||दिवाळी २०१०||

कथा देशाच्या फाळणीची आणि अडकलेल्या तीन जीवांची
इंद्रराज पवार

इंग्लिश भाषेत  आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने  जगभर नावलौकिक मिळवलेले भारतीय लेखक कर्नल मनोहर माळगावकर यांचे या वर्षी १६ जूनला  उत्तर कन्नड जिल्ह्यातील  जगलपेट या छोट्या गावी वयाच्या  ९७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या  निधनाने ब्रिटिश साम्राज्य  आणि राजेशाहीतले लष्कर  आणि इतिहासलेखन यांच्यातील अखेरचा दुवा अंतर्धान पावला, असे म्हटले जाते आणि ते सत्यही आहे. सन १९१२ मध्ये गोव्यातील एका राजघराण्यात जन्मलेल्या श्री.माळगावकर यांनी मुंबई विद्यापीठातून इंग्लिश आणि संस्कृत विषयात पदवी मिळवली. त्या काळातील राजघराण्याच्या रीतिरिवाजांनुसार लष्करी शिस्तीतच त्यांचे पालनपोषण झाले आणि खेळांतील त्यांच्या आवडीनिवडीही संस्थानिकांच्या परंपरेतल्याच होत्या. शिकार आणि पर्यटन त्यांना विशेष भावत असे. पण पुढे त्यांना जनावरांच्या शिकारीतील फोलपणा उमजून आला व ते निसर्गप्रेमी आणि रक्षकाच्या भूमिकेतच अखेरपर्यंत वावरले. पदवीनंतर त्यांनी ब्रिटिश सैन्यात प्रवेश केला आणि दुसर्‍या महायुद्धात कर्नलच्या पदापर्यंत त्यांनी लष्करात सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर मात्र त्यांनी स्वत:ला पूर्णवेळ लेखनकार्‍यालाच वाहून घेतले. लेखनाची अनुभवसंपन्नता आल्याशिवाय कोणतेही लेखन प्रसिद्धीस न देता आपले लेखन, 'लेखनकसास' उतरले आहे की नाही हे त्यांनी स्वतःच पाहिले आणि सन १९६० मध्ये वयाच्या ४७ वर्षी, पहिली कादंबरी 'डिस्टंट ड्रम्स'  लिहिली. पहिल्याच कादंबरीचे भारत आणि इंग्लंडमधल्या सर्व समीक्षकांनी भरघोस स्वागत केले, कारण माळगावकरांनी आपल्या लष्करी सेवेच्या अनुभवाचा लेखनात केलेला अचूक वापर. शिवाय इंग्लिश भाषेवर असलेली जबरदस्त हुकूमत सर्वसामान्य वाचकावर अशी काही जादू करून गेली की 'इंडियन रायटर्स इन इंग्लिश' या संज्ञेत येणार्‍यांमध्ये त्यांचे नाव एकाच कादंबरीत झाले. येथून सुरू झाली माळगावकर एक्स्प्रेस आणि पुढील काळात कॉम्बॅट ऑफ शॅडोज (१९६२), दि प्रिन्सेस (१९६३), अ बेन्ड इन दि गॅन्जेस (१९६४) आणि दि डेव्हिल्स विंड (१९७२) अशा ५ कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या; ज्या इंग्लिश भाषेत खपाचे उच्चांक निर्माण करणार्‍या ठरल्या - विशेषतः दि प्रिन्सेस आणि अ बेन्ड इन दि गॅन्जेस.

मनोहर माळगावकर केवळ कादंबरीकारच नव्हते तर एक इतिहासलेखक म्हणूनही प्रसिद्ध होते. या गटात त्यांनी  १९५९ मध्ये लिहिलेल्या 'कान्होजी आंग्रे' या पुस्तकाने इतिहाससंशोधकांची दाद मिळवली. १९६२ मध्ये 'देवासचे पवार' आणि १९७१ मध्ये लिहिलेले 'छत्रपतीज् ऑफ कोल्हापूर' हे दोन ग्रंथ त्यांच्या या विषयातील व्यासंग आणि लेखनशैलीचे साक्षीदार आहेत. कोल्हापुरचे शहाजी राजे आणि माळगावकर एकाच रेजिमेंटमध्ये लष्करी अधिकारी असल्याने, शिवाय बेळगावहून माळगावकरांचे सातत्याने कोल्हापूरला येणे असल्याने दोघांची मैत्रीही चांगलीच जमली होती. राजघराण्यातील लोकांसमवेत सातत्याने राहिल्याने 'प्रिन्सेस' कादंबरीतील राजेशाही वातावरणनिर्मिती इतकी छान जमली आहे की जणू काय ती कहाणी खुद्द राजघराण्यातील एक व्यक्तीच सांगत आहे, असे वाटते. ३० जानेवारी १९४८ रोजी झालेली महात्मा गांधींची हत्या आणि त्यात सहभागी असलेले संबंधित आणि खटला यावर माळगावकर यांनी इतिहाससंशोधकाच्या भूमिकेतून केलेला अभ्यास आणि मिळवलेली अस्सल कागदपत्रे, फोटो, मुलाखती यांवर आधारित लिहिलेले पुस्तक म्हणजे 'द मेन हू किल्ड गांधी'. 

फाळणीचे कारण, तो इतिहास, तो नरसंहार; हिंदू-मुस्लिमांत निर्माण झालेली अविश्वासाची दरी; दिल्ली, लाहोर, कलकत्ता यांसारख्या मोठ्या शहरांत उडालेला हाहा:कार; अश्राप जिवांच्या हत्या, बेअब्रू, लूटमार; स्वातंत्र्याच्या पहाटेदेखील या शहरांत हिंसेमुळे झालेला अंधार आदी घटनांचे माळगावकर साक्षीदार होते. स्वातंत्र्याच्या या धगीत त्यांच्यातील लेखकाने या मागील शोधलेली कारणे आणि त्या काळातील तरुण-तरुणींच्या भावविश्वाला बसलेले हादरे यावर आधारित लिहिलेली कादंबरी म्हणजेच 'अ बेन्ड इन दि गॅन्जेस'. या कादंबरीला निव्वळ ललित लेखन म्हणून नव्हे तर एका इतिहासकाराने त्या माध्यमाद्वारे एका प्रखर कालखंडाचा घेतलेला विलक्षण असा संघर्षमय मागोवा होय.

