||दिवाळी २०१०||

अमृतानुभव - माझ्या नजरेतून ग्रंथपरिचय आणि माझे त्याच्याशी नाते
मदतनीस

वि. वा. देशपांडे

अमृतानुभव/अनुभवामृत हा आकाराने लहान, पण उपनिषदांच्या तोडीचा; जणू ज्ञानोपनिषदच.  असा हा ग्रंथ का लिहिला गेला, याबद्दल एक आख्यायिका आहे. ज्ञानेश्वरी लिहून झाली.  निवृत्तिनाथ म्हणाले -"गीतार्थ सांगितलास.  ज्ञानदेवा, आता तू स्वतःच्या अनुभवाचे वर्णन करणारी रचना करावीस." गुरु-आज्ञेचा ज्ञानदेवांनी स्वीकार केला. अनुभवामृत अवतीर्ण झाला. पंधरा दिवसात ही रचना झाली. आठशे ओव्यांचा ग्रंथ असल्याने हे सहजशक्य वाटते.
अमृत - अंत नसलेला- शाश्वत, चिरकाल म्हणून केवळ आनंदस्वरूप असलेला ज्ञानदेवांचा आध्यात्मिक अनुभव;  एवढाच या ग्रंथाचा विषय.  हे समग्र विश्व त्या चिन्मात्ररूप आत्मवस्तूचा (चैतन्य/ अद्वैतत्व) विलास आहे - ब्रह्म्याचा चिद्विलास - असा सिद्धांत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवात मांडला आहे.  हा आहे ज्ञानदेवांच्या अनुभवरूप पावलेल्या जाणीवांचा विलास.  विश्व त्या चिद्वस्तूचा विलास तर अनुभवामृत म्हणजे ज्ञानदेवांचा चिद्विलास.

ज्ञानेश्वरी हा विशाल सामाजिक पातळीवरून केलेला श्रोत्यांशी संवाद.  त्यांचा चांगदेवपासष्टी हा व्यक्तिगत पातळीवरून केलेला मित्रसंवाद.  अमृतानुभव मात्र त्यांनी स्वतःशीच केलेला संवाद - आत्मसंवाद. अद्वैताचा हा अनुभव प्राप्त करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत.  अंतिम अनुभव एकत्र असला तरी अनुभव घेण्याच्या प्रक्रियेत त्या त्या मार्गानुसार काही फरक पडतो.  गीतेच्या सहाव्या अध्यायाय पातंजल योगाभ्यासाविषयक पाच श्लोक आहेत (१० ते १४).  ज्ञानदेवांनी त्यावर विस्तृत टीका केली आहे (कुंडलिनी जागृती). गीतारहस्यात लो. टिळकांनी या पातंजल योगास 'पंथराजु' म्हटले आहे.  बाराव्या अध्यायात मात्र स्वतः भगवंतच "अव्यक्ती गोविती चित्त क्लेश त्यास विशेषचि, देहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडेचिना" (१२-५), असे म्हणून भक्तिमार्गास प्राधान्य देऊ लागतात.  त्याचप्रमाणे ज्ञानदेवही सर्वसामान्यांच्या दृष्टीतून या योगमार्गाची मर्यादा जाणून होते.  गीतेच्या अठराव्या आध्यायात परा-भक्तीचा विषय येतो (श्लोक ४९ ते ५५) तेव्हा तेथे योगाचा कोणताही संदर्भ उरत नाही.  म्हणूनच बहुदा ज्ञानदेव अमृतानुभाच्या ओवी क्र. ७२७ मध्ये म्हणतात "प्रत्याहारादि आंगी | योगे आंग टाकले योगी|| जोअ जाला इथे मार्गि| दिहाचा चांदु||
प्रत्याहार आदी अष्टांग यांचे सहाय्याने जो योगावर अवलंबून राहतो तो योगी या मार्गामध्ये दिवसाचा चंद्र असावा तसा निस्तेज होतो.  हा आहे ज्ञानदेवांचा स्वतःचा अनुभव.

