• '

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २६

श्रावण मोडक
बुधवार, 1 September, 2010 - 18:25
 

मुखपृष्ठ

 
 
 

वाचनालयातून एक पुस्तक आम्हाला वाचायला आणून दिलंय. पुस्तकाचे नावच आव्हानात्मक आहे. "आधुनिक मुलींविषयी तुमचे मत काय आहे. What do you think of Modern young girl?" आज हा विषय मी चर्चेला घेणार आहे.
लेखकाने आधुनिक तरुणीवर पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत टीका केली आहे. अर्थात, त्यांना सर्वांना अगदी कुचकामी ठरवलं नाहीये. उलट लेखिकेने म्हटले आहे की या तरुणींमधे नवे, मोठे, सुंदर विश्व उभारायची ताकद आहे. परंतु त्या आपली ही सगळी ताकद वरवरच्या, उथळ गोष्टीत खर्चत आहेत. खरे सौंदर्य, शुचित्व कशात आहे याकडे त्या लक्ष देत नाहीयेत एवढेच नव्हे, तर त्यासंबंधी विचारही करत नाहीत.
काही काही ठिकाणी तर लेखिका माझ्यावरच टीका करते आहे, नाराजी दर्शवते आहे असे मला वाटले. म्हणून तुझ्यापाशी मन मोकळे करावे आणि तिने जी टीका केली आहे त्याला माझ्या बाजूने बचावाचे उत्तर द्यावे असे मला वाटले.
माझ्या स्वभावात एक विशेष गुण आहे आणि तो म्हणजे मी स्वतःला पुरी ओळखते. स्वतःच्या प्रत्येक कृत्याकडे अलिप्त नजरेने पाहाते, आणि वागण्यात काही चूक आढळली तर ती कोणतीही खोटी कारणे न काढता, प्रांजलपणे कबूल करते स्वतःशी. माझ्या बर्‍यावाईट वागण्याकडे माझे पूर्ण लक्ष असते, आणि त्याची मी निःपक्षपातीपणे छाननी करू शकते. पुष्कळ वेळा मी काहीतरी बोलते, आणि मग मला वाटते 'हे मी वेगळ्या तर्‍हेने बोलायला हवे होते.' मी स्वतःवरच इतकी टीका करत असते की अखेर मला डॅडींचे म्हणणे पटायला लागले आहे. ते म्हणतात की प्रत्येकाने स्वतःची वाढ, स्वभाव चांगला व्हावा यासाठी स्वतःच प्रयत्न केले पाहिजेत. पालक आपल्या अपत्याला फार तर उपदेश करतील किंवा योग्य मार्ग दाखवू शकतील. पण अखेर त्याप्रमाणे वागणे व स्वतःत सुधारणा करून घेणे ज्याच्या त्याच्या हातातच असते. याखेरीज मी आयुष्याला फार धैर्याने तोंड देते आहे. कसलीही जबाबदारी मी यशस्वीरीत्या पेलू शकेन, कारण मी तरूण आहे, सशक्त आहे असा मला विश्वास वाटतो.

संकेत १: या वेच्याच्या सुरवातीचे काही शब्द मी गाळले आहेत. त्यापैकी पहिले चार शब्द दिवस, तारीख, महिना आणि साल असे आहेत.
एकाच संकेतावर काम भागले. पुढचा वेचा कोण देणार आहे?

माझा पास

श्रामो

आधी वाटले तूच सांगतो आहेस की वाचनालयातून पुस्तक आणले Smile

पास्स्स... वाचले नाहिये पुस्तक Grade

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

बापरे...

मित्रा तुला हे पुस्तक ओळखता आले नाही? म्हणजे कोडं गंडणार बहुदा.

अवघड आहे

लेखनशैली कुणाची आहे काहिही कळत नाहीये. बहुधा आणखी संकेत लागतील असे वाटतेय.