कादंबरीचे कथानक  देशाच्या फाळणीपूर्वीच्या  वातावरणावर असून गांधीजींच्या 'अहिंसा आणि सत्याग्रह' तत्त्वांवर निष्ठा असणारे आणि भारताला स्वातंत्र्य हे 'ठोशास ठोसा आणि रक्तरंजित क्रांती' या न्यायानेच मिळणार, असे मानणारे युवक यांच्या अवतीभवती घडते. दुसरा एक असाही गट आहे, जो संस्थानिकांच्या मानसिकतेचा आहे. म्हणजे ब्रिटिश हेच खरे आपले तारणहार असून त्या साम्राज्याविरूद्ध लढणारे निव्वळ मूर्खच नसून देशद्रोहीही आहेत या विचारांचा. या कादंबरीची खर्‍या अर्थाने नायिका आहे ती 'सुंदरी'. कोट्यधीश दिवाणबहादूर टेकचंद केरवाड यांची अप्सरेसारखी आणि नावासारखीच सुंदर असलेली, स्वर्गसुखात लोळणारी मुलगी. रुढार्थाने तिच्यासाठी कुणी 'नायक' नाही. आहेत ते तिच्या आयुष्याशी निगडीत असणारे तीन पुरूष. पहिला - तिच्या नजरेतच नव्हे तर हृदयात सदैव वास्तव्य करून कोण राहात असेल तर तो तिचा धाकटा भाऊ 'देवीदयाल'; जो ब्रिटिशांशी असलेल्या संबंधामुळे आपल्या बापाशी नाते तोडून शफी उस्मान नावाच्या क्रांतिकारी तरुणाने स्थापन केलेल्या एका छुप्या क्लबचा मेंबर आहे. या क्लबमध्ये हिंदू आणि मुसलमान एकत्र जमतात, एकतेचे प्रतीक म्हणून शपथ घेतात, धर्माच्या कुबड्या धुडकावून देण्यासाठी डुक्कर आणि गाईचे मांस एकत्र शिजवतात आणि एकाच थाळीत जेवतात. 'स्वातंत्र्याचा मार्ग हा बंदुकीच्या नळीतूनच जातो ' ह्या तत्त्वावर,  या 'हनुमान क्लब' सदस्यांचा असल्याने ब्रिटिश साम्राज्याला पूरक ठरणारे रेल्वेमार्ग उडवणे, रात्रीबेरात्री ब्रिटिशांची वाहने, शस्त्रागार जाळणे आदी धाडसी उद्योग हे तरूण करत असतात. यासाठी लागणारा पैसा आणि स्फोटासाठी लागणारे ज्वालाग्राही पदार्थ केरवाड कन्स्ट्रक्शनच्या गोदामात असल्याने देवीदयाल ते छुप्या रीतीने घेऊन येत असतो. त्यामुळे त्याला अन्य तरुणांत मिळणारा मान शफीलाही काहीसा खटकत असतो.

सुंदरीच्या  आयुष्यात मात्र या चळवळी, क्रांती, प्रतिक्रांती, अहिंसा, सत्याग्रह असल्या गोष्टींना स्थान नाही. तिला आपल्या भावाविषयी विलक्षण ओढ असते कारण देवीदयाल सातत्याने आई-वडलांशी फटकून वागत असतो  आणि देवीच्या बाहेरच्या सार्‍या  व्यवहारांवर पांघरूण घालण्याचे काम सुंदरी करत असते. असे असले तरी ज्यावेळी लाहोरमधील बंगल्यात त्याच्या खोलीची साफसफाई करताना जेव्हा तिला एका कपाटात जिलेटीन आणि डिटोनेटर्सच्या कांड्या लपवून ठेवलेल्या आढळतात, त्यावेळी ती हादरून जाते. गेल्याच महिन्यात स्फोटक पदार्थाच्या गोदामात काही गफलती झाल्या असल्याचा टेकचंद आणि संबंधित अधिकारी यांच्यातील संवाद तिने ऐकलेला असतो आणि तेच पदार्थ आपल्या भावाच्या कपाटात सापडणे आणि त्याचे रात्र-रात्र हनुमान क्लबमध्ये १२-१५ तरूणांसमवेत राहणे या गोष्टींचा संबंध चटकन तिच्या लक्षात येतो.

कालपर्यंत आपल्या पदराला धरून शाळेत जाणारा, फुलपाखरालादेखील हात न लावणारा, कॉलेजकुमार असूनही अजून भीती वाटली की आईकडे न येता आपल्याकडच येणारा हा देवीदयाल एक क्रांतिकारक असून तो ब्रिटिश साम्राज्य उखडून टाकणार्‍या गटात सहभागी आहे,  ही बाब तिला केवळ असंभवनीय वाटते. पण आता हे डिटोनेटर्सचे पाकीट पाहिल्यावर शंकेला जागाच उरत नाही.

सुंदरीच्या  आयुष्यातील दुसरा पुरुष  म्हणजे तिचा नवरा - गोपाल  चांदीदार. राजघराण्यातील  रूबाबदार लष्करी अधिकारी. मुंबईच्या  उच्चभ्रू वर्तुळातील एक वजनदार आणि दिलफेक व्यक्तिमत्व. सोसायटी गर्ल्सच्या गराड्यात सदैव असला तरी 'केरवाड घराणे' दिल्ली-लाहोर येथे काय समजले जाते, याची जाणीव असल्याने त्याच घराण्यातील ही अप्सरा, 'सुंदरी' त्याने पत्नी म्हणून स्वीकारलेली असते. दुसरीकडे खुद्द सुंदरीलादेखील तो नापसंत असण्याचे काहीच कारण नसते; शिवाय तिचा आपल्या आईवडिलांवर विश्वास असतोच. लग्न ठरते.

केरवाड कन्स्ट्रक्शन्स आणि ब्रिटिश सरकार यांचे  सौहार्दाचे संबंध. त्यामुळे लाहोर, दिल्ली येथे मिळणारी पूल, रस्ते आदी बांधकामांची कंत्राटे आणि त्यातून उभा राहिलेली त्यांची प्रचंड इस्टेट. टेकचंदांची तितकीच रुपवान पत्नी राधा आणि दोन अत्यंत रूपवान, सुशिक्षित मुले. हे एकीकडे तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील एका छोट्या खेडेगावात राहणारे दोन भाऊ.  हाडाचा शेतकरी असणारा थोरला तुकाराम आणि त्याच्या शेतावर डोळा असणारा,  गावातच राहणारा चुलतभाऊ विष्णू.  देशात सर्वच ठिकाणी आढळून येणारी जमीनजुमल्याची आणि दाव्यांची, खटल्याची ही परंपरा तुकारामाच्या बाबतीतही लागू पडतेच. पण त्याचा ब्रिटिश न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास. जिल्हा न्यायालयात केवळ ब्रिटिश जज होता म्हणूनच पिपलोडचे आपल्या आजोबांनी रक्त घाम गाळून पिकवलेले सोन्यासारखे शेत आपल्याला विष्णूच्या तावडीतून परत मिळाले असे मानणारा एक पारंपरिक शेतकरी. तो वकिली शिक्षणाचे महत्त्व जाणतो आणि म्हणूनच परवडत नसले तरी आपला धाकटा भाऊ ग्यान तलवार याला  कॉलेजसाठी लाहोरला पाठवितो. हुशार पण शहरी जीवनाशी पूर्ण अनभिज्ञ असलेला ग्यान हा गांधींच्या 'अहिंसा' तत्त्वाचा एकनिष्ठ पाईक. गांधींच्या मार्गानेच देशाला शेवटी स्वातंत्र्य मिळणार यावर गाढा विश्वास असलेला एक स्वप्नाळू तरूण; जो एकदा वर्गातील सर्वात श्रीमंत आणि राजेशाही  थाटाने राहाणार्‍या देवीदयाल केरवाड या तरूणाने आयोजित केलेल्या, लाहोरबाहेर नदीकाठच्या छोट्याश्या सहलीला घाबरत घाबरत हजर राहतो. तेथे हनुमान क्लबचे काही सदस्य तर असतातच, पण काही तरूणीही असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक अप्सरेसारखी दिसणारी, राजेशाही थाटाने सहलीत वावरणारी तरूणी; जी ग्यानची (भावाचा मित्र म्हणून) आपुलकीने वरवरची नेहमीची चौकशी करते; ती स्वप्नवत वाटणारी तरूणी, सुंदरी पाहून हा खेडेगावातील ग्यान तलवार थिजूनच जातो. अशाही अप्सरा असतात आणि आज त्यांच्यासोबत असण्याचं  भाग्य आपल्याला मिळालं यात खूष असतो.  सहलीतच, मुली दुसरीकडे पोहण्यासाठी गेल्यानंतर, देवीदयाल आणि त्याचा एक मित्र  'स्वातंत्र्य शस्त्रानेच कसे मिळेल' हा विषय सुरू करतात आणि ग्यानला त्याचे मत विचारता तो 'शस्त्रावर आपला विश्वास नसून मी अहिंसेचा पुजारी आहे आणि गांधींच्या मार्गानेच या देशाला स्वातंत्र्यप्राप्ती होईल' असे प्रतिपादन करतो. यावर वादविवाद झडतात पण शेवटी ग्यान आपला मुद्दा सोडत नाही आणि क्रांतिकारक त्यांचा. दरम्यान सुंदरीसह मुलीही पोहून आल्यानंतर सहल खाणेपिणे झाल्यानंतर संपते आणि ग्यान आता ही सुंदरी परत कधीही दिसणार नाही या विचारात हॉस्टेलवर परत येतो. हा ग्यान तलवार सुंदरीच्या पुढील आयुष्यातील तिसरा पुरूष ठरतो.