अमृतानुभवातील विवरणाची पातळी  ही अध्यात्ममार्गावरील परिणत (अद्वैत- साक्षात्कार) अवस्थेत पोहोचलेल्या पुरुषाची आहे.  येथे वैराग्य, इंद्रियसंयम अशा साधनांचे विवेचन नाही. बद्ध आणि मुमुक्ष्य जीवांचा उल्लेख वासंबंध नाही. बद्ध म्हणजे पारमार्थिक जिज्ञासेचा स्पर्शही न झालेला आणि मुमुक्षु म्हणजे अज्ञानी अवस्थेत असलेला किंवा मोक्षाच्या मार्गाने वाटचाल करणारा. कर्माचा प्रपंच तसेच ज्ञानाचा मार्गही येथे चालत नाही. अनुभवात 'ज्ञान'  गृहीत धरले आहे. तर मग आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी तसेच आधुनिक/पुरोगामी/विज्ञानी व्यक्तींनी हा ग्रंथ वाचूच नये काय? येथेही ज्ञानदेव आपणा सर्वांनाच आश्वस्त करीत आहेत - 
आणि मुक्तु मुमुक्षु बद्ध | हे तंववरी योग्यता बेहद||
अनुभवामृत स्वाद| विरुद्ध जंव|| अनु. ७९५||

या अनुभवामृताच्या गाभ्याशी पोचताच सारे ईश्वररूप, अद्वैतच आहे असा अनुभव येतो.  सारे ईश्वररूपच आहे, म्हणजे काय? अध्यात्म, तत्वज्ञानाच्या बाजूने (अंगाने) सार्‍यांनाच हे (बद्ध/मुमुक्षु/मुक्त) ते परब्रह्मरूप (आत्मवस्तू) आहेत हा येणारा प्रत्यक्ष अनुभव. विश्वव्यवहारी जीवनाच्या अंगाने मनाची धारणा पूर्ण विकसित होणे हीच आन्तर्विश्वात घडून येणारी क्रांती.  म्हणजे प्रत्यक्षात काय घडते? " आपल्या जीवनात जगत असताना घडणार्‍या प्रत्यक्ष घटना ( मानसिक- वैचारिक-भावनिक पातळीवरीलसुद्धा) या सर्वांकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. वॄत्ती स्थिर, सम होतात -  (समग्रता/एकरुपता).

 

परिणाम?
निरपेक्ष निस्सीम प्रेमाची (तेही सर्व भूतमात्रांवर) प्राप्ती.  त्याचाच अंतिम परिणाम म्हणजे बाह्य निमित्तांवर मुळीच अवलंबून नसलेले समाधान/आनंद.  हीच तर मुक्ती. हाच जीवन जगत असतानाच येणारा अमृतानुभव.

अमृतानुभवाची रचना

विषयानुरूप,  स्थूल मानाने अनुभवामृताची दहा प्रकरणे आहेत.

प्रकरण १.

शिवशक्तिसमावेशन - ओवी १ ते ६४. 
विश्वाच्या मुळाशी वेदान्ताच्या परिभाषेत ब्रह्म आणि माया ही दोन तत्त्वे मानली आहेत. सांख्य तत्वज्ञानाच्या परिभाषेत यांनाच पुरुष - प्रकृती ही दोन नावे तर
ज्ञानदेवांचे परिभाषेत शिव आणि शक्ती. ब्रह्म आणि माया काय, किंवा पुरुष आणि प्रकृती काय; दोन्ही ठिकाणी सत्ता ब्रह्माला/पुरुषाला आहे आणि माया / प्रकृती जे काही करते ते ब्रह्माच्या/पुरुषाच्या सत्तेने.  माया/प्रकृती जड आहे तर ब्रह्म/पुरुष चैतन्य आहे. ज्ञानदेवांची मांडणी वेगळी आहे.

