'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २१
मुखपृष्ठ
|
[मी मस्त कलंदर यांनी वेचा देताना जी पातळी गाठली होती तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे.
मनात धरलेले निकष असे :
आपण पुस्तक वाचतो व नंतर विसरूनही जातो, निदान बारीकसारीक तपशील तरी. तरीसुद्धा -
१. वेचा वाचल्यावर ज्याने ते पुस्तक वाचले आहे त्याला क्षणार्धात आठवण/बोध झाला पाहिजे
२. वेचा असा हवा की त्यात त्या कलाकृतीचे मर्म पकडले गेले पाहिजे
३. वेचा असा हवा की त्याच्या एकमेवाद्वितीय उतराकडे अप्रत्यक्ष का होईना त्याने निर्देश केला पाहिजे
४. ज्याने पुस्तक वाचलेले नाही त्यालासुद्धा त्यावरून विचारांती अंदाज बांधणे शक्य झाले पाहिजे
५. आणि इतके असूनही उत्तर सोपे व कोणीही ओळखावे असे असता कामा नये.]
वेचा:
हे दोन अडीच महिने डोंगराचं दर्शन होणे कठीण. महादेवाचं ध्यान सुरू आहे. तो डोळे मिटून चिंतना करतोय. सगळीकडे पाऊस पडला की नाही. सगळी रानं जोगवली की नाही. अवघी धरित्री भिजली की नाही. कुठं उणं राहिलं असेल, तर त्या अंगाला तो मेंघांना पाठवतो. त्याच्यापाशी लई मेघ. त्याच्या दाराशी हुकमाची वाट पाहात ते उभे असतात. त्याच्या ध्यानात पटदिशी येतं, का अमुक एका डोंगराच्या घळीत पाऊस झाला नाही. तिथले ओढेनाले वाहिले नाहीत. खाचरं पाण्यानं तुडुंब भरली नाहीत. त्या रानचे बेडूक बोलू लागले नाहीत. तिथं काजवे लुक्लुकू लागले नाहीत. तिथल्या कड्यांना गवतं वाढली नाहीत. कड्यांच्या पोटांशी भारंगीचे ठोंब उगवले नाहीत. चवेणीच्या कंदांना हिरवी पानं धरली नाहीत. त्या रानाला अजून भुईकमळं दिसू लागली नाहीत.
मग महादेव ढगांचा ताफाच्या ताफाच तिकडे धाडतो. ढग तिकडे सरू लागतात. कधी घाईघाईनं. एकापाठोपाठ एक. कधी एकमेकांच्या अंगावर कोसळत. कधी सावकाश. चुकार कामकर्यासारखे. पण शेवटी ते तिथं पोचतात. बरसायला लागतात. न बरसून करतील काय? टंगळमंगळ केली तर महादेवाचा बिजलीचा चाबूक काडदिशी पाठीत बसतो. केवढा आवाज होतो. डोंगर गदगदा हलू लागतात. अशा रीतीनं चहू अंगांना पाऊस पडतो.
मग महादेवाच्या ध्यानी येतं, की आता चहूकडे हिरवं झालं आहे. गाईगुजी जोगवू लागल्या आहेत. शेरडं चरू लागली आहेत. खाचरं जळानं तुडुंबलेली आहेत. भाताचे लोंबे जळाच्या साईवर डोकी उचलीत आश्चर्यानं चहूदिशांना बघू लागले आहेत. असं अवघं शांत झालं आहे.
मग हळूहळू महादेव ध्यानातून बाहेर येतो. ध्यानाला बसला तेव्हा तो जख्ख म्हातारा होता. ध्यानातून बाहेर येतो तेव्हा तो जवान होऊन येतो. डुईवरचे केस पुन्हा हिरवेगार झालेले असतात. पापण्या पुन्हा ताज्यातवान्या झालेल्या असतात. तो आपल्या डुईत भुईकमळं खोचतो. रंगारंगाची. बहुधा सगळी गुलाबीतांबडी. पण महादेवाला पांढरा रंग आवडतो. म्हणून तो काही पांढरी भुईकमळं अंगावर वागवतो. असा तो कोवळा दरदरीत दिसू लागतो. त्याच्या अंगावरून गंगाबाई खाली उतरत असते. कुठं टंगळमंगळ करीत. कुठं धावत धडपडत. मग तो डुईवर एखाद दुसर्या ढगाची चिंधुकली वागवतो, तेवढंच. यापलीकडे मग बाकी ढगांना तो दूरच्या गंगनी धाडून देतो.
पावसकाळाभर महादेवाच्या गळ्यातला मधमाशांच्या पोळ्यांचा हार गडचीप असतो. पावसकाळा उलटला, की मग त्यांचं गाणं सुरू होतं. ते गुंग गाणं काही फार मोठ्यानं ऐकू येत नाही. पण तरी हजारपाचशे माशी एक्या ठायी झाली, की मग चांगला घुमारा ऐकू येतो. कधी त्या गंगनात तिथल्या तिथं गाणं म्हणत घुमतात. कधी नाच करतात.
शैली अगदी गो नि दांची आहे
नक्की पुस्तक लक्षात येत नाहीये (स्मरणशक्तीचा किंवा वाचानाच्या अभावाचा दोष
)
जैत रे जैत
दिगम्भा,
वेचा सुरेख आहे यात काही संशय नाही. पण तितकाच भ्रामक देखील आहे.
पण मधमाशांच्या पोळ्यांचा हार वरुन गोनीदांचे जैत रे जैत वाटते आहे 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
मस्त वेचा!
मस्त वेचा! मी तर वेच्यावरच खुश!
दिगम्भांचे स्वागत..
