• '

अनिल अवचटांच्या 'पुणे' मुक्कामी!

प्रभाकर नानावटी
मंगळवार, 20 December, 2011 - 12:48
 

मुखपृष्ठ

पुस्तक जोडलेले नाही

 
 

पुस्तक

पुस्तक जोडलेले नाही

 

'


पुणे' या (एके काळच्या खेडेवजा) शहराबद्दल माणसागणिक मतं बदलत असतात. शहराबद्दलच्या त्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार या मतात भिन्नता आढळते. काहींना अस्सल पुणेरीचा फटका बसला असेल तर काहींना इथल्या भामट्यांनी (संगनमताने) गंडवले असेल. काहींची इथल्या मुजोर रिक्षावाल्याबद्दल तकरारी असतील. वाहतूक (अ)व्यवस्थेला बळी पडलेले येथे भेटतील. पोलीस (अ)व्यवस्था हा नेहमीच्या टीकेच्या विषयावर चर्वितचर्वण होत असेल. येथील महानगर पालिका 'म्युनिसिपालिटी' म्हणवून घेण्याच्या लायकीचेसुद्धा नाही, असेही काहींचे ठाम मत असेल. तरीसुद्धा हे शहर वाढतच आहे (व शहराचा बकालपणासुद्धा!). त्याचबरोबर या शहरावर प्रेम करणार्‍यांचीसुद्धा संख्या कमी नाही हेही लक्षात ठेवायला हवे. याच प्रेमापोटी अनेक लेखक अत्यंत आत्मीयतेने या शहराचा लेखाजोखा मांडत असतात. भरभरून लिहित असतात. अशा प्रकारे या शहरावर प्रेम करणार्‍यांपैकी अनिल अवचट असून आपल्यासारख्या वाचकांना 'पुण्याची अपूर्वाई' या पुस्तकातून त्यांना आवडलेल्या पुणे मुक्कामाची छोटीशी झलक दाखवत आपल्या 'त्या पुण्याच्या' आठवणी ताजे करतात. पुस्तक पूर्ण वाचून झाल्यानंतर " आजच्या अफाट वाढलेल्या पुण्यात मी माझं पुणं असं जपून ठेवलं आहे" या विधानाशी आपणसुद्धा सहमती दर्शवतो.

अनिल अवचट आपल्याला 30 - 40 वर्षे मागे नेऊन त्या काळच्या पुण्याचे दर्शन घडवतात. त्यांच्या या गैडेड टूरमध्ये बोहरी आळी, जुना बाजार, कॅम्प एरिया, पुणे विद्यापीठाचे परिसर, रेसकोर्स, जुनी मंडई, व पुण्याजवळच्या टेकड्यांचा समावेश आहे. बोहरी आळी म्हणजे कारागीर लोकांची प्रत्यक्ष पंढरी! स्क्रू - खिळ्यांची दुकानं, लिमलेट गोळ्यांचा कारखाना, जमाखर्चांच्या वह्यांचा कारखाना व दुकान, सुतारी हत्यारांचे दुकान, अशा विविध प्रकारच्या दुकानांची फेरी लेखक करून आणतात. त्या त्या दुकानांचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करतात. त्यामुळे ती दुकानं व त्यांचा परिसर चटकन डोळ्यासमोर उभा राहतो.

या बोहरी आळीत मारवाडी, गुजराती व्यापारीही असले तरी बोहरींचाच तेथे वरचष्मा आहे याची आठवण ते करून देतात. बोहरींचा वैशिष्ट्यपूर्ण वेश, त्यांच्या सवयी, त्यांची जगाकडे पाहण्याची वृत्ती (दे आर गुड फॉर कंपनी,... बट नॉट फॉर मनी), त्यांच्या दुकानातील नोकरांचा तडफदारपणा, इत्यादी तपशील वाचताना वाचकाला त्या आळीत पुन्हा एकदा जावेसे वाटू लागेल.

अनिल अवचट आपल्याला या परिसरातील अनेक कसबी कामगारांची (खरे पाहता कलाकारांची) भेट घडवून आणतात. त्यांच्या कामातील बारकावे समजून सांगतात. बिटेकर धार केंद्र, एस् बाबूलाल लॉक मेकर इत्यादींच्या दुकानातील किमयांचे भरभरून कौतुक करतात. भडभुंज्याच्या भट्टीतील चणे, फुटाणे, खारे दाणे यांच्या चवीचे रहस्य उलगडून दाखवितात.

