अवतारी पुरूष जेव्हा एखादे असामान्य कृत्य करतो, तेव्हा तो जनसामान्यांच्या आदरास व श्रद्धेस पात्र ठरतो. मात्र एखादा सामान्य माणूस एखादे दिव्य करुन जातो, तेव्हा तो केवळ आदरणीय वा देवस्वरुप राहत नाही तर अनुकरणीय आणि स्फूर्तिदाता ठरतो. मग त्या ठिणगीचा वडवानल होतो; धगधगतो, निस्तेज होतो, फडफडतो, पुन्हा भडकतो, मात्र विझत नाही. ज्याला कसलेही वलय नाही, किंबहुना वलय सोडाच परंतु जो समाजाला फारसा ज्ञातही नाही व जो त्याचे असामान्य कृत्य केल्यानेच लोकांना, समाजाला वा राष्ट्राला परिचित होतो, आणि समाजाचा वा एका पिढीचा दीपस्तंभ होतो; ज्याच्या प्रकाशात अनेक ध्येयवेड्यांची वाटचाल सुरू होते अशा व्यक्तिमत्वांचा विचार करताच डोळ्यापुढे पटकन जी नावे येतात, त्यातले एक म्हणजे ’मास्टरदा’ ऊर्फ ’मास्टर सूर्यसेन’. खांबातून नृसिंह प्रकटावा तसा एका शालेय शिक्षकातून प्रकटलेला एक महान योद्धा - ज्याने अवघ्या ६३ साथीदारांसह ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देत, औटघटकेपुरते का असेना पण चितगांव स्वतंत्र केले आणि साम्राज्य हादरवले.
आयर्लंडच्या क्रांतिकारकांनी ’इस्टर रायजिंग’द्वारे डब्लिन सर केले आणि जवळपास आठवडाभर कब्जात ठेवले; त्यापासून स्फूर्ती घेत आणि तोच दिवस मुक्रर करत, भावी क्रांतीसाठी गरजेची शस्त्रे मिळवण्यासाठी सरकारी शस्त्रागार लुटण्याचा भयंकर धाडसी बेत मास्टरदांनी आखला. १८ एप्रिल १९३०! प्रत्यक्ष त्या दिवसापासून सुरुवात करीत त्याच्या अंतिम परिणामापर्यंत सगळा प्रवास डोळ्यापुढे उभा करतो तो मास्टरदांचा जिवलग ’अनंत सिंग’, आपल्या ’कथा ही दिवावादळाची’ या आत्मकथनात.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, सर्व हालचाली गुप्त असल्याने प्रचार शक्य नाही. कार्याचा प्रचार करता येत नाही, आपले उद्दिष्ट व ध्येय आपल्या देशबांधवांना समजावून सांगता येत नाही व अर्थातच त्यामुळे जनजागृती नाही, पर्यायाने जनसामान्यांचा पाठिंबा नाही व अंगीकारलेले व्रत इतके खडतर की घरदाराची राखरांगोळी व यातनामय जीवन आणि भाग्य असल्यास वीरमरण, हे स्पष्ट दिसत असल्याने सर्वसामान्य माणसाचा सहभागही नाही; अशा परिस्थितीतही आपले कार्य सुरू ठेवणार्या व दिव्य करुन जाणार्या क्रांतिकारकांचे ते महान कार्य बहुतेकवेळा अज्ञात राहते. ’करायचे आणि मरायचे’ हेच आयुष्याचे ईप्सित असलेल्या या महात्म्यांचे गौरवशाली कार्य आम्हा सामान्यांना समजणार तरी कसे? त्यात पुन्हा या पंथाला राजाश्रय सोडाच पण केवळ उपहास व उपेक्षाच लाभली. मग इतिहासाच्या पुस्तकात चार दोन पानांतच क्रांतिकारकांचा उल्लेख होतो आणि जुजबी माहिती मिळते. मात्र खर्या अर्थाने त्यांचे व्यक्तिमत्व व महान कार्य समजू शकत नाही. मात्र अनंत सिंग, मन्मथलाल गुप्त, शचिंद्रनाथ संन्याल, भगवानदास माहौर, सदाशिवराव मलकापुरकर, शिव वर्मा, विश्वनाथराव वैशंपायन या सारख्या क्रांतिकारकांनी स्वत: केलेले लेखन वाचायला मिळते, तेव्हा त्यात अमोल माहितीचा खजिना सापडतो व तोही अगदी निखळ, प्रांजळ, वास्तविक व अत्यंत प्रामाणिक रुपात.