स्वातंत्र्याच्या  लढा अहिंसा आणि हिंसा  या दोन्ही मार्गांनी चालू असतानाच कॉलेजला उन्हाळ्याची  सुट्टी पडते आणि हॉस्टेलवरून  ग्यान आपल्या खेडेगावी परत  येतो. स्टेशनवरून घरी परतताना  तुकाराम त्याला 'आपण पिपलोड शेताची केस जिंकली, कोर्टाचा हुकूमनामा मिळाला आणि आता सुमारे ५० एकर जमीन आपल्याला मिळाल्याने अखेर एकदाची आपली गरिबी दूर झाली. उद्याच शेताची पूजा करून शेत ताब्यात घ्यायचे. हे सगळे झाले का? तर ब्रिटीश जज्ज असल्याने.', अशी बातमी देतो.  या बातमीने ग्यानलादेखील अर्थातच आनंद होतो कारण घरात आजी आणि तुटपुंज्या शेतात थोरला भाऊ कसा राबत असतात व आपल्या कॉलेज शिक्षणाची कशी काळजी करतात, हे त्याने पाहिलेले असते. पण हिंदुस्थानातील जमिनीचे कज्जे-खटले इतक्या सोप्या रीतीने कधीच संपत नसतात. दुसर्‍या दिवशी दोघे भाऊ शेताचा कबजा घ्यायला जातात, त्यावेळी चुलतभाऊ विष्णु गुर्मीने 'फेकून द्या तो हुकूमनामा. डिस्ट्रिक्ट कोर्टानंतर दिल्लीला हायकोर्ट आणि लंडनला प्रिव्ही कौन्सिल नावाचा एक प्रकार असतो हे माहीत आहे का तुम्हा दोघांना? माहिती करून घ्या आणि या शेताकडे.", असे म्हणत उद्दामपणे त्यांना डिवचतो. तुकाराम संतापाने उफाळतो, पण ग्यान भावाला "आपण कायद्याच्या मदतीने शेताचा ताबा घेऊ या. चल परत फिरू या.", अशी विष्णूचा खरा इरादा जाणून विनवणी करतो. पण संतापाने थरथरत असलेला तुकाराम न ऐकता विष्णूच्या अंगावर धावून जातो. विष्णू हातातील कुर्हाडीने तुकारामाची हत्या  करून शेजारील तळ्यात ती कुर्हाड फेकून तिथून पोबारा करतो. हताश आणि अहिंसाप्रिय ग्यान कायद्यावर विसंबून पोलिसात गुन्हा नोंदवतो. पण विष्णूचे घराणे गावातील जमीनदाराचे व गब्बर असल्याने, तसेच ग्रामीण भागात असले जमिनीचे झगडे नवीन नसल्याने साक्षीदारांना पैशाने आणि ताकदीने विकत घेतले जाते. ज्या हत्याराने तुकारामाचा खून करण्यात आला, असे ग्यान सांगतो ती कुर्हाडच सोयीस्कररीत्या पोलिसांना सापडत नाही व विष्णू खटल्यात पुराव्याअभावी निर्दोष सुटतो. ग्यानच्या आयुष्यातील सर्व आनंद, पोलिसांवरील विश्वास, अहिंसेचे महत्त्व आणि गांधीवरील निष्ठा निकालाच्या रात्रीच संपुष्टात येते. 

दुसर्‍या दिवसापासून आजीकडून भाकरीभाजी बांधून घेऊन तो त्या तळ्याच्या काठीच  जणू मुक्काम ठोकतो आणि  पाण्यात उतरून दिवसभर त्या कुर्हाडीचा शोध घेत  राहतो. चौथ्या-पाचव्या दिवशी  अथक परिश्रमांअखेर ग्यानला  ती कुर्हाड कदाची सापडते. रात्र सरते आणि दुसर्‍या दिवशी सकाळीच तो त्याच  पोलिस स्टेशनवर त्याच फौजदारासमोर  कुर्हाडीसह उभा राहतो. त्याला पाहून गोंधळात पडलेल्या फौजदाराने वरच्या आवाजात, 'का आला आहेस?' असे विचारल्यावर, ग्यान शांतपणे त्याच्या टेबलवर गुन्ह्यातील ती कुर्हाड ठेवून उदगारतो, "हीच ती कुर्हाड जी वापरून विष्णूने माझ्या भावाला मारले, आणि आत्ताच याच कुर्हाडीने मी विष्णूचा खून केला आहे!" हबकलेल्या फौजदाराला त्यावेळी ग्यानच्या शर्टावर उडालेले रक्ताचे डाग दिसतात. ग्यानला खुनाबद्दल 'काळ्या पाण्या'ची शिक्षा होते आणि त्याची रवानगी अंदमानच्या 'सेल्युलर जेल'मध्ये करण्यासाठी बोटीत बसवले जाते.

