• '

आपल्यातले पाडगावकर

ऋषिकेश
सोमवार, 12 December, 2011 - 10:33
 

लेखकाचे चित्र

 

गाभा

प्रत्येकाला कोणतातरी लेखक/कवी आवडतो, नावडतो. खरंतर आवडते लेखक, आवडते कवी ही बर्‍याच जणांसाठी मोठी यादी असते. मात्र त्यापैकी काहि जण मात्र 'आपल्यातले' वाटतात- आपल्यासारखे वाटतात. अश्याच आवडत्या कवींपेक्षा मंगेश पाडगावकर मला 'आपल्यातले कवी' वाटत आले आहेत. प्रेम या विषयावर उगाच मख्ख चेहरे करून क्लिष्ट चिकित्सा करताना किंवा भावनाविव्हळ होऊन अनेकांना शाब्दिक भावनाचिंब वांत्या होताना आपण पाहिले असेलच. मात्र "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं" म्हणणारा हा कवी आपल्याशी थेट संवाद साधुन जातो.

पाडगावकर हे काहि प्राज्ञ मराठीतच कविता लिहिली पाहिजे वगैरे मानणार्‍या कवींच्या पंथातले नाहित. 'मुक्तछंद अत्यंत आनंददायी - सर्वांना रुचेल अश्या- पद्धतीने हाताळू शकणार्‍या मोजक्या कवींमधे यांची गणना करता यावी. प्रेम या विषयांवरील वृत्तबद्ध काव्या पासून ते मुक्तछंदात लेखन करणारे हे प्रेमवीर इतरही विषयांवर तितकेच प्रभावी लिहितात.
पाडगावकर म्हटले की 'सलाम' या कवितेचा उल्लेख केल्याशिवाय रहावत नाही. एकदा ती कविता वाचाच. इथे विकिपिडीयावरही आहे. त्यावर इथे चिकित्सा वगैरे करावी यापुढे पोचलेली ती कविता आहे.

मागे चतुरंग च्या रंगसंमेलनात पाडगावकरांना जीवनगौरव पुरस्कार दिला होता. तेव्हा त्यांनी मुलाखत झाली होती. त्यांनी जे म्हटलं होतं ते कायम लक्षात ठेवण्यासारखं मला वाटतं. ते सांगत होते "की तुम्ही कधी झाडावरून पिकलं पान गळताना पाहिलंय? कसं गोल फिरत फिरत जमिनीवर येत असतं.. नाचत गिरक्या घेत जमिनीवर पडत असतं. त्याला माहिन नसतं का की हे पडणं म्हणजे आपलं मरणं आहे? मग तरीही ते असं गिरक्या का घेत असतं? हे Dancing at its own death असं त्याचं का चालु असतं? सांगु? कारण ते पान कधीतरी हिरवं राहिलं असतं. ते हिसवं राहण - ते जगणं त्याने अनुभवलं असतं.. मरण हा प्रसंग त्यालाच अनुभवता येतो जो कधी जगला आहे. तुम्ही आज जगा-- हिरवं होऊन जगा. तरच तुम्हाला त्या गळणार्‍या पिवळ्या पानाच्या नाचण्याचा आनंद घेता येईल"

नुकत्याच झालेल्या पुलोत्सवात श्री. मंगेश पाडगांवकरांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याचं वाचलं. आनंद झाला. ज्याने स्वतःचं जीवन गौरवपूर्णतेने जगलं आहे त्याला हा पुरस्कार मिळणे यथोचितच आहे. या निमित्ताने इथे या कवीबद्दल तुमच्या आठवणी, तुम्हाला आवडलेल्या ओळी द्याल अशी अपेक्षा करतो. (मला आवडलेल्या ओळी प्रतिसादात देतो आहेच)

खरंतर एक दिर्घ लेख लिहायचं मनात होतं.. पण उफ्फ ये वक्त ! Wink

काहि आवडत्या ओळी

पाडगावकरांच्या पटकन आठवतायत त्या आवडत्या ओळी देतो:

================
आपण असतो उभे एकमेकांजवळ एकमेकांशिवाय.
तरीही ओळखतो भुकेचा वास.इच्छांचे वळसे.
हिशोब करीत करीत जपुनच घसरतो.
गरजांच्या मिठयांनी गरजाच प्रसवतो.
आणि यातले नसते काहिच आपल्या स्वाधीन.
एकमेकांजवळ. एकमेकांना. एकमेकाने.एकमेकांहून.
एकमेकांआत : एकमेकांशिवाय.
================
सलाम प्यारे भाइयों और भैनों,सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिंन माफ करना भाइयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त ऊजव्या हाताने सलाम,
सलाम,सबको सलाम,
भाइयों और भैनों,सबको सलाम.
===========

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

सुंदर! अती सुंदर!!