शिव आणि शक्ती ही दोघे परस्परांहून भिन्न नाहीत. अद्वैत हेच आपले तत्त्व आहे हे परस्परांना दाखवतात.  तात्विक दृष्ट्या ती दोघे एकच आहेत.
शिव आणि शक्ती ही दोघे समान आहेत.  शिवयो: समरूपिणो: असे ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेवांची शक्ती ही माया किंवा प्रकृतीप्रमाणे केवळ जड नाही.  ती शिवाप्रमाणेच चैतन्यरूप आणि अधिष्ठानरूप (सत्ता/सत) आहे. शिव आणि शक्ती यांचे एकमेकांशी असलेले एकरूपत्व- अद्वैतानुभव - हा सारा इंद्रियातीत असणारा अतींद्रिय अनुभव ज्ञानदेव रोजच्या जीवनातील येणार्‍या अनुभवांचे दृष्टांत देऊन साधकाच्या (सामान्य व्यक्तीच्या) मर्यादित अनुभवविश्वाच्या कक्षेत सहजतेने आणतात.

प्रकरण २.
श्री गुरुस्तवन - ओव्या ८०
ज्ञानदेवांनी आपल्या गुरूंना - निवृत्तिनाथांना केलेले वंदन.  गुरू (सद्गुरू) हा परब्रह्मच आहे.  गुरुवंदन हे प्रत्यक्ष परब्रह्मवंदनच ही आहे ज्ञानदेवांच्या मनाची धारणा.

प्रकरण ३. 
वाचा ऋण -परिहार ओव्या १३३
ज्ञानप्राप्ती (गुरुमुखाने) ही वाणीच्या आश्रयाने -वाचेनेच ( परा, पश्यंति, मध्यमा, वैखरी) घडते.  ज्ञानदेवच असे एक आहेत की ज्यांनी गुरूंबरोबर वाचाऋण मान्य केले आहे.  ते ऋण येथे फेडतात.

प्रकरण ४. 
ज्ञानाज्ञान निरसन - ओव्या ४३
(ज्ञानअभेदन कथन)
आत्मस्वरूप- द्वैत भेदशून्य आहे. आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी ज्ञान अज्ञानाचा नाश झाल्यावर  आपलाही नाश करते; म्हणजे काय?  हा सारा तत्वज्ञान विचार ज्ञानदेव येथे स्पष्ट करतात.

प्रकरण ५. 
सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ६८
(परब्रह्म व त्याच्या सत्- चित्- आनंद या तीन लक्षणांचा परस्परांशी असलेला संबंध)
सत् - सत्ता  - कधीही नाश न पावणारे अक्षर - अविनाशी. चित् - जाणीव - ज्ञान.  ज्ञानदेवांनी चित् या अर्थी प्रकाश हा शब्द योजला आहे. आनंद - आत्मा हा आनंदरूप मानलेला आहे.  कोणत्याही बाह्यनिमित्तावर आधारलेला नसणारा. सत्-चित्- आनंद म्हणजे सच्चिदानंद.  ह्या तीनही पदांनी एकच वस्तू दाखविली जाते.  ती चौथी वस्तू म्हणाजे आत्मा (ब्रह्म). पण आत्मवस्तू (ब्रह्म) ही केवळ चिन्मात्र/जाणणे असते. म्हणून ही तीन पदे (सत्-चित्- आनंद) आत्म्याचे निर्विकल्पास प्रकट करून आपण नाहीशी होतात (मुकी होतात). हा तत्त्वविचार या प्रकरणात ज्ञानदेव अनेक दृष्टांतांनी समजावून देतात.