बाकी वेचा वाचल्यासारखा वाटतोय पण नेमका आठवत नाहि आहे.. एखादा क्लु मिळाल्यावर पुन्हा विचार करतो तो पर्यंत पास!
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
जैत रे जैत???
पुस्तक वाचलेले नाही, पण एकंदर वर्णनावरून तेच आठवले. तरीही ही गोनीदांची लेखन स्टाईल नाही. वाचून १०-१५ वर्षे झाली तरी त्यांनी लिहिलेली "पडघवली" मधली वर्णने अजून आठवतायत. त्यामुळे हे गोनीदा नक्कीच नव्हेत.
दिगम्भा, कौतुकाबदल धन्यवाद हो.. मी वाचताना चुकून लाजले. 
चिकित्सक वाचकाचे लक्षण
हम्म... १०-१५ वर्षांनीही लेखकाची स्टाईल लक्षात रहाणं हे एका चिकित्सक वाचकाचे लक्षण आहे मस्तकलंदर... आणि तुम्ही तशा आहात ...
तरी दिगम्भाच काय ते सांगू शकतील.... माझे उत्तर चूक सांगितल्यावर मी डोक्याला अजून ताण देईन.
तोपर्यंत बाकी तुम्ही लाजण्याचे काम करा 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
संदर्भावरून 'जैत रे जैत'च वाटतं आहे..
...पण त्यातली डोंगराच्या वर्णनाची भाषा 'ठाकरी' होती असं vaguely आठवतंय, त्याच्याशी या उतार्याचा मेळ बसत नाही, त्यामुळे चांगलाच बुद्धीभेद करणारा वेचा असं आता म्हणेन;-)
- बहुगुणी
अंदाज
अंदाज करत नाही. कारण पुस्तक वाचलेले नाही हे नक्की!
जैत रे जैतच
गोनीदांचे जैत रे जैत.
वरील वेच्यात कर्नाळा किल्ल्याच्या सुळक्याचे --लिंगोबाच्या डोंगराचे नाग्या ठाकराच्या भावविश्वातील वर्णन आहे.
दिगम्भा तुमचे अभिनंदन. एक अतिशय सुरेख वेचा दिल्याबद्दल.
पुस्तक तर अवश्य वाचावेच. ते तर पानोपानी अश्या वेच्यांनी भरलेले आहे.
सागर, म.क., बहुगुणी, वल्ली यांचा जैत झाला
वरील चाणाक्ष वाचकांनी ओळखल्याप्रमाणे
"जैत रे जैत" च आहे.
म्हणजे हे कोडे अगदीच सोपे निघाले तर, पुढच्या वेळी जास्त काळजी घ्यावी लागेल.
पण हरकत नाही. मूळ उद्देश पुस्तक परिचय होता व तो पुरा झाला.
अर्थात् न वाचलेल्यांसाठीही भरपूर क्लू होते -
- महादेव व डोंगर यांचे वेचात दिसणारे एकरूपत्व (लिंगोबा हा शब्द फक्त नव्हता एवढेच)
- डोंगर-घळींचा प्रदेश
- "भारंबीचे ठोंब" किंवा "चवेणीचे कंद" यासारखे या मातीतले अस्सल शब्द
- गंगन सारखे आदिवासी इ. बोलीतले शब्द
- मधमाशांच्या पोळ्यांचा हार म्हणजे तर एकदमच गिव्ह-अवे कोडे फोडणारा क्लू
(हा दिला नसता, पण मीच घालून घेतलेले निकष आड आले)
ही कथा ठाकरांचा बालसुलभ स्वभावाचा भगत नाग्या व त्याची प्रेमिका-पत्नी चिंधी यांची आहे. पार्श्वभूमीला कर्नाळा येथे दिसणारा व कथेत महादेवाचे भावरूप घेतलेला लिंगोबाचा डोंगरसुळका आहे.
नाग्याला "बानी सांगितला, का कुनाच्या वाटी जाऊ नको. कुनी वाटी गेला, तर त्याला डंखल्याबिगर र्हाऊ नको."
असे असता देवीमाशीने अन्यायाने त्याचा डोळा फोडला, तिला धडा शिकवण्यासाठी ही दोन उलीशी माणसं शहाण्यांनी खुळ्यात काढलं असतं असं अतर्क्य अकृत्य करायला निघाली.
"महादेवा रे! डोंगरच्या राजा! आज नांग्या तुझ्या डुईवर चढणार आहे. आपला सबुद पाळणार आहे. आपली तेख निभावणार आहे. आग्यामाश्यांच्या पोळ्यात निसुग मनानं बसलेली ती देवीमाशी - तिला तुझ्या आसर्यापासून हाकून काढणार नाग्या! मग काय होईल ते जाईल. ही थड की ती थड!
तूच वाट दावलीस. त्या वाटेनं तो जाणार. त्याला सांभाळ. त्याचा उचलला पण पुरा होऊ दे. तेवढं झाल्यावर मग काही का हुईना! एक डोळा फुटलाच आहे. दुसराही फुटेल. त्याची काळजी नाही. सूड पुरा झाला पाहिजे! महादेवा रे, उलीश्या नाग्याच्या सबुदाची लाज तुला!"
वाचाच.
- दिगम्भा
कुठे लपवु मी तोंड
छ्या! हे ही आलं नाहि.. कुठे लपवु मी तोंड? 
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
एक कल्पना
>>>> कुठे लपवु मी तोंड?
असाच तोडीस तोड वेचा देऊन 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/






पास
पुस्तक वाचलेले नाहीये त्यामुळे पास. वेचा मात्र कातिल आहे अगदी.
पुविवर तुमचे स्वागत आहे, दिगम्भा! क्या धासू एंट्री मारेली है... व्वाह!