कथानकात एकीकडे हे नाट्य घडत असताना इकडे लाहोरमध्ये 'मुस्लिम लीग'चे म्होरके स्वातंत्र्यानंतर आपण हिंदूंचे वर्चस्व सहन का करायचे यासाठी पाकिस्तानची मागणी करत असतात आणि जे मुसलमान तरूण, क्रांतीच्या नावे हिंदूंसमवेत काम करीत आहेत त्यांना लीमध्ये आणायचे, त्यांचे ब्रेनवॉश करायचे या प्रयत्नात असतात. लाहोरमध्ये त्यांचे खास लक्ष असते ते शफी उस्मान या 'हनुमान क्लब'च्या सूत्रधारावर. लीगचा नेता शफीला स्वातंत्र्यानंतर होऊ घातलेली मुसलमानांची ससेहोलपट अशा काही पद्धतीने रंगवून सांगतो  की शफीचा त्यावर विश्वास बसतो. त्यातच देवीदयालचा गटात वाढत चाललेला प्रभावही त्याला खटकत असतोच. रेल्वे पूल आणि ब्रिटिश एअर फोर्सचे विमान उडविल्यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांतील एक मुसलमान इन्स्पेक्टर, जो लीगचा सदस्य असतो, तो 'उद्या हनुमान क्लबवर ब्रिटिश पोलिसांचा छापा पडणार' अशी आतली बातमी शफीला देतो. शफी जाणीवपूर्वक फक्त मुसलमान सदस्यांना सजग करतो आणि ते छाप्यादिवशी लाहोरबाहेर लपतात. त्यामुळे पोलिसांच्या छाप्यात सापडतात ते फक्त हिंदू तरुण. त्यातही स्फोटासाठी जो डिटोनेटर्स पुरवत असतो तो देवीदयाल सापडल्यामुळे ब्रिटिश पोलिसांना बळ येते. शफीच्या दगलबाजीचे उदाहरण या हिंदू तरूणांना जाणवते ण आता उशीर झालेला असतो. दिवाणबहादूर टेकचंद केरवाड यांचे सरकारदरबारी असलेले वजन राज्यद्रोहाच्या खटल्यात कामी येत नाही  आणि देवीदयालला काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली जाते. त्याचीही रवानगी अंदमानला जाणार्‍या बोटीत केली जाते. तिथे तो ग्यानला पाहतो . त्याला खुनाबद्दल जन्मठेप झाल्याचे समजताच त्याच्या मनात अहिंसेचे गोडवे गाणार्‍या पण प्रत्यक्षात खुनीच असल्याचे सिद्ध झालेल्या ग्यानबद्दल तिरस्कार निर्माण होतो आणि बोटीतच काय पण अंदमानात शिक्षेच्या काळातदेखील एका अक्षराने संवाद साधत नाही.

इकडे सुंदरीच्या लग्नात काही विघ्न नसते, पण ते ज्यावेळी होते त्यावेळी साहजिकच तिचा लाडका भाऊ भारतात कच्च्या कैदेत असतो. ज्या वेळी गोपाल चांदीदार मधुचंद्राला जाण्याची तयारी करत असतो त्याचवेळी देवीला काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्याची अंदमानला रवानागी केली, ही बातमी येते.  सुंदरीच्या मनाला झालेल्या यातनांनी तिचा लग्न आणि मधुचंद्रातील आनंद नासून जातो. ही पहिली पायरी ठरते तिच्या आणि गोपालच्या कधीतरी नष्ट होणार्‍या संसारसुखाची. गोपाल तिला मुंबईला घेऊन येतो आणि आपल्या उच्चभ्रू मित्रमैत्रिणींत रमून जातो. सुंदरीला त्याच्या या आयुष्याशी काही देणेघेणे नसते, पण जेव्हा मुंबईच्या फॅशन दुनियेतील एका किरकोळ मॉडेलला गोपाल घरी आणायला सुरूवात करतो, त्यावेळी तिला ते सहन होत नाही आणि जरी एकत्र राहत असले तरी त्यांच्यातील पती-पत्नीचे नाते म्हणजे फक्त पार्ट्यांपुरतेच मर्‍यादित राहते.

इकडे सेल्युलर जेल, अंदमान येथे सक्तमजुरी भोगणार्‍या कैद्यांचे जीवन सुरू होते. कडक ब्रिटिश लष्करी शिस्तीचा, उग्र सुपरिंटेंडंट असतो पॅट्रीक मुलीगन. देवीदयाल त्याच्या कठोरपणाचा, अमानवी शिक्षेचा शिकारी ठरतो.  मात्र दुसरीकडे खुनाबद्दल शिक्षा झालेला ग्यान तलवार आपल्या शांत स्वभावाने, कॉलेज शिक्षणामुळे, कारकुनी कामातील नैपुण्याने पॅट्रिक मुलीगनचा विश्वास संपादन करून तीन वर्षानंतर पॅरोलवर सुटतो. पण इकडे भारतातील त्या खेड्यात, आजीच्याही मृत्युमुळे त्याचे असे कुणीही आता हयात नसल्याने भारतात यायची त्याची इच्छाच मरते व मनोमनी आपण आता अंदमानमध्येच कायम वास्तव्य करून इथल्याच मातीतील एखाद्या स्त्रीबरोबर संसार करायचा, असे ठरवून मुलीगनच्या तुरुंग परिसरातीलच मुख्य कार्‍यालयातील कारकुनी नोकरी स्वीकारतो. पॅट्रिकलाही तो हवा असतोच. कुणालाही न सांगता पॅट्रिक त्याला आणीबाणीच्या परिस्थितीत फुंकण्यासाठी एक पितळी शिट्टी देतो, जी जेल मॅन्युअलनुसार फक्त सुपरिंटेंडंट आणि मुख्य वॉर्डनकडेच असू शकते. अंदमान जेल येथील अन्य भारतीय कैद्यांच्या मनात पॅट्रिक मुलीगनच्या या चमच्यासम नोकराबद्दल, ग्यानबद्दल, कमालीची चीड निर्माण झालेली असते; कारण कुणासही ब्रिटिश ऑफिसरसमवेत जवळचे संबंध स्थापणारा नको असतो. त्यातच एकदा देवीदयालला बाहेर काम करत असताना मुख्य वॉर्डनला ढकलून, शेताच्या बाजूने पळून जाण्याची संधी मिळते. देवीदयालला मानणारे बाकीचे काही कैदी त्याला निसटून जाण्यास मदत करीत असतानाच ते दृश्य पाहणार्‍या  ग्यानकडून अगदी अभावितपणे ती आणीबाणीची, धोक्याची शिट्टी वाजवली जाते आणि अन्य शिपाई सजग होऊन देवीदयालला पकडतात. पॅट्रिक त्याला जाहीर फटक्यांची शिक्षा फर्मावितो. त्यातली देवीची रक्तबंबाळ अवस्था पाहताना सर्वजण ग्यानकडे खुनशी नजरेने पाहतात. आता फक्त कैदीच नव्हे तर जेलचे अधिकृत शिपाईही ग्यानला वाळीत टाकतात कारण हा साहेबांचा आतील बच्चा आहे, हे त्या शिट्टीवरून त्यांना समजून चुकते.

ग्यानला आपल्या करणीचा पश्चात्ताप होत असतो. त्याची भरपाई करण्याची त्याला संधी मिळते. एकदा टपालात देवीदयालसाठी सुंदरीकडून आलेला एक मोठा लिफाफा त्याला मिळतो. मात्र  सुंदरीने ते पत्र पाठविताना  वापरलेले पाकीट हे गोपालकडील  ब्रिटिश लष्करी शिक्क्याचे असल्याने, जेलर पॅट्रिक ते देवीच्या हातात देण्यात यावे अशी सूचना करतो. त्याच्याच परवानगीने ग्यान स्वतः देवीच्या कोठडीत जातो, पण त्याच्याकडे देवी महारोग्याकडे पाहावे तसे पाहतो व गांधींच्या या असल्या भेकड अहिंसावाद्याशी तुच्छतेने बोलतो. त्याने दिलेला तो ब्रिटिश लष्करी शिक्क्याचा लिफाफा त्याच्याचसमोर जेलच्या खिडकीतून बाहेर भिरकावून देतो. निराश मनाने ग्यान त्या सेलमधून बाहेर पडतो आणि उत्सुकतेने खिडकीबाहेर पडलेला तो लिफाफा आपल्या खोलीत घेऊन येतो. लिफाफ्यात देवीसाठी एक पत्र, काही शंभराच्या नोटा व खुद्द सुंदरीचा लग्नानंतर काढलेला एक आकर्षक फोटो असतो.  तिच्याकडे पाहात ग्यान अंदमानातील आपल्या रात्री जागवत राहतो.