प्रकरण ६.
शब्दखंडन - ओव्या १०३
शब्दाचा उपयोग अपार आहे. शब्दरूप आरश्यामध्ये मूर्त वस्तूचेच नाही तर अमूर्त संकल्पनांचही यथार्थ प्रतिबिंब उमटते. विश्व निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये शब्द सर्वात आधी निर्माण झाला.  शब्द हा आकाशाचा गुण. शब्द स्मरणदानी आहे. आधी माहिती असलेल्याचे स्मरण करून देतो. आत्मवस्तू (ब्रह्म) जाणण्यासंदर्भात मात्र शब्द तोकडा पडतो.  तेथे शब्दाचा काही उपयोग नाही. हा सर्व तत्त्वविचार हा ह्या प्रकरणाचा विषय आहे.
 
प्रकरण ७.
अज्ञान खंडन ओव्या २९५
आत्मवस्तूच्या (ब्रह्म) दृष्टीने म्हणजे आत्मवस्तूच्या अंगाने (बाजूने) अज्ञान नाहीच, हे आहे ज्ञानदेवांचे अतिशय महत्त्वाचे प्रतिपादन. अविद्या- अज्ञान ही आत्मवस्तूच्या अंगाने नाहीतच. हा सारा तत्त्वविचार ज्ञानदेवांनी या प्रकरणात अत्यंत खोलात जाऊन मांडला आहे. जेवढे म्हणून ज्ञानरूपात्मक ज्ञेय जगात भासत आहे तेवढे सारे ज्ञानाच्याच प्रकाशाने प्रकाशले आहे.  तेथे अज्ञानाचा पूर भरला असणे शक्य नाही. हे जगत म्हणजे ब्रह्माचा- चैतन्याचा चिद्विलास आहे.  हा सिद्धांत ते अनेकानेक दृष्टांत घेऊन स्पष्ट करतात आणि प्रकरणाच्या शेवटपर्यंत अज्ञानाचा अत्यंत अभाव सिद्ध करतात.

प्रकरण ८.

ज्ञानखंडन ओव्या १९
'सर्व जगत हा चिद्विलास आहे' हे मागच्या प्रकरणात सिद्ध केले.  ज्ञानदेव येथे म्हणतात, ज्ञान हा शब्द अंतःकरणवृत्तीत विशेष भावाला आलेल्या वृत्तिज्ञानाला लावता येतो. ब्रह्म- आत्मा-आत्मवस्तू हे आत्मस्वरूप अधिष्ठानरूपी ज्ञान आहे ते ज्ञानमात्र आहे, ज्ञान नव्हे.  ज्ञान - अज्ञान ही दोन्ही आत्मस्वरूपी नाहीत.
ज्ञानाचा- अज्ञानाशी अगर अज्ञानाचा ज्ञानाशी संबंध घडला तर अज्ञान जाते.  अज्ञान गेल्यावर अज्ञानसापेक्ष ज्ञानही जाते, कल्पनाही जाते, उरते ते शुद्ध ज्ञान.

प्रकरण ९.
जीवनमुक्त दशा कथन ओव्या ७१
सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान त्याचबरोबर वृत्तिज्ञान यांचा अत्यंत अभाव (नाहीपण) आहे. आता तेथे अज्ञानकृत भोक्ता, भोग्यविषय वगैरे कोणतेही द्वंद्व राहत नाही. प्रपंचातील व्यावहारिक ज्ञान अज्ञानाला पोटात घालून तेथे परमात्मस्वरूप चित्सूर्याचा उदय झालेला असतो. परिणाम? व्यवहारदशेमध्ये 'गंध' हा भोग्य विषय, तर 'नाक' हे त्याचा भोक्ता. पण जीवन्मुक्त अवस्थेत भोक्ता भोग्यविषय हा विभागच नाहीसा झाला. म्हणजे काय झाले?
गंधच नाक झाले, आरसेच डोळे झाले, वाराच पंखा झाला, मस्तकच चाफे होऊन दरवळते, जिव्हाच रस झाली असे अनेक दृष्टांत देऊन भोग्य- भोक्ता, दृश्य-द्रष्टा, विषय-विषयग्रहणकर्ता ही द्वंद्वेच नाहीशी झाली.  हा सारा द्वैतभास अखंड एकरस, जे ब्रह्म त्यामध्ये एकत्वाला पावला. हा सारा तत्त्वविचार अनेकानेक दृष्टांतांनी ज्ञानदेव येथे स्पष्ट  करतात.

