. ज्यांच्या आयुष्यात गणपती नसतोच, त्याला ’ग’ गणपतीचा हे कळणार कसं? बातमी बनत गेली. अंकलिपी नसती तर? उत्तर असं मिळणार होतं मला. 'ग' गणपतीचा यातला गणपती पुढं माझ्यालेखी वेगळा झाला. तरीही अंकलिपीतील 'ग' गणपतीचा लक्षात राहिला तो असा. स्तोत्रांपासून वगैरे बराच लांब निघून गेल्यामुळं त्यांचंही महत्त्व त्या वयात काय असावं, हे आजही कळत नाही. न कळण्याची क्षेत्रं मग अशीच रोंरावत माझ्याभोवती फिरत गेली आणि पुस्तकं नसती तर या प्रश्नानं घेरून टाकलं. आज हे लिहून झालं तरी त्यातून सुटका होण्याची चिन्हं नाहीत.
---
कायूम तांग्राकुलियेव्ह. या दोन शब्दांतून काय कळेल? काही तरी विदेशी भाषेतील शब्द आहेत हे एवढं नक्की. मी हा प्रयोग केला. पाच जणांवर. त्यापैकी केवळ एकीलाच असा अंदाज मांडता आला की हे रशियन नाव असावं. बाकीच्यांचे अंदाज वेगवेगळे. ही आकडेवारी पुरेशी नसते, वगैरे मुद्दे बाजूला ठेवू. हे शब्द माझ्या मनात का घर करून बसले असावेत? हे प्रत्यक्षात रशियन (म्हणजे तेव्हाच्या सोव्हिएत युनियनमधलं) नाव आहे. त्यांचं एक पुस्तक, मी तेव्हा फार तर नऊ वर्षांचा असेन, होतं - धनगराचा पोर. कथा पूर्ण आठवत नाही. पण पुस्तकाच्या या नावावरून जितकं ध्यानी येऊ शकतं, तशीच ती काही तरी होती. भटकेपणा, पोराचं पोरपण, त्यांचं कुत्रं आणि तसंच काही तरी. हे पुस्तक तेव्हा वाचलं, अनेकदा वाचलं. पुढं ते मनात कुठंतरी खोल जाऊन बसलं. त्यानंतर ते पुन्हा वर आलं तेव्हा मी वयानं थेट दुप्पटीचा होतो. सांगली जिल्ह्यात चांदोली धरणाच्या परिसरात कुठं तरी भटकत होतो. मेंढपाळ देशावरून कोकणाकडं जातात, तो काळ. ते काहीसं नवंच होतं. सोबतीच्या मित्राकडून हा प्रकार समजून घेतला. म्हणजे मी सहज विचारलं, "हा काय प्रकार आहे? हे असे जाणार आणि येणार? सह्याद्री ओलांडून?" मग कहाणी सुरू झाली. ऐकत गेलो. त्या दिवशी संध्याकाळीच बहुदा कायूम तांग्राकुलियेव्ह यांनी डोक्यात उसळी मारली. 'धनगराचा पोर' हे त्यांच्या पुस्तकाचंही नावही आठवलं. आजच्यापेक्षा तेव्हा आठवण बरी होती, ती कथाही आठवली. आणि मी त्या मित्राला म्हटलं, "यार, याच्यावर लिहिलं पाहिजे. हे असं लेखन आपल्याकडं झालेलं नाही. हा प्रवास केला पाहिजे त्यांच्यासोबत..."

स्वप्नं किंवा कल्पना अनेकदा तशीच राहतात. हेही तसंच राहिलं. पुढे पुन्हा काही वर्षं गेली आणि या पुस्तकानं उसळी मारली. कायूम यांच्या नावानंही उसळी मारली. पुण्यात नर्‍हे-धायरीत महामार्गावरून जाणारे मेंढपाळ पाहिले, तेव्हा. तेव्हा पुन्हा ते स्वप्नही आठवलं. स्वप्न आजही स्वप्नच आहे.