दुसरीकडे जगात दुसर्‍या महायुद्धाचा भडका उडालेला असतो. जपानने पर्ल हार्बरनंतर मारलेल्या जोरदार मुसंडीनंतर हिंदी महासागराच्या कक्षेतील ब्रिटिश साम्राज्य  हादरुन जाते. जपान कोणत्याही  क्षणी अंदमान, निकोबार बेटे ताब्यात घेणार ही चिन्हे दिसू लागताच तेथील ब्रिटिश नागरीकांना, तसेच जेलर पॅट्रिक मुलीगन आणि जेलच्या कर्मचार्‍यांना जपान्यांच्या हाती आपले भविष्य काय असणार हे स्पष्ट दिसू लागते. जेलर मुलीगन ग्यानला आता 'तू अंदमानमध्ये कायम राहण्याचा विचार सोडून दे', असा शहाणपणाचा सल्ला देतो. ग्यानलाही तोपर्यंत कैद्यांच्या नजरेत आपली काय लायकी आहे हे कळून चुकलेले असते. विशेषतः देवीदयालची झालेली शोचनीय हालत सर्वांनी पाहिली असल्याने जपानी इथे आल्यानंतर केवळ देवीच नव्हे तर अन्यही आपल्याला हाल हाल करून मारतील, हे तो ओळखतो आणि काही ब्रिटिशांनी गुपचूप पळून जाण्याच्या इराद्याने तयार ठेवलेल्या बोटीतून मद्रासला येऊन पोचतो.

मद्रासमध्ये आल्यानंतरही  तो समाधानाने राहू शकत  नाही कारण काही झाले तरी ब्रिटिशांच्या  नजरेत तो अद्याप खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी आहे. अन् समजा उद्या जपान-जर्मनीचा युद्धात  पराभव झाला तर इथले सरकार  पुनश्च अंदमानातून पळून गेलेल्या कैद्यांचा शोध घेणार  व आपले हे स्वातंत्र्य  क्षणभराचेच राहणार; तेव्हा नाव बदलून, तशी कागदपत्रे करून मुंबईसारख्या मोठ्या शहरात काहीतरी नोकरी कामधंदा शोधून तिथलाच नागरिक म्हणून राहण्यात जास्त शहाणपणा आहे, असे तो ठरवितो.

एक निश्चित  असा बनाव त्याच्या डोक्यात  तयार होऊ लागतो. फसवणुकीचा  एक असा हमखास यशस्वी होईल असा बेत ठरवून मद्रासहून  तो पूर्व पंजाबमधील आपल्या त्या वाडवडिलार्जीत इस्टेटीकडे येतो. तिथे आता भग्नावशेषांशिवाय काही शिल्लक नसते. कुणालाही आगमनाची बातमी कळू नये  म्हणून मध्यरात्रीच्या सुमारास  तो त्या जुन्या घरात शिरतो. थोडा वेळ थांबतो आणि देवघरातील, त्याच्या आजोबांना पिपलोड नांगरटीवेळी सापडलेली, पितळेची शंकराची जडशीळ मूर्ती एका फडक्यात बांधून घेतो. तिचे स्वरूप एखाद्या किंमती अँटिक वस्तुसारखे असते. पहाटे तो आपले गाव सोडतो आणि थेट लाहोरमध्ये येऊन टेकचंद केरवाड मॅन्शनमध्ये प्रवेश करतो. पूर्वी सहलीत त्याने थोडा वेळ दिवाणबहादूर टेकचंद यांचे वैयक्तिक म्युझियम पाहिलेले असते आणि त्यातील अनेकविध प्राचीन आणि दुर्मीळ वस्तुंबरोबरच काही देवीदेवतांच्या मूर्तीही त्याने मनी नोंदवलेल्या असतात. त्याच्या येण्याची नोंद नोकराद्वारे आत गेल्यावर तो तिथेच दिवाणखान्यात इकडेतिकडे घुटमळत असताना अचानक सुंदरी तिथे प्रवेश करते. तिला पाहून तो विस्मयाने थक्कच होतो कारण त्याच्या डोक्यात आता त्या बंगल्यात फक्त दिवाणबहादूर आणि त्यांच्या पत्नी हेच दोघे वास्तव्यास असतील, सुंदरी तर नवर्‍यासमवेत मुंबई वा तत्सम मोठ्या शहरात असेल; असे असते. सुंदरीचे त्याच्याकडे अर्थातच जास्त लक्ष जात नाही कारण ती तिच्या स्पिंडल नावाच्या कुत्रीला शोधत दिवाणखान्यात आलेली असते. ती सापडल्यावर घेऊन जाताना सहज त्याला विचारते, 'मी तुला इथे पूर्वी पाहिलंय काय?'. ग्यानला नेमके काय उत्तर द्यावे समजत नाही, पण तरीही धीर धरून तो म्हणतो, 'हो, मी एकदा देवीदयालसमवेत तुमच्याकडील सहलीला आलो होतो. खरं आता मी तुमच्या वडिलांना कामानिमित्त भेटायला आलो आहे.". "ओ, तरीच चेहरा पाहिल्यासारखा वाटला.', इतकेच बोलून सुंदरी वर निघून जाते. काही वेळाने टेकचंद प्रवेश करतात आणि ग्यान त्यांना आपल्याकडील ती दुर्मीळ शिवाची मूर्ती, तुमच्या संग्रहालयासाठी आणली आहे असे सांगतो. दिवाणबहादुरांना ती खूपच आवडते. चोरीची नाही याची खात्री ते पटवून घेतात आणि मूर्तीची योग्य ती किंमत ग्यानला देऊ करतात. ग्यानच्या फसवणुकीच्या योजनेत मूर्तीची किंमत पैशात करायची नाही हे ठरलेलेच असते. तो दिवाणबहादुरांना आपली खरी ओळख करून देतो. "मी अंदमानच्या कैदेत होतो, तुमच्या मुलासमवेत. देवीदयाल आणि मी दोघेही कॉलेजमधले मित्र. अंदमानमध्ये आम्ही आणखीन जवळ आलो. मी कैदेतून स्वतःची सुटका करून घेतली पण देवीने माझ्यासमवेत येण्यास नकार दिला आणि तो आता जपान्यांच्या कैदेत आहे. मात्र मी भारतात परतणार याची त्याला खात्री झाल्यानंतर त्याने इथे तुमच्याकडे येऊन नोकरीसाठी विनंती करण्याचा सल्ला दिला. त्यासाठीच ही माझ्या पूर्वजांकडील दुर्मीळ मूर्ती मी इकडे म्युझियमसाठी आणली आहे."

