'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २४
मुखपृष्ठ
|
वेचा :
अहवाल लिहिणं सुरू केलं.
हे काम मला आवडू लागलं होतं आता.
विचार करायचा. आखणी करायची. मग त्यानुसार अंमलबजावणी.
नाहीतर काय उरलं होतं आता आपलं?
किरकोळ लिहिणं सुरू होतं. पण ते अगदी निरुपद्रवी. अलक्षणीय.
सारं काही केवळ भावनिक.
शब्द हीच आपली पहिली आणि शेवटची कृती. तीही करताना चोरून-लपवून करायची...
काहीतरी गैरकृत्य, गुन्हा केल्यागत भावना मनात बाळगून.
धाक.
सततचा धाक.
का?
कायम भीतीची वस्ती मनात. घरीदारी कुठंही असो.
साहेबांना विचारलं पाहिजे. साहेब काय म्हणतील? साहेबांना काय वाटेल? हे आवडेल का साहेबांना? आधी साहेबांना पटलं पाहिजे. साहेब रागावले तर? साहेबांना कळलं तर? साहेबांना... साहेबांसाठी... साहेबांचे... साहेबांमुळे... साहेब... साहेब... सतत सतत साहेब... फक्त साहेब...
डोकं भोवंडायला लागलं. वाटू लागलं, की डोक्यावर कुणीतरी प्लास्टिकची पारदर्शक पिशवी घालून एका वेगवान घोड्यावर बसवून दिलंय. दिसतंय सगळं, पण बोलता येत नाहीये. आवाज निघालाच, तर तो बाहेर पोचत नाहीये. सैल होत चाललाय लगाम नकळत. मांड निसटतेय जाणीवेच्या पाठीवरून. रिकिबीत ठरत नाहीयेत पाय. पकड सुटतेय स्वत:वरची आजकाल पुन्हापुन्हा. हे कळतंय. आणि तरीही करता येत नाहीये काहीच. भीती वाटतेय. भीती. भीती फक्त.
वडगावला डोंगरावरच्या त्या एकट्या संध्याकाळी भयमुक्त वाटलं होतं. त्यानंतर किती दिवस वाटत राहिलं होतं, की बदलून जाईल आपलं जगणं आता. आपली मन:स्थितीदेखील बदलून जाईल. आपलं उरलं आयुष्य आपण आपल्या इच्छेसारखं जगू. निर्भय.
पण किती तकलादू असतं हे सारं वाटणं. भीती आपल्या मनात रुजलेली आहे आणि तिला असं सहजासहजी उपटून टाकता येणार नाही. पुन्हा ते दूरवरूनही नजर ठेवूनच आहेत आपल्यावर आणि आपल्या आतूनही.
आपण घाबरतो म्हणून ते घाबरवू शकताहेत.
जर आपण घाबरणं बंद केलं तर?
करायलाच हवं आता.
अविश्वासाच्या ठरावांबाबतच्या चर्चेत निश्चित झालेल्या उपाययोजना लिहून काढत होते:
महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असल्या पाहिजेत. त्यामुळे अविश्वासाच्या ठरावासारख्या प्रसंगी महिलांना संख्यात्मक पाठिंबा मिळेल.
कायदे, शासकीय योजना यांबरोबरच राजकीय ध्येयधोरणांचे व डावपेचांचे प्रशिक्षण महिलांना देण्यात यावे........................................................
[टीप१ : श्रावण मोडक यांना सहज ओळखता येईल असे वाटते, पण त्यांनी उत्तर उघड करू नये ही विनंती.
टीप२ : वेचा निवडताना गेल्या वेळच्याच अटी स्वतःवर घालून घेतल्या आहेत.]
उत्तर व्यनी करत आहे सोप्पंय
उत्तर व्यनी करत आहे 
सोप्पंय
निखिल देशपांडे
वेचा निवडताना गेल्या वेळच्याच
वेचा निवडताना गेल्या वेळच्याच अटी स्वतःवर घालून घेतल्या आहेत.
अगदी अगदी!!!!
वेचा सही निवडलात. उत्तर व्यनि करतेच आहे.
हेहेहेहे
आम्हाला कळ्ळं. तू आणि निखिलने हे पुस्तक कसं ओळखलं ते... 
या उपकोड्याचे उत्तर?
तुम्हाला मूळ कोडे सुटलेच आहे.
आता हेही गुपित फ़ोडून टाका म्हणजे झालं.
-दिगम्भा
दोघांनी
दोघांनी हे पुस्तक वाचलं आहे आणि अलीकडेच एकदा या विषयावर आमचं बोलणं झालं होतं. म्हणजे आठवण तुलनेनं ताजी, इतकंच.