मधल्या काळात माझ्या वडिलांनी धनगर समाजाचा एका स्वयंसेवी संस्थेसाठी एक अभ्यास केला. त्यासाठी ते महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेशात वयाच्या साठीनंतर फिरले. अभ्यासाचं पुढं काय झालं ठाऊक नाही. पण त्यांचा तो प्रवास लक्षात आहे. माझ्या डोक्यातलं ते स्वप्न आजही जिवंत आहे. त्याच्यासोबत कायूम तांग्राकुलियेव्हही जिवंत आणि धनगराचा पोर हे पुस्तकही. कदाचित, एखादी फेरी होईलही माझी अशीच भटकंतीची. पण...
ते पुस्तक नसतं तर हे विचार इथपर्यंत आले नसते. धनगरांचं जगणं समजून घेण्याची उर्मीही जगली नसती.
---
मला शाळेतील पुस्तकं आजही फारशी आठवत नाहीत. म्हणजे पाठ्यपुस्तकं आठवत नाहीत. पण काही वेगळी पुस्तकं आठवतात. ती ध्यानी आहेत. त्यातील काही कथाही पक्क्या ध्यानी आहेत. वाचनाचा भस्म्या लागण्याची वेळ प्रत्येकाच्याच आयुष्यात एकदा ना एकदा येतेच. माणूस पुस्तकांवर पुस्तकं वाचत जातो. किती आणि काय वगैरेचा धरबंध रहातच नाही. मीही त्या सापळ्यातून गेलो आहे, जातो आहे.

वय दहा ते चौदा वगैरे. रहस्यकथांचा सोस त्या काळात वेड्यासारखा लागला होता. घरी वडिलांना, माझ्या वाचनमित्र मित्रांच्या घरात त्यांच्या पालकांसमोर या पुस्तकांची चर्चाही मुश्किल काम. पण आम्ही ते सारं 'मॅनेज' करायचो (मॅनेज हा शब्द आताचा. तेव्हाचा आठवत नाही. किंवा काही नसावाही. कारण तसा शब्द देणारं पुस्तकही नसावं). तर... गुरूनाथ नाईक या माणसाच्या मी तेव्हा प्रेमात पडलो. शिलेदार कथा मिळेल तिथून उचलायची अशी एक शिकस्त असायची. कॅप्टन दीप, लेफ्टनंट शेख, हवालदार जंगम आणि कदम... (चार झाले. पाचवा कोण?)! हे हिरो असण्याचं वय ते आमचं. या पुस्तकांनी काय दिलं? हे सांगता येणार नाही. पण ती नसती तर काय झालं असतं? लष्कर हा विषय आमच्या विचारांमध्ये (म्हणजे जे काही असेल ते) आणण्याचं काम या पुस्तकांनी केलं हे सांगताना कमीपणा वाटून घेऊ? नाही. काश्मीर हा तेव्हा आजच्यासारखा दहशतवादी वगैरे समस्यांनी ग्रस्त असा प्रश्न नव्हता. मी १९७८-८२ असा कालखंड सांगतो आहे. तेव्हा हे पाच शिलेदार काश्मीरात पाकिस्तानी हस्तकांच्या कारवाया कशा हाणून पाडतात अशा काही कथा त्या मालिकेत येऊन गेल्या. या कथा न वाचल्याने आमच्या त्या गटातील कुणाचे फारसे काही नुकसान झाले नसतेही. पण वाचल्याचा फायदा इतकाच की लष्कराविषयी रस निर्माण होणे, मग त्यापोटी मराठा लाईट इन्फण्ट्री हे आकर्षणाचे केंद्र होणे; या अनुभवातून आम्ही गेलो. मग फायरिंग बट्सच्या त्या भेटी, तिथं गोळीबारातलं भंगार गोळा करता करता एखाद्या जवानाशी