अवचटांचा लाकूड कोरून शिल्प करण्याचा (अनेक छंदापैकी एक) छंद आहे. त्यापायी त्याना लाकडांची पारख करणारे सुतार, ओतारी, कातारी इत्यादींचा याच भागात ओळख झाली. त्यांच्या कामातील बारकाव्यांचे निरीक्षण करताना लेखकाला आश्चर्याचा धक्का बसला. कदाचित पुढील काही काळात ओतारी, कातारी हे शब्द व्यवहारात न वापरल्यामुळे फक्त शब्दकोशात वाचायला मिळतील. कारण ही कामं आता काळाच्या पडद्याआड गुप्त होत आहेत.

जुना बाजार म्हणजे गोर गरीबांच डिपार्टमेंटल स्टोर, या शब्दात या बाजाराविषयी आपुलकीने अवचट उल्लेख करतात. आपल्या दृष्टीने आजकाल हा बाजार म्हणजे वाहतुकीला अडथळा असे वाटत असले तरी गोर गरीबांच्या (व केळकरसारख्या ऍंटिक जमविणार्‍यांच्या) दृष्टीने हा एक मायाबाजारच आहे. भंगार मालांचा हा रस्त्यावरचा बाजार मॉल्स व डिपार्टमेंटल स्टोर्सना टक्कर देत अजून टिकून आहे. येथे टापटिपीतील सेल्स गर्ल्स नाहीत. वस्तूंवर छापील किंमत नाही. तरीसुद्धा येथे व्यवहार होतात व कदाचित लाखोंची उलाढाल होत असावी. दर रविवारी व बुधवारी भरणार्‍या या बाजाराचेही विक्री वैशिष्ट्य आहे. वस्तूंची मांडणी, दुकानदारांचं आपल्या विक्रीवस्तूबद्दलच अप्रूप, वस्तूंची काळजी, विक्रीकलेचा नमूना, व्यवहारातील पारदर्शकता, इत्यादीबद्दल नेमकेपणाने लेखक भाष्य करत आपल्या एका वेगळ्या जगात नेतात. जुन्याबाजाराचे वर्णन करत असतानाच या वस्तूंच्या मुळापर्यंत जातात. तेव्हा त्यांना अल्पना टाकीजजवळच्या परिसरातील व्यवहाराचा शोध लागतो. येथील खरेदी विक्री कशी होते याचे ते वर्णन करतात.

जुन्याबाजारात कपड्यांचा, बूट - चपलांचा, लोखंडी वस्तूंचा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा असे अनेक सबसेक्शन्स आहेत. येथे येणारा ग्राहक घासाघीस करणार हे ओळखूनच वस्तूंची किंमत सांगितली जाते. व कुणीही नाराज न होता व्यवहार संपविला जातो. हा बाजार अनेकांच्या रोजगारांची सोय करतो. व सर्वात महत्वाचे म्हणजे reuse, repair, recycle या पर्यावरण संवर्धनाच्या सूत्रांचे तंतोतंत पालन करतो.

हातावर पोट असणार्‍या या कष्टकर्‍यांचे जीवन एकमेकावर अवलंबून असल्यामुळे माणसांच्या परस्पर संबंधांची वीण तयार होते. अशी वीण मध्यम वा उच्च वर्गात फारच विरळ असते. येथे एकमेकांना जमवून घेतल्याशिवाय व्यवहारच चालू शकत नाही. माणसांच्या चांगुलपणाचा प्रत्यय घ्यायचे असल्यास अशा लोकांच्या संपर्कात यायला हवे. नंतरच आपलाही माणुसकीवर विश्वास बसू लागतो. यांच्यातही हेवेदावे नक्कीच असतील. परंतु येथील कामगारांच्या मते "सब लोग अच्छे ही होते है, कभी कभी माथा बिघड जाता है."