मास्टरदांच्या व्यक्तिमत्वाने व विचाराने प्रेरित झालेल्या व आपल्या नेत्याच्या अधिपत्याखाली आपले आयुष्य देशावर ओवाळून टाकणार्या, ’हिंदुस्थान प्रजासत्ताक सेनेचा’ सैनिक असलेल्या एका महान क्रांतिकारकाचे आत्मकथन म्हणजेच श्री. अनंत सिंग यांचे आत्मकथन. ’चित्तगॉंग हिरोज’ फाईट फॉर फ़्रीडम’ या त्यांच्या आत्मकथनाचा श्री. वि. स. वाळिंबे यांनी केलेला अनुवाद म्हणजेच ’कथा ही दिवावादळाची’. ध्येयाने प्रेरित होऊन क्रांतिकारक जेव्हा एखादे असामान्य शूर कृत्य करायचा बेत आखतात, तेव्हा तो प्रत्यक्षात आणणे किती दिव्य असते; त्यात काय अडचणी व संकटे येऊ शकतात, परीक्षेचे प्रसंग पदोपदी येतात आणि आपल्या धेयाशी बद्ध असलेले क्रांतिकारक या सर्व दिव्यातून कसाला कसे उतरतात याचा विषण्ण करणारा आलेख म्हणजे हे आत्मकथन. खरे तर कुठल्याही क्रांतिकारकाविषयीचे वाचन हे क्लेशकारक असते. एखादे पुस्तक वाचताना पुढे काहीतरी हवेसे वाटणारे वा सकारात्मक वा इच्छित असे घडेल ही आशा असते; ते कसे घडेल याची उत्कंठा असते. मात्र क्रांतिकारकांविषयी वाचन करताना घडलेले प्राक्तन डोळ्यापुढे स्पष्ट असते. मात्र तरीही आपण ते वाचताना स्वत:ला आणि वर्तमानेकाळाला विसरतो आणि त्या काळात जाऊन पोचतो. त्या प्रवासात सहभागी होतो. अनंत सिंग हे कुणी साहित्यिक वा लेखक नव्हेत; पण अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, प्रत्यक्ष कृती केलेल्याने लिहिलेले संपूर्ण निरपेक्ष सत्य आणि ज्यावर लिहिले आहे ते रोमहर्षक कथानक, यामुळे हे पुस्तक हातावेगळे करणे सोडाच पण घटनांचा ओघ व संदर्भ पाहण्याकरता पुन्हा मागे जाऊन वाचले जाते.
मरायला निघालेल्या मुलाला आशीर्वाद देणारे आई-वडील, मास्टरदांनी व आपल्या भावाने आपल्याला या संग्रामाचा सुगावा लागू दिला नाही, म्हणून दुखावलेली व नाराज झालेली पण निरोप घेताना ’घरात एक बंदूक ठेवली आहे आणि वेळ पडली तर तिचा वापर कर’ असे मास्टरदांनी तुला सांगितले आहे, हे भावाच्या तोंडून ऐकताच हरखून जात त्याला निरोप देणारी दीदी - हे सारे डोळ्यापुढे उभे राहतात. घराची नाळ तुटते व सुरू होतो, तो एक नवा प्रवास. अनंताकडे नेणारा. प्रत्यक्ष कृती, पहिल्यांदा लागलेली नाट, मग कार्यक्रम दोन तासाने पुढे ढकलणे, त्या वेळात बदली गाडी ताब्यात घेणे, नवे वेळापत्रक सर्वत्र विखुरलेल्या सहकार्यांना सांगणे, मग पहिल्याच हल्ल्यात पोलिस लाईनवर आक्रमण, तिथून शस्त्र हातात घेण्याची संधीच न देता पळवून लावलेले ३०० पोलिस, लुटलेले पोलिस शस्त्रागार, पोलिस लाईनवरचा युनियन जॅक खाली उतरवून मातीला मिळवत त्या ठिकाणी उभारलेला तिरंगा, त्याला दिलेली मानवंदनेची पहिली फैर व सेनापती मास्टरदांना दिलेल्या मानवंदनेची दुसरी फैर हे सगळे वाचताना आपण ऐंशी वर्षे मागे १९३० सालात जाऊन पोहोचतो ते थेट अंधार्या रात्री घमासान सुरु असलेल्या चितगावात.
