'फोडा आणि राज्य करा' या नीतीबद्दल आपणा भारतीयांना चांगलीच माहिती आहे. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीत आपण त्याची चांगलीच किंमत चुकवली आहे. पण ही ब्रिटिश नीती फक्त भारत आणि भारतीयांविरूद्धच होती असं नाही, तर सर्व जगभर त्यांनी आणि पुढे अमेरिकनांनीही हीच नीती वापरून आजचा 'अतिरेकी' नामक भस्मासुर उभा केला आहे. बराचशी प्रसारमाध्यमं ज्यांच्या हातात, त्यांचीच सत्ता किंवा तेच सज्जन असा आभास आजच्या जगात निर्माण झाला आहे. पाश्चात्यांच्या हातात असणार्या प्रचंड पैशामुळे आणि त्यांच्या जगावर 'आधुनिक' पद्धतीने ताबा ठेवण्याच्या नीतीमुळे इस्लामी अतिरेक्यांचा भेसूर चेहराच आपल्यासमोर उभा राहतो - एवढा की "सर्व मुसलमान अतिरेकी नसले तरी सर्व अतिरेकी मुसलमानच असतात" अशी कर्कश वाक्यं अगदी सहज आपणही, कुठेही चूक असण्याची शक्यताही विचारात न घेता, बोलून जातो. पाश्चात्यांची सहृदयता ती काय टी.व्ही, वर्तमानपत्रांतून आपल्या समोर येते पण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरूवातीलाही मध्ययुगीन तलवारींनी लढाया करणार्या अरबांकडे स्वयंचलित बंदुका कुठून आल्या हे खणल्याशिवाय समोर येत नाही. असाच एक प्रयत्न केला आहे, आताचे लोकसत्ताचे कार्यकारी संपादक आणि विख्यात पत्रकार श्री. गिरीश कुबेर यांनी!
पुस्तकाच्या प्रस्तावनेतच लेखक म्हणतो की हे पुस्तक आहे ते मुसलमान, विशेषतः अरब जगताची बाजू मांडण्यासाठी! 'अधर्मयुद्ध'ची सुरूवातच होते ती इजिप्त या अठरा-एकोणिसाव्या शतकातल्या संस्कृती आणि अर्थसंपन्न देशाच्या मुस्लिम संस्कृतीपासून! आपली संस्कृती आणि धर्माचा आधार घेत, स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी ब्रिटिशांचा पैसा घेणारे जमालुद्दीन आणि त्याचा शिष्य महंमद यांचं १८-१९व्या शतकातलं उदारमतवादी रूप पुढे 'मुस्लिम ब्रदरहूड' या हिंसक आणि पारंपरिक मुसलमानी रूपात कसं बदललं, याचा इतिहास पहिल्या काही प्रकरणांत येतो. यात दिसते ती ब्रिटिश आणि क्वचित रशियन आणि फ्रेंच सत्ताधार्याची लघुदृष्टी! ज्यूंचा विंचू अरबांच्या वहाणेने मारण्याची इंग्रज व्यापारी वृत्ती आणि समोर येते ती फक्त मानवाची आदिम हिंसक वृत्ती! विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जेव्हा या धार्मिक राजकारणात तेल नावाचं नवं अस्त्र आलं, तेव्हा मात्र सर्व पातळीवरचा हिंसाचार आणि धार्मिक कर्कशता वाढल्याचं दिसतं.