दिवाणबहादूर थोडेसे गोंधळात पडतात, पण देवीची आई राधा आणि अर्थातच बहीण सुंदरी (जी गोपाल युद्धावर गेला असल्याने लाहोरला परत आलेली असते), 'देवीची बातमी घेऊन त्याचा अंदमानमधील मित्र' आल्याच्या बातमीने एकदम आनंदित होतात आणि त्यांनी केलेल्या आग्रहामुळे शेवटी टेकचंद 'केरवाड कंस्ट्रक्शन'च्या मुंबई कार्यालयात ग्यानला पर्यवेक्षकाची नोकरी देतात. ग्यान आनंदात, शेवटी आपला बनाव यशस्वी झाला समजून, मुंबईला येऊन माझगाव डॉकच्या परिसरातच एक खोली घेऊन, समाधानाने या अवाढव्य शहरात आणि कामात बुडून जातो.

इकडे जपान्यांनी अंदमान ताब्यात घेतल्यावर  व तिथला इतिहास तपासल्यावर देवीदयाल हा ब्रिटिशांच्या  किती विरूद्ध होता, हे जाणतात आणि केवळ त्या ठिकाणाचाच नव्हे, तर जपानच्या पुढील वाटचालीतील भारताचा प्रतिनिधी म्हणून देवीची निवड करतात. त्याला कमांडरपदाचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात होते. देवी तिथे, आपले नव्या दर्जातील दिवस व्यतीत करत असताना त्याला हळूहळू उमगू लागते की जपान हा देशदेखील ब्रिटिशांसारखाच साम्राज्यवादी आहे आणि ते आपल्या भारतीयपणाचा फायदा घेऊन त्यांचेच साम्राज्य वाढवण्यात रस दाखवणार. पण तो शांत राहतो कारण कोणत्याही निमित्ताने त्याला अंदमान सोडून भारतात परत यायचे असतेच. पुढे जपानी प्रमुख पुढील कार्यवाहीसाठी जपानी प्रतिनिधी म्हणून देवीदयालला कलकत्त्यास पाठतात. सोबत पैसाही भरपूर दिलेला असतोच. एका हेतूपूर्तीच्या समाधानात देवी कलकत्त्यास येतो आणि 'हनुमान क्लब'मधील त्याचा एक जिवलग मित्र बसू याला भेटतो. बसूदेखील शफी उस्मानच्या दगलबाजीचा बळी असतो. पण त्याला किरकोळ शिक्षा झाली असल्याने, ती संपल्यानंतर कलकत्त्यातच नोकरी करीत पत्नीसह संसार करीत असतो. देवीदयालला पाहून त्याला आनंदाचे भरते येते. दोघे मित्र आपणास दगाफटका केलेल्या शफी उस्मान या लीगीला धडा शिकवायचाच, हा निर्धार करतात. लीगने पूर्व बंगालवर आपला (पाकिस्तानचा) हक्क सांगितला असल्याने तेथील कारवाईसाठी शफी उस्मान सध्या कलकत्त्यातच असल्याची बातमी बसू देवीला सांगतो. मुक्काम अनारकली लेनमध्ये एका नायकिणीच्या कोठीवर. त्या नायकिणीकडे असलेल्या एका रूपवतीच्या प्रेमात तो पागल झालेला असतो. तिचे नाव मुमताझ. पण नायकिणीने तिची जी किंमत सांगितलेली असते, ती देण्याची त्याची क्षमता नसतेच. तरीही तिचा नाद त्याने सोडलेला नसतो. देवीची आणि शफीची त्या कोठीवर भेट होते आणि शफी देवीला समोर पाहून गर्भगळित होतो. देवी त्याची दगलबाजीबद्दल यथेच्छ निर्भर्त्सना करतो. त्याच्या अंगाला हातदेखील लावू नये असे त्याला वाटत राहते. पुढे बसूकडून शफी त्या मुमताझमध्ये कसा गुंतलाय, हे कळल्यावर देवी परत एकदा त्या नायकिणीच्या कोठ्याकडे जातो आणि 'मला मुमताझ हवी आहे. किंमत सांगा', असा सडेतोड व्यवहार करून मुमताझला विकत घेतो; कारण हीच शफीला शिक्षा पुरेशी आहे असे तो समजतो. मुमताझला कोठा सुटला याचा आनंद होतोच आणि ती आपल्या या नव्या राजबिंड्या देखण्या मालकासमवेत बॅग घेऊन निघते. बाहेर आल्यानंतर देवी तिला आणखीन काही पैसे देऊ करतो आणि 'आता तुला कुठे जायचे असेल तिकडे जा', असे सांगतो. ते ऐकून मुमताझ विस्मयाने त्याच्याकडे पाहतच राहते. तिला वाटत असते आपण आजपासून देवीदयाल या व्यक्तीचे गुलाम. ती त्याला थेट सांगते, "मी कुठेही जाऊ शकत नाही. बाईंनी मला तुमची काळजी घेण्यास सांगितले आहे. तुम्ही माझे मालक, सर्वस्व आहात!" देवीला काही सुचत नाही, कारण हिंदू परंपरेत तो वाढला असल्याने या इतक्या देखण्या मुस्लिम मुलीला घेऊन रहायचे कसे, हा प्रश्न त्याला पडतो. काय करायचे हे ठरवत असतानाच दुसरीकडून मुमताझ विकली गेली हे समजलेला, आणि खरेदी करणारा दुसरा-तिसरा कुणी नसून खुद्द देवीदयाल आहे, हे पाहून संतापलेला शफी उस्मान पाठीमागून येतो आणि किंचाळतो, 'ही रुपमती तू घेऊन जातोस काय, घे आता.", असे म्हणून हातातील अॅसिडचा बल्ब मुमताझच्या चेहर्‍याच्या दिशेने भिरकवतो व पळून जातो. पण शिताफीने देवी मध्येच हात घालून अॅसिड मुमताझच्या चेहर्‍यावर पडणार नाही, हे पाहतो. मुमताझ वाचतेच, तरीही दुर्दैवाने देवीच्या हातावर तो बल्ब फुटतो व हात भाजून निघतो. मुमताझ 'देवीने आपल्याला वाचविले' या भावनेने आणि आपल्यामुळे त्याचा हात जळाला असे म्हणत, स्वतःला दोष देते. देवी 'तुझी चूक नव्हती'असे तिला समजावून सांगतो, पण आता एका हाताने विकलांग झाल्यामुळे निदान काही दिवस तरी मुमताझ आपल्यासमवेत राहणारच हे समजून चुकतो व तिला तो स्वीकारतो. पुढे एके रात्री तिला 'आपण लाहोरला जाऊन माझ्या आई-वडिलांशी आणि बहिणीशी तुझी गाठ घालून देतो' असे वचन देतो. ती 'आई-वडिलांकडे कशाला?' हा प्रश्न विचारते अन् तिला सहजगत्या तो उत्तर देतो, "आमच्या धर्मात लग्नाअगोदर आईवडिलांनी होणार्‍या सुनेला पहायचे असते, यासाठी." हे ऐकून सुन्न झालेली मुमताझ खोलीच्या एका कोपर्‍यात बसून हुंदके देते. देवी तिला मनसोक्त रडू देतो.