पुणे स्टेशनचा परिसर हा लेखाचा विषय होऊ शकतो हे आपल्याला अवचटांचा लेख वाचताना लक्षात येतो. आपण नेहमीच गाडी पकडण्याच्या वा प्रवासातून परतल्यानंतर घरी परतण्याच्या घाई - गडबडीत असल्यामुळे संपूर्ण आयुष्य पुण्यात घालवले असले तरी स्टेशनचे जग अपरिचितच राहते. पुणे (वा कुठल्याही मोठ्या शहरातील) स्टेशन हे एक अद्भुत भारतदर्शन आहे, हे आपण मुद्दामहून 2-4 तास या परिसरात घालविल्यानंतर कळू लागते. सुटा - बुटांपासून ते कपड्यांच्या लक्तरापर्यंत सर्व वेषातली माणसं येथे दिसतात. पुणे स्टेशनवरील संस्कृती व पुण्याच्या 'सदाशिव पेठी' संस्कृती यात फार मोठी दरी आहे. गाडी प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत सुन्न भासणार्‍या प्लॅटफॉर्मला गाडी लागल्यानंतर जत्रेच स्वरूप येतं. खरे पाहता पुणे स्टेशनवर गाडी सामान्यपणे भरपूर वेळ थांबते. परंतु गाडी आल्या आल्या पाच मिनिटात सगळे प्रवासी फक्त घाई करतात. हमालांशी हुज्जत, ढकला ढकली, उतरणार्‍यांशी आलिंगन, सामानांची मोजदाद, विक्रेत्यांचा आरडाओरडा, ... एवढ्या सगळ्या गोष्टींची पाच मिनिटांसाठी धामधूम. नंतर गाडी हलेपर्यंत पुन्हा एकदा सारे कसे शांत शांत. विक्रेते ओरडत नाहीत. लाल डगलेवाले आपापल्या कामाला. हळूहळू सारेजण आपलं बस्तान आवरण्यात मग्न. पुढची गाडी येईपर्यंत प्लॅटफॉर्म झोपी गेलेला. लेखक फक्त प्लॅटफॉर्मचेच वर्णन न करता 6 - 7 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आयुष्य काढणार्‍यांचाही मागोवा घेतात. प्रवाश्यांनी फेकून दिलेल्या पदार्थावर जीवन जगणारी, घर सोडून पळून आलेली, बूट पॉलिश करून जगणारी, रद्दी, प्लॅस्टिक ग्लास उचलून भंगारात विकणारी मुलं, माणसं यांचेही जीवन ते जवळून पाहतात. रोज रोज घडणार्‍या या महाभारताला ते कंटाळत नाहीत. त्यामुळे या स्टेशनला कुणी घाणेरडं, बकाल म्हटलेल त्यांना आवडत नाही. कारण ते आपल्याला दाखवत, की आपण खरे कसे आहोत. स्वत:च्या बालपणीचे कुतूहल शमविण्यासाठी इंजिनवर चढणे, लोकेशेड बघणे, स्टेशनमास्तर, तिकिट चेकर, याना भेटणे, रूळ तपासणार्‍यांचे काम समजून घेणे इत्यादी गोष्टी पण ते करतात.

पुणे कॅम्प व पुणे विद्यापीठ ही अवचट दंपतीची आवडती ठिकाणं. कॅम्पमध्ये कितीही वेळा 'विंडो शॉपिंग' केले तरी कंटाळत नाहीत. वेस्ट एण्ड टाकीजचा प्रशस्त आवार, तेथील एक्सप्रेसो कॉफीचे मशीन असलेली शेड, संध्याकाळच्या इंग्रजी चित्रपटांचे उच्चभ्रू प्रेक्षक, मेन स्ट्रीट व ईस्ट स्ट्रीटवरील भुरळ पाडणारी दुकानं व त्यांचे वैशिष्ट्य (बुधानी वेफर्स, अपोलो म्युझिक हाउसमधील गाण्याचे रेकॉर्ड्स, मॅनिजचा बुक् स्टाल, नाझ हॉटेल व त्यातील काळ्या लाकडी टिपिकल खुर्च्या, तेथील कुरकुरीत सामोसे, 'नीडल वुमन', कयानी बेकरी....) याबद्दलचे वर्णन वाचत असताना आपणही कालकुपीत बसून त्या काळात शिरतो. मोनाफुडमधील छोले बटोराची चव जिभेवर रेंगाळते. परंतु मेन स्ट्रीट, ईस्ट स्ट्रीट म्हणजे एवढेच नसून चप्पल - बूट बनविणारे कसबी चर्मकार, 'डिझायनर' शिंपी, कॅमेरा दुरुस्त करणारे, इत्यादींचीसुद्धा आपल्याला ते आठवण करून देतात.