"ज्यूंना दोन हजार वर्ष त्यांच्या भूमीपासून लांब ठेवलं गेलं आहे. आम्ही किती दिवस वाट पहायची?" हे इस्रायलच्या भूतपूर्व पंतप्रधान श्रीमती गोल्डा मायर यांचं विधान सगळ्यांनाच माहीत असतं. पण या भूमीवर तेव्हाच पॅलेस्टीनी राहत होते, हे सत्य मात्र दडवून ठेवलं जातं. आपल्या देशापासून लांबवर चालणार्या या संघर्षाबद्दल आपल्याला फारसं घेणंदेणं नसतं, पण तिथे पुरवलेली शस्त्रं आपल्या काश्मीरमध्ये आणि मुंबईतही येतात, तेव्हा आपण या घटनांकडे पाहतो. यासर अराफात या पॅलेस्टीनी अहिंसक दहशतवाद्याला यित्झॅक राबिन आणि शिमॉन पेरेस या इस्रायली पंतप्रधानांच्या जोडीने नोबेल पुरस्कार मिळतो, ही गोष्ट दिसते तेवढी साधी नाही. याच यासर अराफात यांच्या 'फताह' आणि 'पॅलेस्टीनी लिबरेशन ऑर्गनायझेशन'ला चिरडण्यासाठी आजच्या अतिरेकी, आणि खूप उशीराने 'कायदेशीर' दहशतवादी 'हमास'ला याच इस्रायली राजकारण्यांनी दूध पाजलं आहे. पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्ष असो वा अफगाणिस्तान-रशिया, आधी ब्रिटिश आणि नंतर अमेरिकन राजकारण्यांनी लघुदृष्टीने म्हणा वा 'आपण भौगोलिकदृष्ट्या फार लांब आहोत' या समजामुळे असो, कायमच चुकीची भूमिका घेतल्याचं श्री. कुबेर म्हणतात.
ओसामा बिन लादेन, अल कायदा, इराणची गुप्तहेर संघटना सवाक असो वा लष्कर-ए-तोएबा, या सगळ्या अरब आणि मुसलमानांना हिंसेचे धडे मिळाले आहेत ते 'मोस्साद' आणि 'सीआए'कडूनच! या सगळ्यांना शस्त्रं मिळालेली आहेत ती वाढत्या तेलाच्या किंमतींमधून मिळणार्या नफ्यातूनच! आणि तेलाच्या किंमती वाढत्या राखण्यात सर्वप्रथम इराणच्या शहांना साथ कुणी दिली असेल तर, अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांनी! पश्चिम आशियातल्या सत्तासमतोलाच्या राजकारणात जगाचा समतोल आपण हरवून बसलेलो आहोत. या दहशतवादाचे परिणाम इंडोनेशिया, चेचेन्या, बोस्निया आणि आपल्या देशातही दिसत आहेत. एकेकाळी 'फताह'मधे पॅलेस्टीनी ख्रिश्चनांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे (का स्फोट करणारे?) पॅलेस्टीनी आणि सर्व अरब मुसलमान आज या भूमिपुत्रांचाच तिरस्कार करत आहेत, याचं कारण काय हे समजून घेण्यासाठी 'अधर्मयुद्ध' जरूर वाचावं.
गिरीश कुबेर यांचं हे चौथं पुस्तक! याआधीची या विषयावरचीच 'हा तेल नावाचा इतिहास आहे' आणि 'एका तेलियाने' ही दोन्ही पुस्तकंही अशाच संदर्भात आहेत आणि नक्कीच वाचण्यासारखी आहेत. चढत्या क्रमाने पुस्तकं रंगतदार होत गेलेली आहेत, हे माझं निरीक्षण! इराणमधली अयातोल्ला खोमेनींची राजवट असो वा अफगाणिस्तानातले तालिबान - कुराण आणि शरियाचा अर्थ लावताना 'काय करावे?' याऐवजी 'काय करू नये' हेच या राजवटींनी सांगितलं. मुसलमान आणि अरब जगताची बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना श्री. कुबेर यांचंही काहीसं असंच झालं आहे. मुसलमान जगताची बाजू मांडण्याऐवजी पाश्चात्य देशांच्या घोडचुकाच या पुस्तकातून समोर येतात. अर्थात प्रस्तावना आणि मलपृष्ठावरचं हे वाक्य दुर्लक्षलं तर पुस्तक अतिशय वाचनीय आहे. एका ठिकाणी गरज नसताना पूर्णविराम आला आहे आणि पुस्तकाच्या नावातच 'युद्ध' हा शब्द 'युध्द' असा चुकीचा लिहिला आहे. या दोन, खरं तर फुटकळ, चुका वगळता पुस्तक अतिशय माहितीपूर्ण आणि रंजक आहे, याबाबत दुमत होणं कठीण आहे.
अनुक्रमणिका
अनुभव
- ग्रंथालयात भटकंती - जाँ-पॉल सार्त्र
- वैज्ञानिक व पुस्तकांचे जग!