बोलणं असे प्रकार झाले. आज मागं वळून पाहताना माझ्यापुरतं एक नक्की - पुढं बातमीदारीच्या नोकरीत असताना भोचकपणा करण्याची थोडीफार क्षमता त्यातून आली हे नक्की. त्या भोचकपणातून काही बातम्या मिळाल्या हेही वास्तव. या भोचकपणाकडं नेणारे होते ते गुरूनाथ नाईकांचे शिलेदार. शिलेदार कथा नसत्या तर? भोचक झालो असतोच, पण त्याला कदाचित थोडा वेळ लागला असता. आणि वेळ महत्त्वाचीच!
---
पुस्तकांची जागा इतर माध्यमं घेतील असं मला कधी वाटलं नाही. ती माध्यमं माझ्या लेखी वेगळीच राहिली. कारण ती वेगळी आहेतच. रेडिओ आधीपासून होताच. पण तो वडिलांच्या ताब्यात; आणि त्यांना आवडायचं नाही म्हणून आम्हाला विविधभारती आणि बिनाकाच ऐकायचं असायचं. ते जमायचं नाही. पुढं (घरी) स्वतंत्र ट्रान्झिस्टर आला, टेप आला, टीव्ही आला. मग तो विविधभारती किंवा बिनाकाचा सोसही उतरला. बीबीसीची (हिंदी सभा) मजा वाटू लागली. सगळं खरं. पण पुस्तकांची जागा या गोष्टी घेऊ शकल्या नाहीत. हे सांगतोय, कारण अगदी आजही मला दृक्श्राव्य पुस्तकं किंवा पीडीएफ (जरी सोस असल्यासारखा मी ती मिळवत असलो तरीही) माझ्यावर प्रभाव टाकू शकत नाहीत. ते वेगळंच. उद्या किंडल किंवा तत्सम उपकरणाचा मी वापर करेनच असे नाही. त्याचे एक कारण आहे. तेही पुस्तकात दडलेलं आहे. म्हणजे पुस्तकाचा तो नवेपणाचा फील, त्याला कव्हर घालण्याचा आनंद वगैरे गोष्टी आहेतच. पण 'पाडस'चा चित्रपट? नाही पटत. मी मूळ इंग्रजी पुस्तकाविषयी काही बोलत नाही. 'पाडस' हा मराठीत मात्र केवळ अनुभवण्याचाच प्रकार आहे. पण हा अनुभव वाचनाचा आहे. त्याचा चित्रपट होऊ शकत नाही. पण याच्याही उलट आहेच. 'सिंहासन' हा चित्रपट आधी पाहिला. कादंबरी मग वाचली. चित्रपट कळला, पण त्याचं एक वेगळं मूल्य आहे हे मात्र कळलं नाही. पुढं 'सिंहासन' कादंबरी वाचली, 'मुंबई दिनांक'ही वाचली. दोन्हीचा संगम म्हणजे हा चित्रपट हे कळलं. पण खरा प्रकाश पडला तो महाराष्ट्राच्या राजकारणाच्या परीघावरील, अगदी आजही तशाच असणार्‍या, चित्रासंदर्भात. एकूण राजकारण चालतं कसं, हे अगदी तपशीलात कळलं नाही. पण किमान काही गोष्टी कळल्या. ताकद कशी कुठं लावली जाते, साधक-बाधक मार्गांचा अवलंब कसा होतो आणि त्याचा परिणाम अगदी शेवटच्या पायरीवर असणार्‍या एखाद्याच्या जगण्यावर कसा होऊ शकतो हे त्या कादंबरीतून, आणि तत्सम काही इतर पुस्तकांतूनही, कळलं आणि मग पुढं इकडं-तिकडं हात-पाय हलवताना प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याची एक संयमी पण समग्र दृष्टी घडवण्याची प्रक्रिया घडत गेली, जाते आहे.

