• '

अंगणातले आभाळ

ऋषिकेश
रवीवार, २५ July, २०१० - १४:३०
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

 

डॉ.यशवन्त पाठक हे अनेकदा वृत्तपत्रांतून, मासिकांतून भेटले होते. पुढे त्यांचे "नाचू किर्तनाचे रंगी" हातात पडलं. ते पुस्तकही खुप आवडलं होतं. अश्यावेळी वाचनालयात "अंगणातले आभाळ" हे त्यांचे आत्मचरित्र दिसले आणि लगेच उचलले.

पाठकांचे वडील श्री. त्र्यंबकबुवा हे किर्तनकार ब्राह्मण. पाठकांना एक बहिण व एक भाऊ.. दोघेही धाकटे. वडीलांच्या किर्तनावर चालणारं घर. त्यात वडील सर्व भावंडांत मोठे असल्याने त्यांच्या भावंडांची जबाबदारी पार पाडताना स्वतःच्या घराकडे काहिप्रमाणत झालेले दुर्लक्ष.. आणि या सगळ्या प्रकारात नावाने यशवंत असलेल्या एका छोट्या मुलाचा कर्माने यशवंत होण्यापर्तंतचा प्रवास म्हणजे हे आत्मचरित्र अंगणातले आभाळ.

युद्धस्य कथा रम्या: म्हटले जाते. युद्ध माणसाचे जितके हाल करते तितकेच नाट्यमय प्रसंगही घडवते. आणि गरीबीतले जिणे म्हणजे रोज कुठल्या ना कुठल्या लढ्याला तोंड देणेच.. अश्यावेळी सतत परिस्थितीशी लढणार्‍या पाठक कुटुंबाने व पर्यायाने लेखकाने अनुभवलेले प्रसंग वाचताना वाचक गुंग होतो. जसजशी परिस्थिती बदलली तसतसे ब्राह्मण समाजाचे समाजातील स्थान बदलले. अश्यावेळी एका गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या लेखकाला एकीकडे बदलता समाज सामोरा येत होता तर दुसरीकडे वडिलांनी दिलेली किर्तनाची म्हणा किंवा ब्राह्मणी म्हणा परंपरा खेचत होती.

एकीकडे अभ्यास तर दुसरीकडे आठ आण्यासाठी अथर्वशिर्षाची पारायणे करणारा लेखक, शाळेच्या अभ्यासाबरोबरच बराच अनुभवही गाठीशी बांधतो. याचबरोबर गरीबीतही कोणाकडे गरज असल्याशिवाय काहि न मागण्याची, शक्य तितके वाटून खाण्याची शिकवण आई स्वतःच्या उदाहरणातून देत असते. वडील जमेल तशी आर्थिकजमाखर्च जुळवत असतात पण तो पुरेसा नसतो. अश्यावेळी अनेक कुटुंबांप्रमाणे लेखकाची आई व्यवहार व मुलांचे संस्कार सांभाळून मुलांना मोठे करते.

पुढे पाठकांचे बीए होणे, वडिलांचा आजार, तर्‍हेवाईक नातेवाईक, समाजातील भलेबुरे अनुभव, वडिलांचा मृत्यू, एमए होणे आणि पुढे डॉक्टरेट मिळवण्यापर्यंतचा प्रवास छान चितारला आहे. याच बरोबर आपल्याला अजून एक दुनिया दिसते ती म्हणजे किर्तनकाराची. एका किर्तनकाराच्या घरातील वास्तव. एका बाजूला आर्थिक विवंचना व त्यामुळे अपरिहार्य नोकरी तर दुसरीकडे किर्तनाची परंपरा सोडावी लागण्याचं दु:ख (किंबहूना मुलानेही बीए होऊनही किर्तनकार व्हावे अशी इच्छा) यातील द्वंद्व प्रकर्षाने समोर येतं. पुढे जेव्हा डॉक्टरेटसाठी श्री पाठक "कीर्तनपरंपरा आणि मराठी वाङ्मय" हा विषय निवडतात व त्यासाठी माहीती जमवतात तेव्हा दिसणारं कीर्तन विश्वातलं अंतरंग व त्या विश्वातील भलेबुरे अनुभव विचार करायला लावतात. बदलत्या जगाचं वारं सगळ्या क्षेत्रांप्रमाणे कीर्तनक्षेत्रालाही लागलं आहे.पुर्वापार चालत आलेल्या मानापमानाच्या नाटकात आता आर्थिक भपक्याचा नवा अंक सुरू झालेला जाणवतो.

अर्थात या पुस्तकात सगळंच उत्तम आहे असे नाहि. गरीबी खूप होती हे खरे असले तरी काहि प्रसंग तोच तोचपणा येऊ नये म्हणून टाळता आले असते. अश्या तोच भावार्थ संगणार्‍या वेगवेगळ्या प्रसंगामुळे पुस्तक मधेच किंचित पकड सैलावतं पण एकुण आयुष्य नाट्यमय असल्याने त्यात आपण वाचत राहिलो की पुन्हा गुंगून जातो.

