'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २७
मुखपृष्ठ
|
माझे एक बिंग नेहमी पोष्टात फुटायचे. मलाही वाटे, पंडितदादांच्याप्रमाणे माझ्याही कविता 'किर्लोस्कर'सारख्या प्रसिद्ध मासिकात याव्यात. मी चोरून 'किर्लोस्कर'कडे कविता पाठवी.
आमच्या घरामागून किर्लोस्करवाडी रात्री दिसायचीसुद्धा. किर्लोस्करवाडीचे विजेचे दिवे उत्तरेच्या कोपर्यात लकाकायचे. पुष्कळ वेळा ते पहिल्यांदा कसे लागतात ते बघण्यासाठी मी वाट बघत उभा राही. ते पाहायला मला फार आवडे. त्याच वाडीत आपली कविता आता पोचली आहे. तिचा संपादकमंडळात विचार होईल असे वाटायचे.
त्या चमचमत्या दिव्यांच्या दुनियेचे दृष्य रात्री स्वप्नात येई. त्या सुंदर स्वप्नातून उठून सकाळी पोष्टात यावे तेव्हा, किर्लोस्कर मासिकाचे 'साभार परत' हे छापील मानपत्र टोचून, माझी बिचारी कविता थेट परत आलेली असे. पोष्टात खूप माणसे जमलेली असत. पंडितदादा असतच. ते म्हणत,"बघू काय आहे ते." मी ते बुकपोष्ट अनिच्छेने दाखवी. मग ते म्हणत,"कविता मला दाखवून पाठव. सोबत मी पत्र लिहीन."
पण माझा कविता परस्पर पाठवण्याचा धडाका सुरू असे. आणि किर्लोस्करांचा साभार परतीचा. या साभार परतीचा, संपादक बापूराव नेहमी एक विनोद करीत-म्हणत : "काय किती 'सा-प' आले?" बापूरावांनी लिहिलेल्या 'श्रीगणेशा' या विनोदी गोष्टींच्या आगामी संग्रहाची जाहिरात 'बालशारदा' हस्तलिखितात यायची. त्या गोष्टी मला आवडायच्याही.
पण या प्रकाराला वैतागून मी पोष्टात जायचे सोडून दिले तरी हे 'साप' पंडितदादा किंवा दुसरे कोणीतरी पोष्टातून आणून माझ्याकडे सोडू लागले.
'कुंडल' च्या जवळ
असणारे गाव म्हणजे 'किर्लोस्करवाडी' (चू भू द्या घ्या) - ह्यावरुन आणि 'कविता' ह्या संदर्भावरुन 'ग. दि मांचे' एखादे असावे असे वाटते आहे, वाचले अर्थातच नाहीये.
गदिमा नाहीयेत!
गदिमा नाहीयेत! तुमच्या उत्तर देण्याच्या दोन संध्यांमधली एक चुकली.. दुसरी संधी आहे वापरायची असल्यास!
बहुदा
यातले पंडीतदादा म्हणजे कवी सुधांशु का?
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
कोरडी भिक्षा?
कोरडी भिक्षा - श्रीनिवास कुलकर्णी (यात पंडीतदादा नावाचे व्यक्तीचित्र वाचले होते हा वेचा त्यातील असावा असा अंदाज)
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
किर्लोस्करवाडी !
अवांतर प्रतिसादः
पूर्वीच्या काळी किर्लोस्करवाडी या गावाला व नावाला एक वलय होते. तिथे राहणारे(जरा जास्तच)सुधारक विचाराचे म्हणून प्रसिद्ध होते. ही झाली ऑफिशियल प्रसिद्धी.
पण कुचाळक्या करणारे लोक आणखी तिथले स्त्री-पुरुष कसे "पर्मिसिव्ह" असतात वगैरे, नावे घेऊन (मी नाही घेणार ती!), रसाळपणे बोलायचे.
मी त्यावेळी फार लहान असल्याने अधिक तपशील कळू शकले नाहीत ही हळहळ वाटते 
अर्थात एकदा असेही वाटून जाते की हे जास्तकरून कल्पनेचे खेळ असावेत. आत्ताच्या जमान्यात जे आजूबाजूला दिसते त्या मानाने त्या काळात तिथे असे काय मोठे चालत असणार?
- दिगम्भा
श्रावण आणि ऋषिकेश!
श्रावणचा पुस्तक न वाचून केवळ वेच्यातील दुवे आणि ऐकीव माहितीवरून केलेला अंदाज बरोबर आहे. दिगम्भा आणि वल्ली यांच्याशी बोलताना माझ्याकडून आपसूक सांगितले गेले होते की मी कोरडी भिक्षा वाचतेय त्यामुळे त्यांनी ते सहजी ओळखले होते पण स्पर्धेत विजयी म्हणून म्हणवून घेण्यात काही अर्थ नाही असे म्हणाले.. मी सद्ध्या काय वाचतेय हे सांगितल्याने त्यांचा कोडे सोडवण्यातला आनंद हिरावून घेतला गेल्यासारखे झाल्याबद्दल मलाच चुटपुट लागलीये आता. ऋषिकेशने पुस्तक वाचलेही आहे आणि वेच्यातले योग्य दुवे पकडून बरोबर पुस्तक शोधून देखील काढले आहे, त्यामुळे मला माझी वेचानिवड अगदीच काही 'ही' नसल्याचा आनंद झाला आहे. सर्वांचे अभिनंदन!