आता 'सिंहासन' हे तसं मराठीतील सार्वकालिक पुस्तकच. त्यामुळं त्याविषयी ही स्थिती असायचीच. पण ज्या पुस्तकांचा तसा कधीही गौरव झालेला नाही, त्यांचं काय? प्रकाश नारायण संतांची चारही पुस्तकं. नावं लिहिण्याची गरज आहे? मला वाटत नाही. ती पुस्तकं नसती तर? शांतपणे, वाहवत न जाता सांगायचं तर त्या वयाविषयीची माझी - आणि इतर अनेकांची - आपलीच ओळख, मला कदाचित झाली नसती. माझं या पुस्तकांशी नातं आणखीन जवळचं आहे. लंपनचं सारं बालपण जिथं गेल्याचं चित्रण त्या पुस्तकांमध्ये आहे, तो सगळा भाग माझ्याही लहानपणाचा आहे. ती टिळकवाडी, ते रेल्वे गेट, तिथला गणपती, गणपतीतले ते सांस्कृतिक कार्यक्रम, तो गायन क्लास, कॉलेजकडे जाणारा तो रस्ता... सारं काही... ती पुस्तकं वाचून झाली आणि माझ्या ध्यानी आलं की, अरे हे तर आपलंच लहानपण. मग त्यानंतर या थोराड वयात मी पुन्हा बेळगावला गेलो तेव्हा टिळकवाडीतील त्या भागात मुद्दाम फिरलो. पायी. चालत. वारी केल्यासारखा. त्या सगळ्या पेठा, त्यांना जोडणारा तो देशमुख रस्ता, त्या दोन बागा... मग कळत गेलं, त्या लहानपणात आपण बरंच काही इथं शिकलो आहोत. त्या शिकण्यातली एक गोष्ट म्हणजेच लेखन. लहानपणी काही ललित लिहायला शिकलो होतो, असं नाही. पण पुढं बातमीदारीच्या नोकरीत लेखन त्यापुरतंच झालं होतं. स्मृतिरंजनातून काही गोष्टी चांगल्या लिहिता येतात (अगदी नेहमीच नसल्या तरी अपवादात्मक नक्कीच), हे या चार पुस्तकांनी दाखवलं आहे. संतांनी बराच खंड ठेवून ते सारं लेखन केलं होतं. लिहिलं तेव्हा ते चाळीशीच्या उत्तरार्धात वगैरे असावेत. आपल्याच काही अनुभवांकडं थोडं वेगळं पाहता येतं का, इतकाच एक प्रश्न या पुस्तकांनी मनात उभा केला होता. तो प्रश्न पुरेसा ठरतो नंतर हे कळत गेलं. संतांच्या त्या चार पुस्तकांचाच हा परिणाम का? नक्कीच नाही. पण त्यांचा उल्लेख मुद्दाम करायचा, कारण त्यांच्याशी असलेलं नातं वैयक्तिक स्तरावर खूपच जवळचं. कारण लंपनचा एरिया आणि आपल्या बालपणाचा एरिया (हा शब्द मुद्दाम, आमच्या तेव्हाच्या पोरवयानुसारचा) एकच. हे आत्ताचं लेखन त्या पुस्तकांच्या अनुभवातून आलेल्या प्रश्नाचाच एक परिणाम आहे का? असेलही...
---
वर्षापूर्वी 'मायबोली'च्या गणेशोत्सव विशेषांकात 'तू' या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. लेख अर्थातच गणपतीविषयी. गणपती किंवा इतर कोणताही देव यांच्यासंदर्भात माझी वाटचाल इतर अनेक सामान्यांसारखीच आहे. आरंभी अज्ञानी भक्त, मग बुद्ध्या भक्त (म्हणजे, देव आहे हे स्वीकारून त्याचा भक्त होणे), मग एक प्रकारची मुत्सद्देगिरी - म्हणजे देव नावाची शक्ती आहे, मग पुढं अगदीच अश्रद्ध आणि आता मला काय त्याचे! हे सारे घडवत गेली ती पुस्तकेच. 'संपूर्ण चातुर्मास' हा संग्रह हा त्यातला पहिला मानकरी. या पुस्तकातल्या कहाण्या. देवावर श्रद्धा बसण्याचं कारण त्या कहाण्यांत दडलेलं असावं. कारण बुद्धीच्या स्तरावर, तर्काच्या स्तरावर मी केव्हाही वयाच्या मागंच होतो. आहेही. मग पुढं पोट भरण्याचे मार्ग काय असू शकतात, याचा शोध सुरू असताना केलेली फुटकळ भिक्षुकी. मग तर देवावरची श्रद्धा अधिक गडद व्हायला वेगळं कारण नकोच. मग त्यातून बाहेर पडताना काही पुस्तकांनीच साथ केलेली असते. त्यात अब्राहम कोवुरांचं पुस्तक (किंवा त्या पुस्तकातील काही अंश. मला नक्की आठवत नाही आत्ता...) आलं. हळूहळू त्यातून बाहेर येत गेलो. पण डिप्लोमसी आली. पण ती टिकली नाही फार काळ. पुढं फुले-आंबेडकर आले; आणि याच प्रवासात एकदा कधी तरी 'लोकायत' आलं. आज मी देवाविषयी "मला काय त्याचं?" इथंपर्यंत आलो आहे. पुढं कुठं असेन ठाऊक नाही. पण या मुक्कामाचं श्रेय 'लोकायत'चं. 