थांबा

मी दिलेला संकेत पुरेसा बोलका ठरू शकतो. फक्त त्यासाठी त्या संकेतावर जरा बारकाईनं विचार करावा लागेल. Smile
शैली तपासूच नका. त्या लेखकाचं हे बहुदा एकमेव पुस्तक आहे. Smile

माझा पण पास..

माझा पण पास.. Sad

ओळखणे अवघडच

श्रामोंनी दिलेल्या संकेतानुसार बहुधा आत्मचरित्र असावे किंवा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली दैनंदिनी.

अंदाज

अंदाजांची दिशा योग्य आहे. Smile

वेचा ओळखता येत नाहीए..

वेचा ओळखता येत नाहीए..

निखिल देशपांडे

अदिती

अदितीने पुस्तक कोणते हे सांगितले. तिचे उत्तर बरोबर आहे.

सवर्णा साधु?

अरूण साधुंच्या मुलीचं आहे का.. बहुदा सुवर्णा साधु..
कारण अरूण साधुंना डॅडी म्हणत असत.. तिने तिच्या "डँडिंवर" मटात एक लेखही लिहिल्याचे आठवते.

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

नाही

नाही!

शनिवार, १५ जुलै १९४४

शनिवार, १५ जुलै १९४४

तुझ्याचकडून उधार घेऊन वाचले होते आणि आता तूच त्याबद्दल कोडे विचारतोयस?! क्या बात है! Smile

आणखी दोघे

वाचक आणि वेदश्री या दोघांनीही पुस्तकाचे नाव बरोबर सांगितले. या दोघांसह अदितीलाही विनंती - कसे ओळखले, काय दुवा निघाला वेच्यात हे इथे लिहा.

दुवे

>पुष्कळ वेळा मी काहीतरी बोलते, आणि मग मला वाटते 'हे मी वेगळ्या तर्‍हेने बोलायला हवे होते.'
>याखेरीज मी आयुष्याला फार धैर्याने तोंड देते आहे.
>कसलीही जबाबदारी मी यशस्वीरीत्या पेलू शकेन, कारण मी तरूण आहे, सशक्त आहे असा मला विश्वास वाटतो.

वेच्यातील या तीन वाक्यांनी आणि दिलेल्या संकेतावरून कळले की हे कोणते पुस्तक असेल ते. इतके भयंकर प्रसंग इतका मोठा काळ समोर उभे ठाकूनही तिने जाणलेले आयुष्याकडे बघण्याचे सकारात्मक तंत्र पुस्तकभर जाणवत राहते.. तेच या वेच्यातून लक्षात आले!

पुस्तक

एवढ्या मोठ्या पुस्तकातला एखादा उतारा वाचून पुस्तक कसं ओळखणार? असा प्रश्न मला बरेचदा पडतो. पण या पुस्तकाच्या वेळी, कसलाही विचार न करता किंवा जाणीवपूर्वक बुद्धी वापरून तर्क न लढवता, दिलेला परिच्छेद पूर्ण वाचल्यावर मला पुस्तकाचं नाव आपोआप आठवलं. मी हे पुस्तक शाळकरी वयात वाचलं होतं त्यानंतर कधीच ते पुन्हा हातातही धरता आलं नाही. पण तेव्हा या पुस्तकाची जबरदस्त मोहिनी माझ्यावर होती त्यामुळे असं सहज उत्तर सापडलं असावं.

--अदिती

--अदिती
गुणाः सर्वत्र पूज्यन्ते दूरेऽपि वसतां सताम् ।
केतकीगंधमाघ्रातुं स्वयमायान्ति षट्पदाः ॥