इकडे ग्यानचे  मुंबईत छानपैकी तणावविरहीत आयुष्य चालू असते. नोकरीत बढतीही मिळालेली असते. चांगली जागा बघायची आणि तशीच एक चांगली मुलगी पाहून लग्न करून गृहस्थाश्रमाचा आनंद घ्यायचा, या तयारीत तो असतो. रूमवर असताना एके दिवशी त्याच्या दारावर टकटक होते, आणि तो पाहतो तर चक्क साक्षात सुंदरी दारात उभी असते. नवरा युद्धावरून परत आला असल्याने तीही मुंबईला परतलेली असते व "वडिलांनी डॉककडील काही चौकशा करण्यासाठी सांगितलं, म्हणून मी इकडे आले व तिथे समजले की तू इथेच कुठेतरी राहतोस. मग म्हटले की, देवीचा मित्रच आहेस तर तू माझ्या इथल्या बंगल्यावर संध्याकाळी आलास की आपण जुन्या आठवणींवर गप्पा मारू शकतो.", असा त्यांचा संवाद घडतो. ग्यानचा आपल्या कानावर विश्वासच बसत नाही. तो खुळाच होतो आणि होकार तर देतोच, पण पुढे सुट्टीच्या दिवशी याने तिच्याकडे जाणे व तिने याच्याकडे येणे, हा दिनक्रमच बनून जातो. ग्यानला ती देवीबद्दल सारखे विचारीत असते आणि खोटे बोलण्यात तरबेज झालेला ग्यान देवीबरोबरीच्या मैत्रीच्या खोट्यानाट्या गोष्टी तर तिला सांगतोच, पण एका सायंकाळी समुद्रकिनारी दोघे बसले असता 'तू देवीला पोस्टाने पाठवलेला फोटो त्याने मला दिला', असे बेधडक सांगतो. देवीने तुला फोटो देण्याचं काय कारण, असं तिने विचारता तो न कचरता सुंदरीला सांगतो, "कारण, देवीला माहीत होते की माझे तुझ्यावर प्रेम आहे." सुंदरी शून्यात समुद्राच्या लाटांकडे पाहत बसते, कारण तोपर्यंत तिच्या मनातही ग्यानबद्दल प्रेमाचा अंकुर फुटलेला असतो. दुसरीकडे तिचे त्या मॉडेल गर्लवरून गोपालसमवेतचे वैवाहिक जीवन जवळजवळ संपण्याच्या मार्गावर असते. ती एका क्षणी ग्यानच्या प्रेमाचा स्वीकार करते. ग्यानलाही आता देवी भारतात जिवंत परत येणार नाही, याची खात्री असल्याने आणि सुंदरीच्या गोपालसमवेतच्या संसाराचे भविष्य काय आहे हे जाणून घेतल्याने आशा वाटत असते, की सुंदरीसोबत आपण विवाह करू आणि मुंबईतच दोघे सुखाने संसार करू. तो तसा प्रस्ताव एके दिवशी सुंदरीसमोर मांडतो आणि आपल्या प्रेमाची ग्वाही तिला देऊन 'मी तुझ्या होकाराची वाट पाहतो', असे सांगून तिच्या घरातून निघून जातो.

पण नियती त्याच्याकडे  पाहून क्रूर हसते. मुमताझला घेऊन देवीदयाल थेट सुंदरीच्या घरी येतो. देवीकडून अर्थातच  सर्व सत्य तिला कळते आणि ग्यानने  सर्व केरवाड कुटुंबाला कसे  फसवले, हे तिला उमजून येते. ती शांत राहते आणि देवी तिथून निघून गेल्यानंतर त्याच संध्याकाळी ग्यानला फोन करून समुद्रकिनारीच बोलावून घेते. ग्यानला आनंद होतो तो अशासाठी की त्याला वाटते, शेवटी सुंदरीने आपल्याला स्वीकारले. पण त्याच्यासमोर आता भलतेच वाढून ठेवलेले असते. सुंदरी त्याची शब्दांनी सालटे काढते आणि त्याचा खोटारडेपणा त्याच्या पदरात घालते. ग्यान हादरतो. देवी जिवंत आहे, हे ऐकून सुन्न होतो. पण तरीही स्वतःला सावरून तिला जे काही बोलायचे असते ते बोलू देतो व जाताना इतकेच सांगतो की, 'मी स्वतःला वाचवण्यासाठी जरूर खोटे बोललो असेन. पण मी तुझ्यावर प्रेम करतोय, ते खोटे आहे हे मात्र समजू नकोस.' इतके बोलून त्याच्याकडे तिरस्काराने पाहत असलेल्या सुंदरीकडे न पाहता ग्यान तिथून निघून जातो. गोपालबरोबरचेही संबंध सुंदरी तोडते आणि मुंबईहून लाहोरला परत येते, ते आईबाबांना हे सांगण्यासाठी की काही दिवसांतच देवीदयाल आपल्या पत्नीला घेऊन घरी परततोय.

ती असते ऑगस्ट  १९४७ ची सुरुवात. स्वातंत्र्य  आता दोन आठवड्यांवर राहिलेले. फाळणीनंतर लाहोर पाकिस्तानात  जाणार हे निश्चित झाल्यामुळे तेथील हिंदू जनता, व्यापारी वर्ग भीतीमुळे दिल्लीच्या रस्त्याला लागलेला. पण दिवाणबहादूर टेकचंद केरवाड लाहोरमधील आपल्या धंद्याचे प्रचंड साम्राज्य सोडून जाण्याच्या मनःस्थितीत बिलकुल नसतात. त्यांना आशा असते की, अजूनही काही तरी चमत्कार घडेल आणि सर्वकाही आलबेल होईल. पण गच्चीवरून एके रात्री विशाल पसरलेल्या लाहोरमधील हिंदू वस्त्या जळत असताना पाहताना आपल्या विश्वासातील फोलपणा त्यांना उमगतो व देवीदयाल आणि त्याच्या पत्नीची दिल्लीतच आपण वाट पाहू या, असा निर्णय घेऊन राधा व सुंदरीला प्रयाणास तयार राहणाच्या सूचना देतात; कारण दिल्लीकडे जाणारा नवा ताफा तीनचार दिवसांत कूच करेल असे लाहोरमधील पोलिस अधिकारी आणि काही शीख व्यापारी त्यांना कळवतात. त्याच रात्री ग्यान तलवार मुंबईहून  लाहोरला त्यांच्या बंगल्यात येतो कारण त्याने फाळणी आणि हिंसाचाराच्या बातम्या वाचलेल्या असतात आणि सुंदरी लाहोरमध्ये अडकली आहे, हे समजून प्रेमासाठी तिचे रक्षण करणे भाग आहे हा विचार त्याने मनी केलेला असतो. सुरुवातीला सुंदरी त्याला झिडकारतेच. पण टेकचंद आणि राधा या दोघांनाही सुंदरीचे हे वर्तन आवडत नाही, कारण केरवाडना सत्य माहीत नसते; पण वाटत असते की जर देवीचा हा मित्र थेट मुंबईहून आपल्या रक्षणासाठी आलेला आहे, तर त्याचे आपण उलट आभार मानायला हवे. सुंदरी त्यांना स्पष्टीकरण देत बसत नाही आणि ग्यानचे तिथले अस्तित्व नाईलाजाने का होईना पण स्वीकारते.