'लोकायत' नसतं तर कदाचित मी समंजसपणे देव नाकारणारा राहिलो नसतो. मी करकरमुंडाच राहिलो असतो (मी तो होतोच. गणपतीचा एक फोटो मी फोडला, एका भक्तासमोर केवळ त्याचा वरिष्ठ आहे, या आधारावर). पण त्या तशा राहण्याने मला एक फटका बसला असता. मी थोडाफार ज्यांचा अभ्यास करतो, त्या आदिवासींचं जगणं मला समजून घेता आलं नसतं. म्हणजे, त्यांच्यातील अंधश्रद्धांचं निर्मूलन झालं पाहिजे हा आग्रह धरतानाही त्यांची एकूण सामाजिक, शैक्षणिक स्थिती ध्यानी घेऊन मी हे म्हणू शकतो की, "हे काम एका पिढीत शक्य नाही. त्याचा अट्टाहास नको. प्रयत्न तसा करा, पण अट्टाहास नको. कारण तो एरवी सर्वच कामाचा बट्याबोळ करेल." हा समंजसपणा कदाचित, 'लोकायत' नसतं तर आला असताच, असं नाही म्हणता येणार. देवीप्रसाद चट्टोपाध्यायांचं ऋण खरं तर हे की, त्यांनी एक दृष्टिकोन देण्याचा आग्रह न धरता वाचकातच समंजसपणा येईल अशा सुरात लेखन केलं. त्या पुस्तकाचं हे वैशिष्ट्य. यानंतर गणपतीविषयी नामदेव ढसाळांचा एक लेख वाचल्याचं आठवतंय. तोही असाच प्रभाव पाडून गेला. पण तो लेख पुस्तकात नव्हता. दैनिकात होता. 'लोकायत' अर्थातच व्याप्तीच्या दृष्टीने ढसाळांच्या लेखाचाही आधार असणारा ग्रंथ. 'लोकायत' नसतं तर...? भंडावणारा प्रश्न आहे हा!!!
---
राज्यशास्त्र हा नोकरीधंद्याच्या निमित्तानं जवळपास फिरकावा लागलेला अभ्यासविषय. त्यात कायदा आणि घटना हे विषय येतातच. मग घटना म्हणजे काय, कायदा म्हणजे काय, घटनेनुसारच्या जबाबदार्‍या कोणाच्या, कशा वगैरे प्रश्न. बातमी करायची वेळ आली की यांच्या आकलनाची कसोटी लागते अनेकदा. अशावेळी काही पुस्तकं ही नेहमीच हुकमाची असतात. प्रत्येकाची निवड वेगळी असेल. माझी एक खास आवडीची होती - 'अ शॉर्टर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया'. डॉ. दुर्गादास बसूंचे पुस्तक किंवा ग्रंथ. ही एक मोठी असामी. भारतीय घटनेवरचं पुस्तक या शब्दांची दुसरी बाजू म्हणजे डॉ. डी. डी. बसू. हे पुस्तक मी ठेवणीत ठेवलं होतं. त्याचं कारण होतं. मी काही घटनातज्ज्ञ नाही. व्यवसाय वकिलीचा नाही. पण घटनेतील प्रत्येक कलमाची (हा शब्द खरं तर चुकीचा, कायद्याचं कलम, घटनेचा अनुच्छेद) चिकित्सक मांडणी बसूंनी त्या पुस्तकात केली आहे. त्यांची त्या विषयावर इतर अनेक पुस्तकं आहेत. पण हे अशासाठी उपयोगी की, आजकाल ज्याला हायलेव्हल पिक्चर म्हणतात ते त्यातून बरंचसं मिळायचं. इंग्रजीही क्लिष्ट नाही. त्यामुळं काही काळ मी त्या पुस्तकाचं वाचनही झपाटल्यासारखं केलं आहे. मला त्यातून घटना कळली का? छे. हे काम सोपं नाही. पण एक कळलं, पेच आला एखादा समोर तर असं पुस्तक पहायचं की जे स्वतः शिकवणार नाही, पण वस्तुस्थिती कशी पहायची हे मात्र सांगेल. या पुस्तकाचा फायदा हाच की पुढं राज्यशास्त्र शिकवतानाही मला संघराज्याच्या तीन आधारस्तंभांचा विषय आला की तुलनेनं सोपं जायचं. तिघांमधील तोल घटनेनं कसा राखला आहे हे सांगण बसूंनी सोपं करून दिलं होतं. अर्थात, ही मांडणी घटना, कायदा, न्यायमीमांसा या अंगानं मी करत नाहीये. तो भाग वेगळा. बसुंना या क्षेत्रातील कामगिरीसाठी मिळालेल्या सन्मानांचा उल्लेख इथं करत नाही. गूगल आहेच. पण ते सन्मानच पुरेसे आहेत या पुस्तकाचं महत्त्व सांगायला; आणि म्हणूनच ते नसतं तर माझ्यासारख्याची काय स्थिती होऊ शकली असती हेही मांडायला.
---
अशी जंत्रीच देत किंवा विषयनिहाय पुस्तकांची निवड करत हेच असंच बरंच लिहिता येईल. कायूम तांग्राकुलीयेव्ह, किंवा अंकलिपीपासून सुरू झालेली ही गुंफण आत्ता कुठं थांबली? थांबते असं वाटतं, पण थांबत नसते ती. लेख म्हणून इथं थांबायचं ठरवलं तर तेवढ्यात समोर शरद पाटलांची पुस्तकं येतात. त्याही आधी ज्ञानेश्वरी आणि गाथा येऊन गेलेली असते. इतर कवींचा उल्लेख नाही असं होत नाही, कारण कुसुमाग्रज, विंदांचं नाव झळकून गेलेलं असतं. इतकंच नाही तर माझ्या लेखी पहिल्यांदा समोर आलेला राज्याचा अर्थसंकल्पही पुस्तकाच्याच रुपात होता आणि तो समजण्याच्या दृष्टीने आधी एन. डी. पाटलांच्या एका भाषणाची पुस्तिकास्वरूप टिपणी आली होती. तेही पुस्तकच. हे काही थांबत नाही.