सुंदर! अती सुंदर!!

विष्णु वडेर

पाडगावकर

पाडगावकरांची कविता. साधेपणा हा मला सगळ्यात भावणारा गुण .. आता लगेच आठवणार्‍या ऑम्लेट या कवितेतले हे कडवे बघा ..

कोंबडीच्या अंड्यामधुन
बाहेर आले पिल्लु
होते अगदी छोटे
आणि उंचीलाही टिल्लु

सहज साधी सुंदर कविता !

पाडगावकरांचे दासबोधाचे विडंबन

पाडगावकरांचे दासबोधाचे विडंबन असलेला 'उदासबोध' पूर्वी वाचला होता. सहजसोप्या भाषेमुळे खूपच आवडला होता.
पाडगावकरांबाबतच्या दिर्घ लेखाची वात पाहात आहे रे ऋ.

सुंदर धागा ऋ

ऋ,

छान धागा काढला आहेस.

पाडगांवकरांची 'जिप्सी' हा कवितासंग्रह वाचला आहे. तेव्हाच एक वेगळ्या उंचीवरच्या कविता लिहिणारा कवी म्हणून पाडगांवकरांची ओळख झाली.

सांग सांग भोलानाथ हे बालगीत तर सर्वांना माहिती आहेच
तसेच अशी पाखरे येती आणिक स्मृति ठेवुनी जाती हे व अशी कित्येक सुमधुर गीते सर्वांना माहिती आहेतच

पण जिप्सी एक वेगळ्या प्रकारचा कवितासंग्रह आहे.
त्यातील जिप्सी कवितेतील मला सर्वात जास्त आवडलेल्या ओळी देतो.
संपूर्ण कविता इथे वाचता येईल

एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून
......
......

आणि पुढें कशासाठीं गेलॊ घर मी सोडून !
सारीं सारीं सुखे होतीं, काही नव्हतेंच न्य़ून
पण खोल खोल मनीं कुणी तरी होतें द:खी
अशा सुखांत असून जिप्सी उरला असुखी
दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
मिटलेल्या डोळ्यांपुढें खळखळणार्‍या लाटा …
खळखळणारी पानें … दूर पळणार्‍या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

- मंग॓श पाडगांवकर (१९५२)

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

एक जिप्सी आहे माझ्या खोल

एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

किती नेमके वर्णन आहे. ही कविता जेव्हा वाचली तेव्हा तर लग्नही व्हायचे होते.. नोकरी लागली होती. हातात पैसा होता. त्यावेळी तर ही भावना अतिशय उच्चतेने वावरत होती आणि तेव्हाच मी ही कविता वाचलेली आथवते. आर्थातच प्रचंड आवडली होती - अजुनही आवडते

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

+१ असेच म्हणतो

ऋ प्रतिसाद आवडला.

नेमक्या शब्दांत तू भावना मांडल्यास Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

केस चिंब ...

केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली
ओठावर त्यांची माझ्या किती फुके झाली...च्जित्रमय रचना!!!!

विष्णु वडेर

ओहो! खल्लास!

ओहो! खल्लास!

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

केस चिंब बद्दल

केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली

भेट तुझी माझी स्मरते हे संपूर्ण गीतच आहे.
अरुण दाते यांनी गायलेले आणि यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेले हे भावगीत अप्रतिम आहे

मंगेश पाडगांवकरांची संपूर्ण रचना ही अशी आहे. यात विष्णु वडेर यांनी दिलेले शब्द ठळकवले आहेत Smile

भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली

श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

रचना: कविवर्य मंगेश पाडगांवकर

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

सांगा कसं जगायचं?

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत
कि गाणं म्हणत?
तुम्हीच ठरवा!

डोळे भरून
तुमची आठवण
कोणीतरी काढतच ना?
उन उन
दोन घास
तुमच्यासाठी वाढतच ना?

शाप देत बसायचं
कि दुवा देत हसायचं?
तुम्हीच ठरवा?

काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसत,
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेवून उभ असत?

काळोखात कुढायचं
कि प्रकाशात उडायचं?
तुम्हीच ठरवा!

पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असत;
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसत?

काट्यासारखं सलायचं
कि फुलासारखं फुलायचं?
तुम्हीच ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येत;
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येत!

सरला आहे म्हणायचं
कि भरला आहे म्हणायचं?
तुम्हीच ठरवा!