माझेही उत्तर

मला साधारण तुमच्या कालच्या संकेतावरून नंतर कोणतं पुस्तक असावे हा अंदाज आला होता, पण तुम्ही नंतर प्रतिसादात त्या लेखिकेचे हे एकमेव पुस्तक असावे असे म्हटलात त्यावरून ते नसेल असे वाटले. आता परत तुम्हाला खरडवहीत हेच लिहायला गेले होते पण तिथे वाचकची खरड वाचली, माझा अंदाज बरोबर होता. म्हणून सरळ इथेच उत्तर द्यायला आले.
पटकन उत्तर सुचू न शकण्याची कारणं काहीही असोत पण तरीही ती इथे नमूद करतेय.
१. पुस्तक इंग्रजीतून वाचलेय. त्यामुळे पटकन संदर्भ नाही जोडता आला. ( ते माझे पुस्तक एकाला वाचायला दिले होते, आता त्याने मला पुस्तक दिलेच नव्हते म्हणून कानावर हात ठेवलेत Sad)
२. सध्या मी आणखी एक पुस्तक वाचतेय, "टेल्स फ्रॉम सीक्रेट अ‍ॅनेक्स": यात तिच्या डायरीतली काही पाने+तिने लिहिलेल्या परीकथा, काही अशाच काल्पनिक कथा आहेत. तिने एक कादंबरीदेखील लिहायला घेतली होती, त्या अपूर्ण कादंबरीचीही पाने या पुस्तकात आहेत.
अनुवादः शिवप्रिया सुळे. साकेत प्रकाशन.

दुसर्‍या कारणामुळॅ खरेतर उत्तर दिले नाही अथवा अंदाज मांडले नाहीत.

दिगम्भा

दिगम्भांनीही पुस्तकाचे नाव बरोबर सांगितले. त्यांचा अंदाज वेदश्रीच्या क्ल्यूवर आधारित होता.

मला वाटलेच

की हेच पुस्तक असावे पण योग्य वेळी आठवले नाही. Smile
अनुवादक मंगला निरगुडकरच ना?

मूळ पुस्तक इंग्रजी मधून

आणि ते सुद्धा काही वर्षांपूर्वी वाचले असल्याने मला मराठीतला वेचा आठवला नसता, पण त्यातले हे प्रसिद्ध वाक्य (What do you think of Modern young girl) आणि वेदश्रीने दिलेली तारीख बघितल्यावर दुसरे काही डोक्यात आलेच नाही.
(लबाड श्रामोंनी तारीख तेवढी नेमकी गाळली होती Smile )

हाहाहाहा

(लबाड श्रामोंनी तारीख तेवढी नेमकी गाळली होती Smile )

यालाच म्हणतात कोडं! Smile

लबाड

खरंच लबाड आहेस हं श्रामो तू Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

पुविवरच्या यादीत हे पुस्तक का

पुविवरच्या यादीत हे पुस्तक का नाही? भर टाका त्यात.
पुवि वरची यादी सर्वसमावेशक नाहीच, वेळोवेळी यादी अद्यायावत करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतोच. यात आपल्या सर्वांचा सहभाग अपेक्षित आहेच.त्याचसाठी सर्व सदस्यांना पुस्तक, लेखक,संपादक जोडण्याची किंवा असलेल्या पुस्तकात अधिक माहिती देण्याची स्प्य देण्यात आलेली आहे. आता हेच पुस्तक जोडायचे असल्यास आवश्यक सर्व माहिती सर्वांकडे उपल्ब्ध असेलच असे नाहीच. त्यामुळे इथल्या सर्व वाचकांना मी विनंती करतो की आपण इथे पुस्तक जोडण्यास/अद्यायावत करण्यास मदत करावी. इथे पुस्तक कसे जोडायचे हे "पुस्तकविश्व - लेखन करतांना पुस्तक कसे जोडावे ?" काही अडचण असल्यास मदती साठी संपर्क साधु शकताच. या शिवाय कुणाकडे पुविवर नसलेल्या पुस्तकांची यादी एक्स्सेल मधे असल्यास सुद्धा मदत होउ शकते.

निखिल देशपांडे

पुस्तक इथे अ‍ॅड केले आहे

मी हे पुस्तक जोडले आहे इथे

श्रामो कृपया हे पुस्तक वेच्याला जोडून टाक Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/