- 'साभार परती'चा शिक्का
- बौद्धांचे आणि जैनांचे संस्कृत साहित्यातले योगदान - एक आढावा
- सांगावेसे वाटले म्हणून.....
- डाऊन द मेमरी लेन
- कृतज्ञ!
- पुनर्वाचनाय च

प्रतिक्रियां
स्थानिक रेड इंडियनांचें शिरकाण करणार्या ...
गोर्या युद्धखोर अमेरिकनांकडून यापेक्षां वेगळें अपेक्षित नाहीं. व्हिएतनाममध्यें अत्याचाराचा आगडोंब निर्माण करणारा जॉन्सन हा दहशतवादीच होता असें अमेरिकेंतही म्हटले गेलें आणि अजूनही म्हटलें जातें. वसाहतवादी युरोपियनहि वेगळे नाहींतच. हिंदु आणि बौद्ध वगळतां सर्वच धर्माधिष्ठित राजकारण्यांनीं तर अनेक वेळां मानवजातीचें उभें विभाजन केलें. इझरायलला मात्र दहशवादी देश ठरविण्यांत येत नाहीं. एके काळीं दहशतवादी असलेला गडाफी आतां पाश्चात्यांना चालतो. राजकीय गणितें अनाकलनीयच.
सुधीर कांदळकर
सुधीर कांदळकर
उत्तम पुस्तक परिचय
ह्या पुस्तकाचा उत्तमरित्या परिचय करुन दिल्याबद्दल आदिती ह्यांचे आभार!
>>> इराणमधली अयातोल्ला खोमेनींची राजवट असो वा अफगाणिस्तानातले तालिबान - कुराण आणि शरियाचा अर्थ लावताना 'काय करावे?' याऐवजी 'काय करू नये' हेच या राजवटींनी सांगितलं. मुसलमान आणि अरब जगताची बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना श्री. कुबेर यांचंही काहीसं असंच झालं आहे. मुसलमान जगताची बाजू मांडण्याऐवजी पाश्चात्य देशांच्या घोडचुकाच या पुस्तकातून समोर येतात. >>> ह्या वाक्याशी सहमत. फक्त अजुन थोडेसे माझ्याकडून अॅड करतो. हे पुस्तक अमेरिकेवर बराच दोष टाकते व त्याचवेळी रशियाबद्दल बर्यापैकी गप्प बसते. सोव्हियेत रशियाने अफगाणिस्तानात घुसणे हा त्यावेळच्या जागतिकपटलावर (इथे मी geopolitics ला जागतिकपटल असा शब्द योजतो आहे) अनावश्यक कृती होती. तसेच सोव्हिएत रशियाने काही फार कायद्याने वा जिनिव्हा कन्वेंशन पाळत युद्ध केले नाही. त्यांनी कार्पेट बाँबिंग, टोळीप्रमुखांना हाताशी धरणे वगैरे उद्योग केलेच. लादेनच्या उगमाला अमेरिकेइतकाच सोव्हिएत रशियाही कारणीभूत आहे.
तसेच मुस्लिम उम्मा, मुस्लिम अरब देशात पैसा येउन सुद्धा दहशतवादास खतपाणी का घातले गेले, त्याची वाढ एव्हडी प्रचंड का झाली ह्याला बगल दिली गेली आहे. उम्मा अथवा ब्रदरहूडची मानसिकता ह्यामागे आहे हे वाक्य कुठेच येत नाही. आणि realpolitik च्या दृष्टीने बघायला गेल्यास विसाव्या शतकाच्या सुरुवातीची इंग्रजांची भुमिका, मग ज्यु आणि त्यांच्या मागच्या अमेरिकनांची भुमिका व सोव्हिएतची भुमिका ह्यांना कुठल्या नैतिकतेच्या फुटपट्ट्या लावणार? मुळात लावाव्यात का?
पुस्तकाच्या मुद्रणप्रतीत काही factual चुका आढळल्या होत्या. जसे अब्दुल नासरची हत्या असा उल्लेख एके ठिकाणी येतो, सवाक ही अफगाणी संघटना आहे असा उल्लेख एके ठिकाणी येतो वगैरे वगैरे.
पण अश्या विषयावरचे comprehensive पुस्तक मराठीत विरळेच.