शस्त्रागारात लुटलेली शस्त्रे दोन गाड्यांमध्ये भरली जातात. उरलेली शत्रूला उपयोगी पडू नयेत म्हणून पेट्रोल शिंपून पेटवली जातात आणि अनवधानाने अंगावर पेट्रोल उडालेला हिमांशु पेटतो आणि या पर्वाला वेगळीच कलटणी लागते. भाजलेल्या हिमांशुला गावाच्या टोकाला असलेल्या आनंदच्या घरी नेण्याचे ठरते व एका गाडीने अनंत सिंग (लेखक), माखन, आनंद, गणेश व हिमांशु आनंदच्या घरी जातात. इकडे त्या परिस्थितीत म्हणजे कुठल्याही क्षणी प्रतिहल्ला होऊ शकेल, अशा स्थितीत मास्टरदा व सैन्य अन्य कारवाई सोडून तिथे फार काळ थांबू शकत नाहीत. इकडे अनंत सिंग व सहकार्यांच्या लक्षात येते की आपण निघालो खरे; पण आता हिमांशुला उपचारासाठी आनंदच्या घरी सोडल्यावर आपण परतायचे कुठे? इथे ताटातुटीला सुरुवात होते. अनंत सिंग, आनंद, माखन व गणेश हे वेगळे पडतात. घोर अंधारात भरकटल्यावर व दुसर्या दिवशीही गावात कोणाचा थांगपत्ता न लागल्याने, आता अशा परिस्थितीत इथे थांबण्यापेक्षा कलकत्त्यास जाणे व तेथे पुनर्बांधणी करुन नव्याने सुरुवात करणे, हेच त्यांना अधिक योग्य वाटते व प्रवास सुरू होतो. पुढे अनंतची आणि इतर तिघांची ताटातूट होते. मग पुढे तो एकटा भयाण प्रवास. वाटेतले ते अनुभव. ते भिकार्याचे वा वेड्याचे किंवा बहिर्या-मुक्याचे सोंग, उपासमार, अंगावर फक्त एक लंगोटी असताना कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी खड्डा खोदुन त्यात स्वत:ला गाडून वर माती ओढून घेणे, अखेर कोमिलामार्गे कलकत्ता व पुढे चंद्रनगरचा प्रवास, ताटातूट झालेल्या आनंद-गणेश-माखन या त्रिमूर्तीशी गाठ, पुढे आत्मसमर्पण, मग तुरुंगवास, तिथे आपले अन्य २६ सहकारी असल्याचा बोध, अर्धेंदुमार्फत त्या परिस्थितीतही तुरुंग फोडून बाहेर पडण्यासाठी केलेले व फसलेले थक्क करणारे प्रयत्न, मग अभियोग, सजा, अंदमानला रवानगी आणि तिथे ऐकलेले मास्टरदांच्या फाशीचे वृत्त असा हा पट उलगडत जातो. दुसरीकडे फार सहजगत्या गुंफलेले चुकामूक झाल्यानंतरचे मास्टरदा व अन्य सहकार्यांचे कथानक - ज्यात ताटातुटीनंतरची हालचाल, अवघ्या ५६ जणांनी हजारो सैनिकांना जलालाबादच्या टेकडीवरुन दिलेली जबरदस्त झुंज, त्यात अनेक क्रांतिकारकांचे बलिदान, अखेर घ्यावी लागलेली माघार व नंतरचे विखुरलेपण याचे वर्णन येते.