निखिल; म.क. बरोबर
निखिल देशपांडे व मस्त कलंदर यांनी अचूक ओळखले आहे.
-दिगम्भा
आणि श्रामो
अपेक्षेप्रमाणे श्रामोंनीही उत्तर दिले आहे.
-दिगम्भा
पास
वेचा एकदम झकास. माझ्याच मनात कधी येणारं काहीबाही कोणी शब्दांकीत केल्यासारखं वाटलं अगदी. वाचलेला नाही हे नक्की, त्यामुळे पास!
संकेत १
वेदश्रीच्या सूचनेनुसार पुस्तक न वाचलेल्यांसाठी संकेत देत आहे -
संकेत १ : पुस्तकलेखक स्त्री आहे व (बहुधा) या पुस्तकामुळे ती महाराष्ट्रभर बहुतेकांना माहीत झाली.
उत्तर शुक्रवारी द्यायचे ठरले आहे.
- दिगम्भा
हेच असावे
दिगम्भा,
पुस्तक वाचलेले तर नाहीये, पण एकंदरीत संकेतानुसार कविता महाजनांचे 'ब्र' असावे असे वाटतेय.
वल्ली यांचे उत्तर बरोबर ---> "ब्र" - कविता महाजन
वल्ली यांचे उत्तर बरोबर आहे.
पुस्तक "ब्र" - लेखिका कविता महाजन
वेच्याविषयी थोडा खुलासा केला पाहिजे.
प्रथम - साहेब म्हणून ज्याचा उल्लेख आला आहे ती व्यक्ती म्हणजे निवेदिका प्रफुल्ला हिचा भूतपूर्व नवरा.
घटस्फोट झाल्यावरही त्या नवर्याची तिच्या मनात किती दहशत आहे हे आपण पाहू शकतो.
दुसरे - वेच्यात तिने हाती घेतलेल्या इतर कामाचा उल्लेख फारच ओझरता आला आहे, पण प्रत्यक्ष पुस्तकात तो भाग ८०-९० टक्के जागा व्यापतो.
निवेदिकेने एका अशासकीय संस्थेद्वारे (एन जी ओ) काम करायला सुरुवात केली आहे व त्यासाठी ती सरपंचादि शासकीय पदावर पोचणार्या आणि पोचू इच्छिणार्या स्त्रियाच्या अनुभवांचे सर्वेक्षण करते आहे. या सर्व अनुभवाविषयी हे पुस्र्तक आहे.
यात दोन पातळ्यांवरचा संघर्ष आहे. एक पुरुषी सत्तेच्या राजकारणात स्त्रियांनी आपले स्थान मिळवण्याचा व राखण्याचा भाग आहे. दुसरे निवेदिकेने आपल्या कुटुंबातील दहशतीखाली ठेवू पहाणार्या नवरा व मुलगा यांच्या पार्श्वभूमीवर निर्भय होण्याचा केलेला प्रयत्न आहे.
जिथे "ब्र" ही काढू दिला जात नाही तिथे पहिला ब्र हा उद्गार काढणे हेच महत्वाचे असते. असा दोन्ही पातळ्यांवरील प्रयत्न हाच या पुस्तकाचा विषय आहे.
याला कादंबरी म्हणता येईल की नाही हे सांगणे कठीण, पण निदान शहरी मध्यमवर्गीय वाचकाला तरी यात एक वेगळे जग पहायला मिळते हे खरे.
"शब्द हीच आपली पहिली आणि शेवटची कृती."
- दिगम्भा
या पुस्तकाचा नंदनच्या
या पुस्तकाचा नंदनच्या लेखणीतुन परिचय इथे वाचता येईल.
निखिल देशपांडे






प्रकाशवाटा
दिगम्भा,
सुंदर पुस्तक दिसते आहे. मी हे पुस्तक नक्की वाचलेलं नाहिये.
पण "महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असल्या पाहिजेत." या वाक्यावरुन आणि स्त्री विषयक वेच्यावरुन अलिकडेच स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणार्या वंदना करंबळेकर यांचे गाजत असलेले "प्रकाशवाटा" हे पुस्तक आपसूकच आठवले.
लोकसत्ता मधे या पुस्तकाबद्दल थोडेसे वाचले होते त्या आधारे हा वेचा "प्रकाशवाटा" मधील आहे असे वाटते.
मी हे पुस्तक नक्की वाचलेले नाहिये.
उत्सुकता लागली आहे हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते जाणून घेण्याची.
अशी पुस्तके आवडतात मला वाचायला...
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/