लाहोर पोलिसांनी  हिंदूंचे संरक्षण काढून  घेतले असल्याने पुढील रात्री शफी आणि त्याचे लीगमधील  दोन सहकारी केरवाड इस्टेटवर हल्ला करतात. सुंदरी तिथे आहे हे शफी उस्मानला माहीत  असते आणि देवीदयालने मुमताझला नेल्याचा बदला आपण आता  सुंदरीला लुटून घेऊ, हा विचारही त्या हल्ल्यामागे असतोच. ग्यान पोलिस चौकीवर दिल्लीला जाणार्‍या ताफ्याची चौकशी करायला गेलेला असतो, तर त्याला तिथे असा ताफा सकाळीच रवाना झाल्याची धक्कादायक बातमी समजते आणि केरवाड इस्टेट आता पोरकी पडणार हे उमजते व घाईघाईने तो सुंदरीकडे परततो. रात्री शफी आणि कंपनीसमवेत झालेल्या झटापटीत सुंदरीची आई त्या नराधामाच्या वासनेची शिकार बनते, तर सुंदरी आणि ग्यानच्या हातून शफी मारला जातो. एक गुंड पळून जाऊन अन्य गुंडांना घेऊन येणार याची खात्री असल्याने घाईघाईने, धक्क्याने भान हरपलेल्या टेकचंदना घेऊन ग्यान आणि सुंदरी त्यांच्याकडे असलेल्या गाडीत बसवतात व त्याच स्थितीत रात्रभर प्रवास करून अखेर दिल्लीला जाण्यार्‍या हिंदूंच्या ताफ्याला गाठतात. प्रवासात दमल्यामुळे सकाळी एके ठिकाणी फाळणीमुळे उद्ध्वस्त झालेली ती हिंदू प्रजा थोडा वेळ थांबते. सुंदरी कशीबशी या दोघांसाठी चहानाश्ता मिळतो का ते पाहत असते तर ग्यान गाडीची आणि तीत असलेल्या सामानाची अवस्था तपासत असतो. इकडे आपल्या प्रिय पत्नीच्या वियोगाने पार बधिर झालेले दिवाणबहादूर 'राधा...राधा...राधा...मी तुला घरीच कसे सोडून आलो', असे पुटपुटत या दोघांनाही न सांगता, चालत परत लाहोरच्या वाटेला लागतात. विश्रांतीची वेळ संपल्याचे सांगत आणि 'आगे बढो' असे लाऊडस्पीकरवरून हुकूम सोडत ब्रिटीश सैन्याची गाडी येते. सुंदरी वडील गायब झालेले पाहून सैरभैर होते. ग्यानला ती गाडी मागे घेण्याची विनंतीही करते. पण आता उशीर झालेला असतो. सैन्याधिकारी कर्कश्शपणे गाडी पुढे घेण्यासाठी ओरडतो आणि आता फक्त सुंदरीला घेऊन ग्यान दिल्लीच्या रस्त्याला लागतो.

फाळणीच्या अक्राळविक्राळ  बातम्या कळल्याने आई-वडील आणि सुंदरीसाठी इकडून भारतातून पाकिस्तानला जाणार्‍या  रेल्वेमध्ये देवीदयाल मुस्लिमाचा वेष करून मुमताझसह लाहोरच्या  दिशेने प्रवास सुरू करतो. निर्वासितांनी  ट्रेन गच्च भरलेली असतेच  आणि आपण मुसलमान आहोत असा बहाणा करणारे प्रत्येक ट्रेनमध्ये असतातच, हे पाकिस्तानमधील हिंसाचारी कार्यकर्त्यांना माहीतच असल्याने लाहोरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक पुरूष प्रवाशाला नग्न करून त्याची सुंता केलेली आहे की नाही, हे पाहिले जात होते. पहाटेच्यावेळी केव्हातरी देवीदयालचा नंबर येतो. तो आपण मुस्लिम असल्याचे सांगतो, पण त्याला घेरणार्‍यांचा त्याच्या सांगण्यावर विश्वास बसत नाही. ते त्याला रुळावर खेचतात. इकडे मुमताझ देवीच्या नावाने टाहो फोडते. त्याला नग्न केलं गेल्यावर हल्लेखोरांना कळून चुकतं की  देवीदयाल हा प्रवासी हिंदू आहे, आणि शस्त्रांचा क्रूर हल्ला त्याच्यावर होतो. तिच्याबरोबर मुमताझ म्हणून ते हुल्लडबाजी करणारे गुंड तिलाही नग्न करून भोसकतात. त्यातही मुमताझ जिवाच्या आकांताने देवीकडे झेपावते आणि म्हणते, "प्रिय देवी, मी तुझ्याबरोबरच आहे. कायमची!" 

रेल्वे ट्रॅकवर  रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, शेवटचा श्वास घेणारा देवीदयाल पूर्व दिशेला पाहतो तो सूर्य हळूहळू वर येत असतो. देवीदयाल त्या सूर्याची किरणे आपल्या डोळ्यांत साठवतो आणि मृत्युपूर्वी एकच क्षण त्याच्या लक्षात येते की, "आजची तारीख १५ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्याचा पहिला सूर्य!"

अनुक्रमणिका

अनुभव

कवितासंग्रहाचे परिचय

लेखकांचे परिचय

मुलाखत

पुस्तक परिचय

प्रतिक्रियां

सुरेख ....

परीक्षण आवडलें. पुस्तक वाचलेलें नसल्यामुळें विस्तीर्ण कॅनव्हासवरची एक कथाच वाचायला मिळाली.

धन्यवाद.

सुधीर कांदळकर

माळगांवकर क्लासिक

इंद्रा, एका सुरेख पुस्तकाची आपण ओळख उत्तमरित्या करून दिलेली आहे. अर्थात तुमची विश्लेषकी दृष्टी पाहता मला केवळ ओळखीपेक्षा पुस्तक परिक्षण/टिका अधिक आवडली असती. पुस्तक न वाचलेल्यांसाठी मात्र पुस्तक वाचण्यास उद्युक्त करणारा मजकूर आहे.

बर्‍याच वर्षांपुर्वी मी मराठी आणि इंग्रजी असे दोन्हीतून हे पुस्तक वाचले होते. आता सर्व तपशील (भाषेचे बारकावे वगैरे) आठवत नाहीत. पण तेव्हा मला थोडा भुगोल आणि नावे/नात्यांची नावे वगैरे बाबी खटकल्या होत्या. मला वाटते ग्यान तलवारचे गाव सातारा भागातले दाखवले आहे. तो आपल्या वडिलांच्या आईला आजी म्हणतो, आजुबाजुच्या लोकांची नावे पण तुकाराम, विष्णु वगैरे येतात. पण मग ग्यान तलवार हे सातारा भागातल्या माणसाचे नाव खटकते. तसेच सुंदरीचे ग्यानकडे आकर्षित होणे व सुंदरीच्या नवर्‍याचे पात्र थोडे तकलादू उभे राहणे ह्या गोष्टीदेखील मला तेव्हा खटकल्या होत्या असे स्मरते.

अर्थात ह्या पुस्तकाचा प्लॉट जबरदस्त आहे. माळगांवकर एका रंगातली माणसे उभी करणारे फालतू लेखक नाहीत. विशेषतः ग्यानच्या छटा/विचार/व्यक्तिमत्व अश्या काही पद्धतीने मांडले आहे की थक्क होते.

प्रतिसाद द्या

प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.