हे पुस्तक म्हणजे श्रीविकुंचे (श्रीनिवास विनायक कुलकर्णींचे) अनुभवकथन तर आहेच पण या कथनात संबंधित माहितीचे अगदी सांगोपांग आणि ओघवते विश्लेषण देखील आहे. एकीकडे ते 'पंडीतदादां'वर व्यक्तीचित्रणात्मक लिहितात तर कधी 'चिवचिवथुर्या'सारखे भावगर्भ लेखन करतात. कधी 'उसण' चढण्यापासून उतरवण्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा समाचार घेतात तर कधी 'ये ये घारी' आणि 'कावळ्यांच्या गोष्टी'मध्ये त्या-त्या पक्षीविशेषाबद्दलचे आपले सुयोग्य निरिक्षणांसकटचे अनुभवकथन करून आपल्याला काहीसे अंतर्मुख करताना दिसतात. प्रत्येक प्रकरणात अतींद्रिय शक्तीचा त्यांना आलेला प्रत्ययच आपल्याला सांगतायत का काय असा भास होत जातो आणि शेवटच्या 'भ्रांत'मध्ये तो शिगेला जाऊन पोहोचतो असे वाटते. माझा शब्दसंग्रह खासच वाढवला या पुस्तकाने. पुस्तकाची एकंदर बांधणी, वापरलेला फाँट, पानांचा केलेला वापर बघता त्याहीदृष्टीने मला या पुस्तकाने खूप समाधान दिले आहे. प्रत्येकाने एकदातरी वाचावेच असे आहे हे पुस्तक!
सुंदर ओळख.
चांगली ओळख करुन दिलीस वेदश्री या पुस्तकाची.
वाचले नव्हतेच. हे पुस्तक माझ्या वाचनाच्या हिट लिस्ट वर आले आहे आता 
नक्की वाचेन
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
+१
+१
परवा वेदश्री मला म्हणत होती की पुस्तक परिचय लिहिणे जमणार नाही असं. ते चुकीचे आहे असे मी तिला सांगत होतो. आता मी असे काही बोलण्याची गरज नाही, हे तिनेच सिद्ध केले आहे.
सुधांशु!!!
मी पुस्तक वाचले नव्हते. त्यामुळे इथे अंदाज बांधून तारे तोडले नाहीत. पण सुधांशुंबद्दल म्हणून पाहिलं आणि लिहिल्यावाचून राहावलं नाही. तसं म्हणायला माझं मूळ गांव आमणापूर. वाडीच्या- हो, आमच्याकडे किर्लोस्करवाडी असं म्हणत नाहीत-अगदी जवळचं. कधी गांवी गेलो, की कृष्णेवर जाणं आलंच. आणि मग नावाड्याकडे हट्ट करून पैलतीरावर जायचो. पैलतीर म्हणजे औदुंबर. तिथल्या घाटावर खेळता खेळता एक बंगली दिसायची. २०-२५ वर्षांपूर्वीचं औदुंबर म्हणजे सगळी साधी घरं. तिथं ही बंगली उठून दिसायची. आणि त्यावरची लाल रंगातली अक्षरं, "सुधांशु". त्यातल्या शेवटचा उकार आधीच्या सगळ्या अक्षरांना पोटात घेऊ शकेल इतका मोठा!!! मग प्रत्येकवेळी औदुंबरला गेले की नजर 'सुधांशु'ला आपसूकच शोधायची. एवढं होऊनही मला हा माणूस कोण हे माहित नव्हतं हा माझा करंटेपणाच वाटतो. ते गेले, तेव्हा सगळीकडे त्यांच्याबद्दल ऐकलं, वाचलं.... आणि तेव्हा त्यांचा मोठेपणा कळाला.
आताशा औदुंबरातही सिमेंटचं जंगल वाढलंय. घाटावरून सुधांशु बंगलीही दिसत नाही.... आणि आता ती फिकुटलेली लाल अक्षरे पाहण्याची इच्छाही नाही.
जाता जाता... वाडीच्या लोकांबद्दलच्या ऑफिशिअल आणि अनऑफिशिअल, दोन्ही मतांबद्दल दिगम्भ्भांशी सहमत.






डोक्याला
डोक्याला चांगलाच खुराक आहे हा वेचा म्हणजे. पण एक आहे, वेचा असा आहे की, पुस्तकाकडे नेतोय. मला हे पुस्तक वाचायचं आहे!
पुस्तक ओळखले नाही. पण मी काही अंदाज केला आहे. शेवटाला ताडून पाहू.