आत्मज्ञानी ब्रह्मवेत्ता पुरुष (व्यक्ती/स्त्री/पुरुष) कसा असतो? तो भावातीत असतो.  ही त्याची स्थिती अनिर्वचनीय असते. त्याच्या पुढे कुठलाही विषय दिसला आणि तो विषय ग्रहण करण्यासाठी पुढे झाला तरी तात्त्विक दृष्टीने विषय-विषयी भाव (दृश्य/द्रष्टा भाव) त्याच्या अनुभावास येऊच शकत नाही. त्या ब्रह्मवेत्त्यास सर्वत्र अभेदवादाचाच प्रत्यय येत असतो.  त्या पुरुषाची (व्यक्तीची) ही 'सहजस्थिती' तीच भक्ती. सारे विश्व हा त्या आत्मवस्तूचा चिद्विलास आहे, हे सत्य ज्या ब्रह्मवेत्त्या/ज्ञानी पुरुषाच्या (व्यक्तीच्या) हृदयात पूर्ण बिंबून गेले, त्याचा सर्व व्यवहार भक्तिरूपच होऊन जातो.  हीच पराभक्ती.  येथे भक्त आणि भजनीय दोन्ही एकरूपच असतात. ह्या सार्‍या संकल्पना ज्ञानदेवांनी सुंदर/सुयोग्य दृष्टांतांनी समजावून दिल्या आहेत.

प्रकरण १०.
ग्रंथ परिहार ओव्या ३१ (एकूण ८००)
ज्ञानदेवांची शब्दातीत उच्चतम आदर्शोत्तम तर अर्थगर्भ अनहंकारी भूमिका येथे पहावी. अनुभवांती ज्ञानदेव म्हणतात, "अगा निवृत्तिनाथा, माझे मस्तकावर हात ठेवून मला सुखी (आत्मज्ञानी) केलेत तर आता ते सुख मी निवांतपणे भोगावे काय? सूर्याचे तेज सूर्य सार्‍या जगास प्रकाशित करण्यास वापरतो. चंद्राला अमृत, मेघाला पाणी, दिव्याला प्रकाश असतो, ते हे सारे आपले ईश्वरदत्त सामर्थ्य जगासाठीच वापरतात." म्हणून ज्ञानदेव म्हणतात की मी जे बोललो, मी जे लिहिले ते सारे गुरुचेच ऐश्वर्य आहे ना?; मग ते त्याचे सारे मी या ग्रंथारूपाने सर्वांना दिले.  मी केवळ निमित्तमात्र. जे स्वयंसिद्ध आहे तेच मी सांगत आहे. यात माझे असे काहीच नाही. ज्ञानदेव पुढे म्हणतात, माझे लिहिणे, हे बोलणे कसे? तर हे पाण्यावर मकरीचे चित्र काढावे तसे.  चित्र तर काढले/रेखाटले पण ते रेखाटले असून न रेखाटल्यासारखे आहे.

ज्ञानेश्वरांच्या या अत्यंत तरल आणि तितक्याच अर्थगर्भ उद्गारांचे मर्म स्पष्ट करण्यासाठी शब्द शोधण्यापेक्षा आपण केवळ मौनच पत्करावे. फार तर हे ज्ञानेश्वरच म्हणू शकतात असे म्हणून त्यांचे ते सामर्थ्य आपण फक्त चकित होऊन पाहत राहावे.