अनेक ठिकाणी असलेले उल्लेख हिंदुस्थान प्रजासत्ताक सेनेच्या कार्यपद्धतीचा, नीतीचा, सैनिकांच्या मानसिकतेचा व माणूसकीचा परिचय करुन देतात. आपली गाडी बंद पडल्यामुळे प्रत्यक्ष हल्ल्यापूर्वीच दुसरी गाडी मिळवणे त्यांना आवश्यक ठरते. ती गाडी ताब्यात घेताना चालकाला बंदिस्त करणे भाग असते. मात्र हात-पाय बांधलेल्या व डोळ्यापुढे मृत्यू दिसत असलेल्या त्या चालकाला जेव्हा अभय दिले जाते; इतकेच नव्हे तर लेखक निघताना आपल्या सहकार्यांना त्या चालकाला प्यायला पाणी व डोक्याखाली उशी द्यायला सांगतो. इथे त्या योद्ध्यांमधली माणूसकी आणि ’आपले वैर शत्रूशी आहे, उगाच कुणाचा जीव आपण का घ्यावा’ ही जाणीव दिसून येते. लष्कराचे शस्त्रागार लुटताना नाईलाजाने प्रथम पहारेकर्याला मारावे लागते, तेव्हा मोहीम सर झाल्यावर त्याच्या देहाला ध्वजात गुंडाळून मानवंदना दिली जाते. यात एका सैनिकाने दुसर्या सैनिकाचा राखलेला मान व राखलेले सहृदय वर्तनाचे भान दिसून येते. फॅरेलच्या पश्चात त्याच्या पत्नीला अभयदान दिले जाते व सांगितले जाते की तिने निर्धास्त असावे, कारण कुठलाही क्रांतिकारक कधीही स्त्रीला मारत नाही वा स्पर्श करत नाही. यात त्या सैनिकांवरचे संस्कार व सेनापतीची जरब दिसून येते. लेखक भरकटलेला असताना एका घराशी पोचतो, तेव्हा मुले त्याची वेडा म्हणून टर उडवत असताना एक जराशी मोठी मुलगी घरात जाऊन भरपूर अन्न आणते व त्याला जेवायला वाढते. तिचे उपकार लेखक आजन्म स्मरतो व जेव्हा केव्हा तिची आठवण येते, तेव्हा तिला तोंड भरुन आशीर्वाद देतो. अखेर क्रांतिकारक म्हणजे सुसंस्कृत माणचेच होती, ते काही हिंस्त्र खुनी वा लुटारु नव्हते, हे या उल्लेखांतून स्पष्ट होते.