काही (त्या सार्वकालिक वगैरे श्रेणीत नसलेल्या) पुस्तकांची नावं मुद्दाम घेतो - बाराला दहा कमी, दास-शूद्रांची गुलामगिरी, रुट्स, स्फोट, प्रदेश साकल्याचा, रारंगढांग, अ‍ॅडव्हाईज अँड कन्सेण्ट, द फाईल...वगैरे! ही आणि अशी पुस्तके नसती तर? सांगणं माझ्यापुरतं फारसं मुश्किल नाही. "काही झालं नसतं." ती पुस्तकं होती म्हणून तर आत्ता या क्षणी त्यांचा विचार तरी करतोय. नाही तर तेवढं तरी स्वत्व राहिलं असतं का? आता या पुस्तकांच्या नावांमध्ये ती सार्वकालिक मान्यवर पुस्तकं टाकून पहायचा खेळ एकदा करायचा आहे. पण तो मात्र आतासारखा नाही. थोडा अधिक व्यापकतेनं. तोवर त्यांच्यासह या पुस्तकांप्रती कृतज्ञ रहावं!
--पूर्ण--

अनुक्रमणिका

अनुभव

कवितासंग्रहाचे परिचय

लेखकांचे परिचय

मुलाखत

पुस्तक परिचय

प्रतिक्रियां

श्रावण मस्त... खूप दिवसांनी वाचले तुझे लिखाण

लिखाण मस्त पण असा अवलिया माणूस इतका विरक्त का? या पुन्हा एकदा प्रवाहात...

विक्रांत

८००७००६८६२

लेख

आवडला. नेह्मीप्रमाणेच श्रावण ह्यांचे प्रांजळ लिखाण.

सुजाण कृतज्ञता

ज्ञानेशशी सहमत आहे.
पुस्तकांविषयीची सुजाण कृतज्ञता आवडली

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

वा! लंपनच्या प्रदेशांत फेरफटका ....

मारायचा माझा पण कधींपासून विचार आहे. खरेंच हेवा वाटतो तुमचा. वाचनाचा भस्म्या आणि रहस्यकथांचा सोस आवडला. आम्हीं पण शाळेंत असतांना अगदीं पुडीच्या कागदावरचँ देखील वाचल्याशिवाय सोडत नसूं. तुमचें वय मला ठाऊक नाहीं. पण आतां मुलें जसे गुरुनाथ नाईक, सुशि वगैरे वाचतात असे आम्हीं अर्नाळकर वाचत होतों. त्यांत नंतर सिनकरांच्या पोलिसी चातुर्याच्या कथा, देवधरांच्या अनुवादित साहसकथा वगैरेंची भर पडली. फारच पूर्वीं द पां खांबेटे नवल वगैरे मासिकांत लिहीत. त्यांच्या लिखाणाचीही आम्हीं वाट पाहात असूं.

असो कृतज्ञता आवडली.

सुधीर कांदळकर

छान

सिंहावलोकन आवडले.
कुठल्या पुस्तकाने 'नेमके'काय दिले हे इतक्या नेमकेपणाने सांगता येणे खरोखर कठीण आहे !

प्रतिसाद द्या

प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.