चरितार्थासाठी प्राध्यापकी स्वीकारलेल्या अन नियतीने डॉक्टरेटच्या रूपाने पुन्हा किर्तनातच गुंतवणार्‍या ह्या किर्तनकाराच्या मुलाची ही जीवनकहाणी कसेही करून आवर्जून वाचा असे जरी सांगणार नाहि तरी समोर मिळाल्यास अजिबात सोडू नका अशी आहे असे मात्र नक्कीच म्हणेन.

मालक

मालक, पुस्तकातली काही टाकण्याजोगी पाच-दहा वाक्यं तरी टाका की.
परिचय चांगला. पण पुस्तकातली पाच-दहा वाक्यं आली असती तर बिघडलं नसतं.

निवडक

एखादा वेचा टाकायचं ठरवलं होतं पण कुठला टाकू ते कळेना.. पुस्तकात प्रसंग बरेच आहेत मात्र एखादा "पीक पॉइंट" असा नाहि. असो. मला आवडले ते एक दोन वेचे देतो:


माझा क्रमांक आला. नाव पुकारले "त्र्यंबक नासिककर"
मी संकोचुन गेलो. शेठजींनी माझ्याकडे विस्मयाने पाहिले. मी अधिकच गच्च झालो. जगन्नाथभट भाऊंचे मित्र. भाऊंना ओळखणारी हीऽ सगळी भटजी मंडळी. त्यामुळे धड स्पष्टही बोलता येत नव्हते नि धड गप्पही बसता येत नव्हते. मी शेठजींसमोर ताठ बसलो. शेठाणीला माझ्या बसण्याचे कौतुक वाटले. तिला हा एवढासा ब्राह्मण म्हणून गंमत वाटली.
"शेठजी, आपल्या तीर्थक्षेत्री त्र्यंबकबुवा म्हणून प्रख्यात बुवा आहेत. कीर्तनं उत्तम करतात, तशीच याज्ञिकीही उत्तम आहे. ते आता किर्तनासाठीच उत्सवाला गेले आहेत. त्यांचा हा मुलगा. यालाही सर्वदेवपूजा, रुद्र येतो. विषेश म्हणजे कालेजात जाऊन तो हे आपलं सांभाळतोय. तर बुवांच्या बदली याला द्यावं"
"अस्सं, अस्सं" शेटजी संभावना करत म्हणाले.
मी काहिहि न बोलता उगाच हसलो. संभावना घ्यायला हात मला पुढे रेटत होते.
"या मुलाला दहा रुपये जास्ती द्या" शेठाणी म्हणाली
शेठजींनी दहा रुपयांची नोट धोतरावर ठेवली आणि जगन्नाथजींचा चेहरा पडला. इतर भटजींनीही आपल्या मुलांना भेठजींसमोर आणायला सुरूवात केली. पण शेठजी बधेना. बाई काही बोलेना. त्यामुळे त्या क्षणाला माझ्याशी कुणी बोलेना. विष्णूभटांना तर मला खाऊ का गिळू झाले होते.

२.
"आता आमी वारकरी किर्तनाची सुरवात "सुंदर ते ध्यान" या अभंगानं करतो. आम्हा तुकारामबुवा मोठे वाटतात, म्हणून आमी ते करतो."
"पण तुमच्यात किर्तनाचा आरंभ "रूप पाहता लोचनी"ने करत असता ना?"
"ते सोनोपंत-जोगमहाराजांच्या काळात करीत होतो. आता तुकारामापास्नं प्रारंभ करायचा. ही आम्ही सर्व्या मठपतींनी मान्य केलेली सुचना आहे"
"तुकाराम तुमचा आणि ज्ञानेश्वर बामण म्हणून हा फरक करायचाय?"
"छे! छे! आमाला सर्व समान आहेत.. सर्व सा...सा....रखे.. आहेत"
"तुकारामांनीच 'ज्ञानियांचा राजा गुरू महाराव" म्हटलंय ना?"
"बुवा! तुम्ही मेरुमणीच पकडला अं. ठीक आहे. यालाही कधीतरी उत्तर देऊ"
"मी मोकळेपणानं विचारतोय. तुम्ही मोकळेपणानं बोलताहात म्हणून"
"बुवा! इति गुह्यतमं शास्त्रं कुणाला सांगु नका. पण सध्या संच चाललंय हां. अस्सच"
"मग हे प्रबंधात घालायचं की नाहि?"
"नाही. हे फक्त तुमच्यासाठी. आता हे हळूहळू आम्ही आणणार. ज्ञानोबा ते निळोबा हा आमचा किर्तनप्रवास राहिलच"
मी परत माऊलीला नमस्कार करताना मनात म्हणालो "आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचून एकाही ओवीचा अनुभव घेतला नाही. यांना ज्ञानेश्वरी कशी जवळ करणार? तुकाराम वैकुंठात रडत बसला असेल आणि नाथ भागवतावर आडवे पडले असतील."

ॠ पुस्तक वाचायच्या यादीत जोडत

ॠ पुस्तक वाचायच्या यादीत जोडत आहे रे..

छान!

छान आहे पुप. निवडक वेचे दिलेस तेही उत्तमच झाले. दुसर्‍या वेच्यातले लेखकाचे स्वगत एकदम खासच. पुस्तक वाचायलाच हवे आता. Smile

उत्तम ओळख

उत्तम ओळख ऋ. वेचे टाकलेस हे उत्तम केलेस. धन्यवाद.