युनिव्हर्सिटीतील रोजचा फेरफटका, मित्र-मैत्रिणीबरोबरील गप्पा, कुठल्याही व्यक्तीला डिप्रेशन असल्यास त्यातून बाहेर काढण्यास पुरेसे ठरेल. अवचटांच्या जगन्मित्रत्वाच्या स्वभावामुळे जयकर ग्रंथालय हे जवळ जवळ अवचटांचे लेखं व पुस्तकं लिहिण्याचे ठिकाण झाले होते. हे सर्व वाचून आपण पुन्हा एकदा या सर्व ठिकाणी फेरफटका मारल्यास हे 'पुणेरी' जग किती बदलले आहे हे लक्षात येईल.

रेसकोर्स हे आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना निषिद्ध असले तरी उत्सुकतेपोटी अवचट तेथे जातात. तेथे काय घडते याचे जवळून निरीक्षण करतात. रेसचे घोडे, जॉकी, बुकी, 'फालतू' इत्यादींचा सहवास घडवतात व रेसचे शौकीन रेसच्या व्यसनी जाऊन कफल्लक का होतात, याचे विश्लेषण करतात. जुन्या मंडईतील वातावरण शब्दबद्ध करताना लेखक तेथील छोट्या-मोठ्या गोष्टींचे कौतुक करतात. मंडईचा पसारा एवढा मोठा असू शकतो हे आपल्याला लेख वाचत असताना कळू लागते.

पुण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या शहराच्या भोवतालच्या अनेक टेकड्या! ज्यांना चालायची, फिरण्याची, फेरफटका मारण्याची सवय आहे त्यांना या टेकड्या हाका मारत असतात. परंतु आज या टेकड्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. चार टक्के बांधकाम की चाळीस टक्के बांधकाम, एवढ्या पुरतेच टेकड्यांचा उल्लेख होत आहे. त्यातील जीव वैविध्यतेचे कुणालाही सोयर सुतकं नाही. परंतु लेखकाने या टेकड्यांनी आपल्याला काय काय दिले आहे याचे आवर्जून उल्लेख करतात.

वसंत सरवटे यानी रेखाटलेल्या रेखाचित्रामुळे पुस्तकाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

कदाचित यानंतरच्या पिढीतील लेखक पुण्याबद्दल लिहिताना उंच उंच टॉवर्स, केएफसी, मॅक्डोनाल्ड, बॅरिस्टा, इत्यादींचे कौतुक करतील. परंतु पुस्तक वाचून खाली ठेवताना अवचटांचे हे पुणे मात्र, काही दिवस तरी, नक्कीच आपल्या लक्षात राहील!

पुण्याची अपूर्वाई
अनिल अवचट,
मॅजेस्टिक प्रकाशन, (2010)
पृ.सं - 150, मूल्य - 200 रु

सुंदर परिचय

प्रभाकरजी,

पुन्हा एकदा सुरेख परिचय करुन दिला तुम्ही.
अनिल अवचट मस्तच लिहितात.

पण जुन्या पुण्याबद्दल तुमच्या परिक्षणातून सर्व वाचताना मलाही माझे जुने दिवस डोळ्यांसमोर दिसले.

पुस्तक वाचून खाली ठेवताना अवचटांचे हे पुणे मात्र, काही दिवस तरी, नक्कीच आपल्या लक्षात राहील!

हे मात्र १०० % खरे आहे.

पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल आभारी आहे.
लवकरच घेईन हे पुस्तक.

धन्यवाद

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

पुन्हा शोधुन वाचायला हवे.

पुस्तक वाचायला घेतलेले. काहि कारणाने पूर्ण करू शकलो नव्हतो. आता पुन्हा शोधुन वाचायला हवे.
अवचटांची शैली छान आहेच. मात्र 'तो' काळ अनुभवला नसल्याने व आताच्या पुण्यात फारसे साधर्म्य राहिले नसल्याने एका वेगळ्याच गावच वर्णन वाटत होतं असं आठवतं

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"