अमृतानुभवाचे आणि माझे नाते:

हा ग्रंथ वाचताना कायम एक विचार मनात जागृतावस्थेत ठेवला आणि प्रामाणिक प्रयत्न करत आलो. या ग्रंथाचे वाचन, मनन आणि त्याच वेळी प्रत्यक्ष व्यवहारात त्यामधील 'व्यापक/समग्र/शाश्वत' जीवनास वेढून उरणार्‍या तत्त्वांचा आचरणाच्या अंगाने कसा वापर करता येईल? आता या लेखानिमित्त विचार करता 'काय झाले माझ्या आयुष्यावर परिणाम?' असे स्वत:स विचारताना अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतातः जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. सुख-दु:खांच्या घटना, यश-अपयशांचे प्रसंग, अपेक्षाभंगाचे दु:ख या सार्‍या कोणाच्याही जीवनात अनुभवास येणार्‍या प्रसंगांना धीराने, समदृष्टीने भिडण्याची क्षमता बर्याच अंशी साध्य करता आली. हे सारे मनाची धारणा बदलल्याने साध्य होत गेले.

मी-माझे हा भाव कमी होत गेला. हवे-नकोपणही कमी होऊ लागले. व्यवहारी जीवनातील घटनांमधे होणारी मानसिक गुंतवणूक (तीही आवश्यक नसताना) कमी होऊ लागली. परिणाम? मनाचा मोकळेपणा वाढला. समाधानाची अवस्था थोडी का होईना अनुभवता येऊ लागली. अपयशाचा, त्यामुळे येणार्‍या निराशेच्या काळातून जात असताना मनावर येणार्‍या ताणांचे ओझे कमी होत गेले.  स्वतःवरील विश्वास वाढू लागला. ईश्वरास तुमची समर्पण वृती हवी असते, हे ध्यानात आले. 'जे खासी, होमिसी, देसी, जे जे आचरसी तप| जे काही करिसी कर्म, ते करी मज अर्पण ||'. थोडक्यात 'इदं न मम'.  'हे सारे कर्तृत्व ईश्वराचे' हा भाव हळूहळू स्थिरावू लागला. अहंकार कमी झाला तर आनंद वाढला!

चौकस बुद्धी सतत मनात जागी ठेवण्याच्या प्रयत्नांमुळे विचारक्षमता वाढली. विवेक करता येऊ लागला. कर्मसिद्धांतावरील विश्वास स्थिर झाला. परिणाम म्हणून 'परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती ही तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणार्‍या फळांना (स्वतःच) जबाबदार असते', या अटळ सत्याचा जणू साक्षात्कार झाला. त्यामुळे सावधपणा, चुका टाळणे, निदान त्या पुन्हा पुन्हा होऊ न देणे याची दक्षता घेण्याची सवय, अंतःस्फूर्तीने वाढू लागली. स्वत:चे दोष, कळत - नकळत घडणार्‍या चुका प्रथमतः स्वतःशी व त्याचबरोबर संबंधितांसमोर उघड करण्याचे धैर्य मिळत गेले.
एकूण काय? सर्वांगीण अंतर्बाह्य प्रगतीचा अमृतानुभव सतत मिळत गेला, मिळत आहे.

अनुक्रमणिका

अनुभव

कवितासंग्रहाचे परिचय

लेखकांचे परिचय

मुलाखत

पुस्तक परिचय

प्रतिक्रियां

अमृतानुभव

लेख आवडला.अमृतानुभव वाचताना त्यातील विचार तत्वज्ञानाच्या पातळीवर समजले, तरी व्यवहारात व मानसिक भुमिकेत त्याप्रमाणे बदल घडणे हे फारच अवघड ! पण या वाटेवर किमान प्रवास सुरु केला तरच अनुभुती मिळ्ण्याची शक्यता हे जाणवले.या वाटचालीबद्दल अजुन स्विस्तर लिहावे ही विनन्ती.

लेख आवडला. खास करुन,

लेख आवडला. खास करुन, अमृतानुभवाचे आणि माझे नाते, हा भाग.
त्यातील प्रकरणांविषयी अधिक विवेचनात्मक पुन्हा कधीतरी लिहा, अशी विनंती.

प्रतिसाद द्या

प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.