या खडतर प्रवासातली वर्णने अंगावर काटा उभा करतात. सेनापती लोकनाथ जलालाबाद टेकडीवर लढत असताना तहानेने व्याकुळ होतो व लढणर्या पुलिनकडे पाण्याची विचारणा करतो. त्याच्याकडे पाणी नसते, मात्र असलेला एकुलता एक आंबा तो लोकनाथला देऊ करतो; जो लोकनाथ अर्थातच नाकारतो व पुन्हा लढायला सुरुवात करतो. काही वेळाने त्या आघाडीची पाहणी करायला लोकनाथ येतो, तेव्हा त्याला दिसतो तो गोळीने छिन्नविच्छिन्न झालेला पुलिनचा देह; आणि त्याच्या हातात तसाच धरलेला तो आंबा. अखेर मनावर दगड ठेवून लोकनाथ तो रक्ताचा ओघळ असलेला आंबा घेतो. लेखक एका मित्राच्या घरी आसरा घेतो. ते माता-पिता त्या चार मुलांना आश्रय देतात. पोलिसांचे भय असतानाही त्यांना घरात लपवतात, जेवू घालतात. अखेर निघायची वेळ होते. ते माता-पिता आपला मुलगा आता कुठे असेल हा विचार दूर ठेवून या मुलांची चिंता करतात आणि एकमेकांना विचारतात की ही मुले आता चालली खरी, पण त्यांचे काय होणार देव जाणे. लेखक इथे लिहितो "वाटले तेथून मागे फिरावे आणि त्या वात्सल्यमूर्तींना त्रिवार प्रणाम करुन सांगावे, ’आमच्यावर एवढी माया करु नका, नाहीतर आम्ही आमचे कर्तव्य विसरुन जाऊ. आम्हाला धीर द्या. बस्स बाकी काही नको’"
मनाला चटका लावणार्या अनेक गोष्टी कथेच्या ओघात उलगडत जातात. अशीच एक कथा चार मृत्युंजयांची. मास्टरदा आपल्या सेनेला माघार घेण्याचे आदेश देतात. सेना सुरक्षेसाठी छोट्या गटांमध्ये विभागली जाते. अनेक समूह आपले मार्गक्रमण सुरु करतात. फणींद्र प्रथम व नंतर होडी शोधण्यासाठी पुढे आलेला सुबोध चौधरी पोलिसांच्या हातात सापडतात. ते पाहून रजत सेन, मनोरंजन सेन, स्वदेश रॉय व देवप्रसाद गुप्त हे निसटतात व जुल्दा या खेड्यात आसरा शोधतात. मात्र गावकरी पोलिसांना खबर देतात. हे चार जण शेतातल्या एका झोपडीत लपलेले असतात. त्या झोपडीला शंभर सशस्त्र पोलिसांचा वेढा पडतो. चार विरुद्ध शंभर अशा विषम संग्रामात चार जण किती तग धरणार? अखेर पिस्तुलांमधल्या गोळ्या संपत येतात. निर्वाणीची वेळ येते आणि रजत आपली कल्पना सर्वांसमोर मांडतो. ती एकमुखाने स्वीकारली जाते व तात्काळ अमलात आणली जाते. झोपडीतून गोळीबार थांबताच पोलिस तिथे घुसतात आणि पाहतात तर या चौघांनी एकाच वेळी एकमेकांवर गोळ्या झाडून हौतात्म्य पत्करलेले असते.
या सर्व कथनात कुठे आपला वा पक्षाचा मोठेपणा नाही, कार्याचा गवगवा नाही, कसली खंत नाही, अन्याय झाल्याची तक्रार नाही की दैवाला दोष नाही. आपले सैन्य हे प्रशिक्षित सैन्य नसल्यामुळे बरोबर होकायंत्र नसणे, शस्त्रे व दारुगोळा एकत्र ठेवला जात नाही याचे ज्ञान नसणे, शस्त्रकौशल्याचा अभाव वगैरेची प्रांजळ कबुली मात्र आहे. स्वत:पेक्षा आपले साथीदार व आपले नायक यांचे वर्णन अधिक आहे. १७१ पानांचे हे आत्मकथन एका गौरवशाली पर्वाचा इतिहास आपल्यापुढे साकार करते.
अनुक्रमणिका
अनुभव
- ग्रंथालयात भटकंती - जाँ-पॉल सार्त्र
- वैज्ञानिक व पुस्तकांचे जग!
- 'साभार परती'चा शिक्का
- बौद्धांचे आणि जैनांचे संस्कृत साहित्यातले योगदान - एक आढावा
- सांगावेसे वाटले म्हणून.....
- डाऊन द मेमरी लेन
- कृतज्ञ!
- पुनर्वाचनाय च

प्रतिक्रियां
छान ...
मात्र क्रांतिकारकांविषयी वाचन करताना घडलेले प्राक्तन डोळ्यापुढे स्पष्ट असते.
अगदीं खरें. माझ्या हें लक्षांतच आलें नव्हतें. गौरवशाली पर्व आवडलें.
सुधीर कांदळकर